इथेनॉलच्या भाववाढींचा फायदा | पुढारी

इथेनॉलच्या भाववाढींचा फायदा

रांजणगाव हे अष्टविनायक गणपतींपैकी तिसर्‍या गणपतीसाठी म्हणून प्रसिद्ध आहे. अहमदनगरला जाताना सहज रस्त्यावर लागणारे म्हणून सर्व भाविक न चुकता थांबून इथे दर्शन घेतात. महाराष्ट्र इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमआयडीसी) च्या कित्येक एकर जागा असलेल्यापैकी 297 एकर जमिनीवर इलेक्ट्रॉनिक्स निर्मिती केंद्र उभे राहणार आहे. त्यात 500 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. त्यात 207 कोटी रुपयांचा केंद्राचा वाटा असेल. त्यामुळे या क्षेत्रात 5000 रोजगार नव्याने निर्माण होतील. महाराष्ट्रातील अनेक उद्योग समूहांनी (अदानी, वेदांत) आपले उद्योग महाराष्ट्राबाहेर नेल्याने, कुठे चालला आहे महाराष्ट्र? अशा प्रश्नाची चर्चा होऊ लागली होती. त्यातच हैदराबाद इथेही कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प नेण्यात आला आहे. त्यामुळे व्यथित झालेल्या महाराष्ट्रालाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक मोठा प्रकल्प देऊ, असे अभिवचन दिले होते. त्यानुसार स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी एका वर्षात 75,000 रोजगार देण्याचा महाराष्ट्राचा महासंकल्प आहे.

साखर उद्योगात साखरेबरोबरच इथेनॉलचे उत्पादन घेतले जाते. त्याचा भाव आता वाढवण्यात आला आहे. साखर कारखाने बहुतांशी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटक इथे आहेत. त्यांना इथेनॉलच्या भाववाढीचा फायदा होईल. ब्राझीलसारख्या देशात इथेनॉलचे मिश्रण पेट्रोल-डिझेलमध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते. इथेनॉलचा मद्यार्कातही उपयोग होतो.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येऊन तीनच महिने झाले आहेत. तेव्हा मेमोरँडम ऑफ टाटांचे व एअरबसचे बोलणे सुरू झाले होते. तेव्हा मेमोरँडम ऑफ अंंडरटेकिंग (एमओयू) झाला नव्हता. त्यावेळी फडणवीसांनी नागपुरात हा प्रकल्प सुरू व्हावा यासाठी प्रयत्न केले होते. यासंबंधीची बोलणी करण्यासाठी ज्येष्ठ विरोधी पक्षनेता म्हणून आघाडी सरकारच्या मुख्यमंत्र्यांकडे जाण्यास तयार आहे, असे फडणवीसांनी सांगितले. पण त्यांनी सांगितले की, गुंतवणूक करण्यासाठी येथील परिस्थिती योग्य नाही. 24 एप्रिल 2021 ला ही तयारी फडणवीसांनी दाखवली. आता मात्र मोठे उद्योग महाराष्ट्राबाहेर जात आहेत. याचे पाप मविआ सरकार आमच्या माथी मारत आहेत.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना भारतीय अर्थव्यवस्था योग्य पद्धतीने रूळावर चालली आहे, असा दावा त्यांनी बँकांच्या व अर्थसंस्थांच्या एका परिषदेत केला. भारतीय अर्थव्यवस्था ही एक चिवट व भविष्यवेधी अर्थव्यवस्था झाल्याचे सांगितले. रिझर्व्ह बँकेच्या 70 हायफ्रिक्वेन्सी इंडिकेटर्सनुसार देशांतर्गत वस्तूंचे उत्पादन व वापर वाढत चालला आहे, हे एक चांगले चिन्ह आहे. विशेषतः नागरी क्षेत्रात हा वापर वाढत आहे. ग्राहकांशी थेट संबंध येणार्‍या सेवांमध्ये परिवहन, दूरसंचार वाढ दिसून आली आहे. व्हाईट गुडस् (फ्रीज, वॉशिंग मशीन), एफ.एम.सी.जी. च्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे.

मारुती सुझुकीचा नफा विक्रमी विक्रीमुळे चालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर 2022 या दुसर्‍या तिमाहीत चौपट झाला आहे. 30 सप्टेंबरअखेर कंपनीचा निव्वळ नफा 2112 कोटी रुपयांवर गेला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत नफा 486 कोटी रुपये होता. तर याच काळात तिचा एकूण महसूल 20,550 कोटी रुपये होता. नागरीकरण जसजसे वाढत जाईल तसतशी या शहरी गाड्यांना जास्त मागणी येईल. भारतातील रस्ते आता चांगले व अनेक पदरी होत असल्याने हे शक्य होत आहे. या वर्षी दुसर्‍या तिमाहीअखेर एकूण महसूल 29,942 कोटी रुपये झाला. मारुती सुझुकी ही कंपनी भारतात आणण्याचा संजय गांधी यांचा विचार किती दूरगामी होता, हे आता लक्षात येईल; पण त्यावेळी मात्र टीकेची झोड उठली होती. या गाड्यांची देशांर्गत विक्री 4 लाख 54 हजार इतकी झाली आहे. 63 हजार गाड्यांची याच काळात निर्यात झाली.

रिझर्व्ह बँकेचा बहुचर्चित डिजिटल रुपया अर्थात सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (सीबीडीसी) गेल्या आठवड्यातील मंगळवार म्हणजे 1 नोव्हेंबर 2022 पासून बाजारात आला आहे. सध्या सीबीडीसी प्रायोगिक तत्त्वावर बाजारात येत आहे. याचा वापर सरकारी रोख्यांसाठी सध्या सुरुवातीला केला जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावरील व्यवहारांसाठी पुढील बँकांची निवड झाली आहे.

स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआय बँक, कोटक महिंद्र बँक, आयडीएफसी बँक, एचएसबीसी.

युरो या चलनाचा वापर करणार्‍या 19 युरोपीय देशांच्या चलनवाढीचा दर ऑक्टोबर 2022 महिन्यात 10.7 टक्के या आतापर्यंतच्या विक्रमी स्तरावर गेला आहे. नैसर्गिक वायू आणि विजेच्या वाढत्या दरांनी या देशांच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसला आहे.

डॉ. वसंत पटवर्धन

Back to top button