लक्ष्मीची पाऊले : अदानी समूहाचा एनडीटीव्हीवर ताबा; शेअर बाजारात पडसाद | पुढारी

लक्ष्मीची पाऊले : अदानी समूहाचा एनडीटीव्हीवर ताबा; शेअर बाजारात पडसाद

डॉ. वसंत पटवर्धन :  गेल्या आठवड्यात शुक्रवारी 26 ऑगस्टला शेअरबाजार बंद होताना निर्देशांक 58,833 अंकांवर बंद झाला; तर निफ्टी 17,558 अंकांवर स्थिरावला.

काही शेअर्सचे भाव खालीलप्रमाणे होते

ओएनजीसी 136 रुपये, हेग 1288 रुपये, जिंदाल स्टेनलेस (हिस्सार) 246 रुपये, मन्‍नापूरम फायनान्स 105 रुपये, बजाज फायनान्स 7074 रुपये, जे कुमार इन्फ्रा 102 रुपये, रेप्को होम्स 272 रुपये, जिंदाल स्टील 402 रुपये, मुथुट फायनान्स 1051 रुपये, केईआय इंडस्ट्रीज 1403 रुपये, लार्सेन अँड ट्रब्रो 1877 रुपये, लार्सेन अँड ट्रब्रो इन्फोटेक 4631 रुपये, भारत पेट्रोलियम 329 रुपये, ग्राफाईट 402 रुपये, स्टेट बँक ऑफ इंडिया 520 रुपये.

अदानी समूहाने एनडीटीव्ही वृत्तवाहिनीतील 26 टक्के हिस्सा खरेदी करायचे ठरवले आहे. यासाठी अदानी समूहाने 93 कोटी रुपयांची खुली ऑफर देऊ केली आहे. यापूर्वी अदानी समूहाने एनडीटीव्हीमध्ये वॉरंट्स रूपांतरणाच्या माध्यमातून सुमारे 30 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. ही ऑफर एनडीटीव्हीने स्वीकारली, तर अदानी समूह या वृत्तवाहिनीचा सर्वात मोठा भागधारक होईल. त्यामुळे अदानी समूहाकडे एनडीटीव्हीचे 55 टक्के समभाग होतील. या सर्व व्यवहाराचे शेअरबाजाराने स्वागत केले आहे. या समभागांची गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर मागणी केल्यामुळे याला शेअर बाजारात अप्पर सर्किट लागले. त्यामुळे शेअरबाजार बंद होताना त्याचा भाव 388 रुपये झाला.

अहमदाबादमधील टॉरंट फार्मास्युटिकल्स ही कंपनी र्उीीरींळे कशरश्रींहलरीश या कंपनीचे आग्रहण करण्यास सिद्ध झाली आहे. त्वचेवरील औषधांची निर्मिती करणारी ही अग्रगण्य कंपनी आहे. देशातील पेट्रोल व डिझेलची मागणी वाढत असतानाही क्रूड पेट्रोलचे उत्पादन घटले आहे. ओएनजीसी व अन्य कंपन्यांचे उत्खनन कमी झाले आहे. एप्रिल ते जुलै या महिन्यांत 34 टक्के वाढले. या काळातील नैसर्गिक वायूचे उत्पादन 11.43 अब्ज घनमीटर इतके झाले.

ओएनजीसीने पश्‍चिम तेल उत्खनन क्षेत्रातून क्रूड तेलाचे उत्पादन 1.7 टक्क्याने कमी घेतले आहे. हे उत्पादन जुलैमध्ये 16.30 लाख टन इतके घेतले गेले होते. 2022 च्या एप्रिल-जुलै या काळात 99.10 लाख टन क्रूड तेलाचे उत्पादन घेतले गेले आहे. देशातील 22 तेल शुद्धीकरण कंपन्यांनी 10.52 टक्के अधिक म्हणजेच 21.43 दशलक्ष टन क्रूड तेलाचे शुद्धीकरण केले. क्रूड तेलामुळे इंधन निर्मिती होते. टर्बाइन्स चालू होतात. क्र्रूड तेलाच्या शुद्धीकरणामुळे पेट्रोल, डिझेल व काही प्रमाणात नैसर्गिक वायू या इंधनांची निर्मिती होते. क्रूड उत्पादनाचे मासिक लक्ष्य 25.90 दशलक्ष टन आहे. जुलै 2022 या महिन्यात क्रूडचे उत्पादन घसरून 24.50 लाख टन झाले. आर्थिक वर्ष 2011 पासून क्रूड तेलाचे उत्पादन सतत घसरत होते. पण आता ही घसरण थांबवण्यात आपल्याला यश आले आहे. 2021-22 मार्च या कालावधीत हे उत्पादन 29.70 दशलक्ष टन होते. 2022-23 या चालू वर्षात ते 30.80 दशलक्ष टन झाले. हे उत्पादन 2023-24 या वर्षात लक्षणीय वाढेल व 34 दशलक्ष टनांवर जाईल.

जुलै 2022 मध्ये 2.88 अब्ज घनमीटर नैसर्गिक वायूचे उत्पादन झाले. 2022 एप्रिल ते जुलै या काळात हे उत्पादन 34 टक्के वाढले. या काळात देशात 11.43 अब्ज घनमीटर नैसर्गिक वायूचे उत्पादन झाले. ओएनजीसीच्या दमण येथील उत्खनन क्षेत्रातून नैसर्गिक वायूचे उत्पादन 2022 जुलै महिन्यात कमी झाले. (सुमारे 4 टक्के)

‘आयएनएस विक्रांत’ ही पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू नौका नौदलात दाखल होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या नौकेचे 2 सप्टेंबर 2022 ला जलावतरण होणार आहे. ही नौका उभारण्यासाठी 20 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च आला आहे. या नौकेचे वजन 45 हजार टन आहे. 88 मेगावॅट ऊर्जानिर्मिती या नौकेवर होऊ शकेल. ही नौका 262 मीटर लांब व 14 मजली उंच आहे. विक्रांतवर 35 पेक्षा जास्त ‘मिग-29-के’ लढाऊ विमाने आणि विविध हेलिकॉप्टर तैनात करण्यात येणार आहेत.
भारतीय टपाल खाते आता आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणार आहे. केंद्र सरकारच्या सेवा नागरिकांच्या दारापर्यंत नेण्याचा विचार आता भारतीय टपाल खाते करत आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही या सेवेचा लाभ मिळणार आहे. चालू वर्षात 10 हजार नवी पोस्ट कार्यालये सुरू होणार आहेत. केंद्र सरकारने पोस्टाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी 5200 कोटी रुपये दिले आहेत. नवीन पोस्टाच्या कार्यालयांमुळे नवीन रोजगार निर्माण होतील. कोरोना काळात पोस्टाने 20 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्‍कम नागरिकांना घरपोच नेऊन दिली. याचा फायदा विशेषतः वृद्ध व अपंग लोकांना जास्त झाला.

Back to top button