गरज ‘स्टार्टअप इकोसिस्टीम’ची | पुढारी

गरज ‘स्टार्टअप इकोसिस्टीम’ची

गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची सत्ता संपुष्टात आली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस यांनापण दिल्लीतील भाजप नेतृत्वाच्या सांगण्यावरून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले. नव्या अर्थमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर त्यांना येत्या सहा महिन्यांसाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर करावा लागेल.

डॉलरच्या तुलनेत रुपया बुधवारी 6 जुलैला थोडासा सावरला आणि तो 79.30 वर पोहोचला. मंगळवारी 5 जुलैला रुपयाने आतापर्यंतची नीचांकी पातळी गाठली होती. क्रूड तेलाच्या किमती कमी झाल्या तरीही भारताला लागणार्‍या पेट्रोल व डिझेलचे भाव वाढले तर भारताला मोठ्या प्रमाणावर फटका बसतो. बॉम्बे हाय, राजस्थान व कृष्णा-गोदावरी खोर्‍यातील तेलाच्या उत्पादन वाढीसाठी नवीन काही प्रयत्न होत नाहीत, ही खेदाची बाब आहे.

नवीन उद्योजकांसाठी ‘स्टार्टअप इकोसिस्टीम’ तयार करण्यात गुजरात आणि कर्नाटक राज्य आघाडीवर आहे. महाराष्ट्राला लागून असलेल्या या दोन्ही राज्यांनी याबाबत आघाडी घेतली असून, महाराष्ट्र मात्र याबाबत मागे पडला आहे. महाराष्ट्राच्या नवीन अर्थमंत्र्यांना याबाबत तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. नवीन येणार्‍या अर्थमंत्र्यांसाठी हे आव्हान असेल.

सध्या खाद्यपदार्थ व द्रवपदार्थ यांच्या सेवनासाठी प्लास्टिक स्ट्रॉचा वापर केला जातो, त्याच्याऐवजी आता कागदी स्ट्रॉ देण्याकडे कंपन्यांचा कल वाढू लागला आहे. प्लास्टिकवर बंदी आणल्यामुळे कंपन्या या निर्णयाला पोहोचल्या आहेत. पारले अ‍ॅग्रो, डाबर, अमूल आणि मदर डेअरी यांनी त्यांच्या टेट्रापॅकसोबत दिल्या जाणार्‍या प्लास्टिक स्ट्रॉऐवजी तेवढ्याच टिकाऊ स्ट्रॉचा शोध सुरू केला आहे.

सोन्याच्या आयातीवर शुल्क 10.75 टक्क्यांवरून 15 टक्के करण्यात आले आहे. वित्तीय तूट भरून काढण्यासाठी याचा उपयोग होईल.
शुक्रवारी 8 जुलैला शेअरबाजार बंद होताना निर्देशांक 54,481 अंकांवर बंद झाला; तर निफ्टी 16,220 वर स्थिरावला. शुक्रवारी 8 जुलैला शेअरबाजार बंद होताना काही शेअर्सचे भाव पुढीलप्रमाणे होते.

हेग 1055 रुपये, जिंदाल स्टेनलेस (हिस्सार) 209 रुपये, मन्नापुरम फायनान्स 91 रुपये, बजाज फायनान्स 5873 रुपये, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन 73 रुपये, अशोक बिल्डकॉन 76 रुपये, रेप्को होम्स 103 रुपये, जिंदालस्टील 343 रुपये, मुथुट फायनान्स 1035 रुपये, लार्सेन अँड ट्रब्रो 1687 रुपये, लार्सन ट्रब्रो इन्फोटेक 4067 रुपये, बीपीसीएल 325 रुपये, ग्राफाईट 418 रुपये, स्टेट बँक ऑफ इंडिया 488 रुपये, स्टील स्ट्रॉप्स 846 रुपये.

टायटन कंपनीचा समभाग 5.70 टक्के वाढला. टायटनच्या विक्रीमध्ये एप्रिल ते जूनमध्ये तिपटीने वाढ झाली. त्याचा हा परिणाम आहे.
टाट स्टील, लार्सेन अँड ट्रब्रो, इंडसइंड बँक, महिंद्र अँड महिंद्र, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक व एचडीएफसी बँक यांचे समभागही 5 टक्क्यांपर्यंत वाढले. गुंतवणुकीसाठी अजूनही या कंपन्यांचे शेअर्स आकर्षक वाटतात. बँकातील मुदत ठेवींवर कमाल 8 टक्केच व्याज मिळते. शेअर बाजारातील अनेक कंपन्यांच्या शेअर्सच्या भावात यापेक्षा कितीतरी आकर्षक वाढ मिळते आणि चांगल्या कंपन्या (उपरिनिर्दिष्ट) निवडल्या तर गुंतवणुकीवर परतावा चांगला मिळतो. त्यामुळे ज्यांनी अजूनपर्यंत शेअर्समध्ये गुंतवणूक केली नसेल.

त्यांनी अजूनही या सागरात उडी मारायला हरकत नाही. आपल्या शेअर्समधील गुंतवणुकीवर सर्व साधारणपणे वर्षाला 15 टक्के जरी वाढ मिळाली, तरी 5 वर्षांत भांडवल दुप्पट होते. शिवाय शेअर्सवरील डिव्हीडंड हे करमुक्त असते. त्यामुळे ज्यांनी या बाजाराकडे अजून बघितले नसेल त्यांनी अजूनही इथे उडी घ्यावी. बजाज फायनान्ससारख्या शेअर्समध्ये आजोबांनी जर गुंतवणूक केली असेल, तर त्यांच्या नातवांना अमाप पैसा गेल्या 25 वर्षांत मिळाला असेल.

डॉ. वसंत पटवर्धन

Back to top button