अर्थवार्ता | पुढारी

अर्थवार्ता

  • प्रीतम मांडके (मांडके फिनकॉर्प)

 

  •  गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकामध्ये शुक्रवारच्या सत्रात अनुक्रम 172.35 अंक व 684.64 अंकांची वाढ झाली. निफ्टीमध्ये 1.01 टक्क्यांची, तर सेन्सेक्समध्ये 1.2 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. निफ्टी 17185.7 अंक, तर सेन्सेक्स 57919.97 अंकांच्या पातळीवर बंद झाला. एकूण संपूर्ण सप्ताहाचा विचार करता, निफ्टीमध्ये 128.95 (0.74 टक्के) आणि सेन्सेक्समध्ये 271.32 अंक (0.47 टक्के) ची घट नोंदवली गेली.

 

  • भारतातील घाऊक महागाई दर (डब्लूपीआय इन्फ्लेशन) सप्टेंबर महिन्यात 10.7 टक्क्यांपर्यंत खाली आले. मागील 18 महिन्यांचा हा नीचांक आहे. तसेच सप्टेंबरमध्ये भारताची निर्यात मागील वर्षीच्या तुलनेत 4.8 टक्के वधारून 35.5 अब्ज डॉलर्स, तर आयात मागील अब्ज डॉलर्स तर आयात मागील वर्षीच्या तुलनेत 8.7 टक्के वधारून 61.2 अब्ज डॉलर्स झाली. यामुळे व्यापारतूट 25.7 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली.

 

  •  टाटा समूहाच्या विमान प्रवास सुविधा पुरवणार्‍या दोन कंपन्या ‘एअर इंडिया’ आणि ‘विस्तारा एअरलाईन्स’मध्ये टाटांचा 51 टक्के हिस्सा, तर सिंगापूर एअर लाईन्सचा 49 टक्के हिस्सा, सिंगापूर एअर लाईन्सला विलीनीकरणाचा प्रस्ताव तत्त्वत: मान्य.

 

  •  देशातील दुसर्‍या क्रमांकाची आयटी कंपनी ‘इन्फोसिस’चे दुसर्‍या तिमाहीचे निकाल जाहीर. निव्वळ नफा मागील तिमाहीच्या तुलनेत 12.3 टक्के वधारून 6021 कोटी, तर महसूल 6 टक्के वधारून 36,538 कोटी झाला. कंपनीचे 1850 रुपये प्रतिसमभाग दरावर 9300 कोटी रुपयांची समभाग पुनर्खरेदी योजना (शेअर बायबॅक) जाहीर केली.

 

  •  देशातील महत्त्वाची दुचाकी गाड्यानिर्मिती कंपनी ‘बजाज ऑटो’ चा दुसर्‍या तिमाहीचा नफा मागील वर्षीच्या तुलनेत 20 टक्के वधारून 1530 कोटी झाला. महसुलातदेखील 16 टक्क्यांची वाढ होऊन महसूल 10.203 कोटींवर पोहोचला.

 

  •  देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’(टीसीएस)चे चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीचे निकाल जाहीर. कंपनीचा नफा 9478 कोटींवरून 10431 कोटींपर्यंत वाढला. कंपनीच्या महसुलात मागील तिमाहीच्या तुलनेत 4.83 टक्क्यांची वाढ होऊन महसूल 55309 कोटींवर पोहोचला. कंपनीचे ऑपरेटिंग मार्जिन 23.1 टक्क्यांवरून 24 टक्के झाले. कंपनीने 8 रुपये प्रतिसमभाग जाहीर केला.

 

  • अदानी उद्योग समूह जेपी उद्योग समूहाचा सिमेंट उत्पादन व्यवसाय खरेदी करण्यासाठी प्रयत्नशील. सध्या जेपी असोसिएट उद्योग समूह कर्जाच्या बोज्याखाली दबलेला. त्यामुळे अदानी उद्योग समूह सुमारे 5 हजार कोटींना जेपी उद्योग समूहाचा सिमेंट व्यवसाय घेण्यास उत्सुक. नुकताच अदानी उद्योग समूहाने ‘एसीसी’ व अंबुजा सिमेंट कंपन्या 6.5 अब्ज डॉलर्स (सुमारे 52 हजार कोटींना) खरेदी केल्या. सध्या अदानी समूहाकडे 67.5 दशलक्ष टन सिमेंट उत्पादन क्षमता आहे. पुढील पाच वर्षांत ही क्षमता 140 दशलक्ष टन बनवण्याचे लक्ष्य आहे. जेपी समूहाच्या सिमेंट व्यवसाय ताब्यात आल्यास ही क्षमता 10 दशलक्ष टनांनी वाढेल.

 

  •  भांडवल बाजारातील अस्थिरतेच्या काळातदेखील गुंतवणूकदारांचा ‘एसआयपी’(सीप)च्या माध्यमातून गुंतवणुकीकडे वाढता कल. सप्टेंबरमध्ये ‘एसआयपी’च्या माध्यमातून आतापर्यंतची सर्वाधिक विक्रमी म्हणजेच 12976 कोटींची गुंतवणूक करण्यात आली. भारतातील एसआयपी खात्यांची (अकाऊंट्स) संख्या तब्बल 5.83 कोटी इतकी झाली.

 

  •  आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आर्थिक वर्ष 2023 चे भारताच्या अर्थव्यवस्था वृद्धीदराचा अंदाज 7.4 टक्क्यांवरून 6.8 टक्क्यांपर्यंत खाली आणला. रशिया-युक्रेन युद्ध आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेले खनिज तेलाचे दर आणि परिणामत: वाढलेली महागाईदर यांचा प्रतिकूल परिणाम वृद्धीदर घटण्यात झाल्याचे (आयएमएम) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे.

 

  •   जेएसडब्लू सिमेंट कंपनी 3200 कोटींच्या गुंतवणूक करून सिमेंट निर्मितीचे दोन प्रकल्प उभे करणार. या दोन्ही प्रकल्पांची निर्मिती क्षमता सुमारे 5 दशलक्ष टन इतकी असेल.

 

  •  सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाई दराने मागील 5 महिन्यांत उच्चांक गाठला. सप्टेंबर महिन्यात भारतातील किरकोळ महागाई दर 7 टक्क्यांवरून 7.41 टक्के झाला. तसेच ऑगस्ट महिन्याचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) मात्र 0.8 टक्क्यांनी रोडावला.

 

  •   केंद्र सरकार पेट्रोल आणि एलपीजी उत्पादक सरकारी कंपन्यांना ‘एलपीजी’ उत्पादनात होत असलेला तोटा भरून काढण्यासाठी 22 हजार कोटी रुपये देणार. जून 2020 ते जून 2022 दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात भरून काढण्यासाठी या कंपन्यांना सरकारतर्फे एकरकमी मदत केली जाणार.

 

  •   देशातील महत्त्वाची आयटी कंपनी विप्रो तसेच एचसीएल टेकचे दुसर्‍या तिमाहीचे निकाल जाहीर. विप्रोचा निव्वळ नफा मागील तिमाहीच्या तुलनेत 3.7 टक्के वधारून 2659 कोटी झाला. तसेच महसूल 4.7 टक्के वधारून 22540 कोटी झाला. एचसीएल टेकचा निव्वळ नफा मागील तिमाहीच्या तुलनेत 6.28 टक्के वाढून 3487 कोटी झाला. तर महसूल 5.2 टक्के वाढून 24686 कोटी झाला.

 

  •  7 ऑक्टोबर रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश गंगाजळी 204 दशलक्ष डॉलर्सनी वधारून 532.86 अब्ज डॉलर्स झाली. सुमारे दोन महिने सतत गंगाजळीत घसरण झाल्यावर प्रथमच या सप्ताहात गंगाजळीत वाढ झाली.

 

Back to top button