दोन महिन्‍यांत अंडी ३४ टक्‍क्‍यांनी महागली! मलेशियाला होणार्‍या निर्यातीत विक्रमी वाढ | पुढारी

दोन महिन्‍यांत अंडी ३४ टक्‍क्‍यांनी महागली! मलेशियाला होणार्‍या निर्यातीत विक्रमी वाढ

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मागील दोन महिन्‍यांमध्‍ये अंडी दरात ३४ टक्‍क्‍यांनी वाढ नोंदवली गेली आहे. दरवर्षी थंडीच्‍या महिन्‍यांमध्‍ये अंडी महागतात मात्र यंदा त्‍यापूर्वीच म्‍हणजे १ ऑक्‍टोबरपासून अंडी दरात वाढ होताना दिसले. थंडीच्‍या महिन्‍यांमुळे देशांतर्गत मागणी वाढल्‍याबरोबरच मलेशियाला झालेल्‍या विक्रमी निर्यातीमुळे पोल्‍ट्री व्‍यवसायिकांना ‘अच्‍छे दिन’ आले आहेत. ( Egg Exports )

अंडी दरात सातत्‍याने होणार्‍या वाढ होत आहे. फेब्रुवारी महिन्‍यापर्यंत ही दरवाढ कायम राहिल. कारण मलेशियातून अंड्याला मोठया प्रमाणावर मागणी वाढली आहे, अशी माहिती पोल्‍ट्री फेडरेशनचे खजीनदार रिकी थापर यांनी दिली. आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२२ मध्‍ये भारताने मलेयिशाला सुमारे ५ कोटी अंडी निर्यात केली होती. भारतातून अंडी निर्यात प्रामुख्‍याने ओमान, कतार आणि सौदी अरेबियाला होते. मात्र मागील काही दिवसांपासून सर्वाधिक निर्यातही मलेशियाला झाली असून आता अंडी निर्यातीसाठी भारताला नवे दालन खुले झाले आहे.

 ‘या’ कारणांमुळे अंडी पुरवठा झाला कमी

मागील काही महिन्‍यांपूर्वी काही देशांमध्‍यत बर्ड फ्‍लूचा उद्रेक झाला. त्‍यामुळे जगभरातील अनेक देशांमध्‍ये अंडी आणि चिकनचा पुरवठाच ठप्‍प झाला. तसेच युक्रेन युद्धामुळे खाद्याच्या वाढत्या किमतींमुळे अनेक लहान शेतकऱ्यांना उत्पादनात कपात करावी लागली आहे. याचा परिणाम अंडी उपलब्‍धतेवर झाला आहे.

Egg Exports : प्रमुख पुरवठादारांकडून उत्‍पादनात घट

पोल्‍ट्री आयात करणार्‍या देशांकडून बर्ड फ्‍लूचे संकट असलेल्‍या देशावर व्‍यापार निर्बंध लादले गेले आहेत. त्‍यामुळे जानेवारी २०२३मध्‍ये भारत सुमारे 10 कोटी अंडी निर्यात करणार आहे. प्रमुख पुरवठादारांकडून उत्‍पादनात घट झाल्‍याने भारताला मोठ्या प्रमाणावर निर्यातीच्‍या ऑर्डर मिळत आहेत. भारतातील अंड्यांना सर्वाधिक मागणी मलेशियाकडून आहे. मलेशियातूनच सिंगापूर आणि अन्‍य आशियाई देशांना अंडी निर्यात होत असत. आता मलेशियाला भारत अंडी निर्यात करत असून भारतातील पोल्‍ट्री व्‍यवसायासाठी हे आशादायी चित्र आहे.

मलेशियाचे कृषी मंत्री मोहम्मद साबू यांनी जानेवारी महिन्‍याच्‍या सुरुवातीला तामिळनाडू राज्यातील नामक्कलला भेट दिली होती. त्‍यानंतर प्रथमच मलेशिया भारतातून मोठ्या प्रमाणात अंडी खरेदी करत आहे. आता पुढील सहा महिने तरी मलेशियाला भारताकडून मोठया प्रमाणावर अंडी विकत घेईल, असे भारतातील प्रमुख अंडी निर्यातदार सस्ती कुमार यांनी ‘रॉयटर्स’शी बोलताना सांगितले.

भारतातून डिसेंबर २०२२ मध्ये मलेशियाला ५ कोटी, जानेवारीमध्ये १० तर फेब्रुवारी महिन्‍यात मध्ये १५ कोटी अंडी निर्यात होतील, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. मलेशिया पाठोपाठ आता सिंगापूर आणि श्रीलंकेतूनही अंडी मागणी वाढेल, असेही ते म्‍हणाले. ऑल इंडिया पोल्ट्री प्रोडक्ट्स एक्सपोर्टर्स असोसिएशनचे सचिव वल्सन परमेश्वरन यांनी सांगितले की, भारत तामिळनाडूमधील नमक्कलमधून ओमान, कतार, संयुक्त अरब अमिराती, बहरीन आणि कुवेतसह बहुतेक मध्य पूर्व देशांमध्ये दररोज सुमारे 1.5 दशलक्ष अंडी निर्यात करतो. आता मलेशियाला अंड्याची निर्यात सुरू केल्याने आम्हाला दक्षिण-पूर्व आशियातील बाजारपेठेत प्रवेश मिळेल,”

हेही वाचा : 

 

 

Back to top button