करबचतीचे नियोजन करण्यासाठीच्या टिप्स | पुढारी | पुढारी

करबचतीचे नियोजन करण्यासाठीच्या टिप्स | पुढारी

नियोजन करताना काहीवेळा भविष्यातील गरजा मोठ्या व रक्‍कम तुटपुंजी अशी अवस्था भविष्यात दिसते. म्हणून भविष्यातील गरजांवर महागाईचा काय परिणाम होणार आहे त्याबाबतचा एक आराखडा तयार करावा. तो करत असताना येणारे वार्षिक उत्पन्न व होणारा खर्च यातूनच भविष्यातील ध्येयधोरणांसाठी बचत व गुंतवणूक यांची योग्य सांगड घालणे  फार महत्त्वाची बाब आहे. गुंतवणूक करताना प्रामुख्याने खालील गोष्टींचा विचार करावा.

सुरक्षितता, तरलता, परतावा, कराची आकारणी 

आयकर वाचवणेसाठी, गुंतवणुकीसाठी तर 80 सी, 80 डी व 80 सीसीफ खाली करसवलत घेऊ शकतो. मात्र कर वाचवण्यासाठी 80 सी खालील दोन पर्याय आहेत.

सुरक्षित गुंतवणूक, जोखीमयुक्‍त पर्याय 

सुरक्षित गुंतवणूक
पी. पी. एफ., आयुर्विमा, एन. एस. सी., बँक, एफ. डी. प्रोव्हीडंड फंड, एम्पालायर प्रोव्हीडंड,  पोस्ट एफ. डी., सुकन्या समृद्धी योजना, राष्ट्रीय पेन्शन योजना, हे सर्व सुरक्षित पर्याय आहेत. त्यांचे व्याजदर 5.5 टक्के  ते 8 टक्केपर्यंत सध्या मिळत आहे. मात्र सध्याच्या जागतिकीकरणाच्या प्रवाहात भांडवल अधिक प्रवाही होत आहे. त्यामुळे सुरक्षित पर्याय योजनेवरील व्याजदर हळूहळू कमी होत असलेले दिसून येते. हे खाली दिलेल्या माहितीवरून लक्षात येते आहे. अशी सुरक्षित गुंतवणूक जेव्हा आपण दीर्घकाळासाठी करतो तेव्हा मात्र महागाईचा व चलनवाढीचा विचार करणे गरजेचे ठरते. निव्वळ परतावा पाहणे गरजेचे असते.  

जोखीमयुक्‍त गुंतवणूक पर्याय – इन्शुरन्स कंपनीचे युलिप प्लॅन व इक्विटी लिक्विड सेव्हिंग्ज स्कीम. 

विमा कंपन्यांचे युलिप प्लॅन
या सर्व योजना शेअर मार्केटशी निगडित उपलब्ध आहेत. विमा कंपन्याचे युलिप प्लॅन कर वाचविण्याबरोबर विमा व गुंतवणूक असे तिहेरी संगम असलेले युलिप प्लॅन सर्व कंपन्यांमध्ये उपलब्ध आहेत. मात्र असे प्लॅन 10 ते 12 वर्षे गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवल्यास फायदेशीर ठरतात. 

म्युच्युअल फंडातील ELSS योजना (मागील तीन वर्षे 13.6 टक्के,  पाच वर्षांचा सरासरी परतावा 16.4 टक्के )

ELSS या योजनेची सुरुवात 28 डिसेंबर 1992 साली झाली. इन्कमटॅक्स अ‍ॅक्ट 1961 च्या आधारे 80 सी  सेक्शनखाली सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स कर सवलतीसाठी सदर योजना जाहीर केली आहे. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम या नावातच इक्विटीचा समावेश करता येतो. त्यामुळे म्युच्युअल फंडाच्या तज्ज्ञामार्फत निरनिराळ्या सेक्टरमधील शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते.आपण 80 सी खाली आयकर सवलतसाठी किमान 500 पासून कमाल 1.5 लाखापर्यंत गुंतवणूक करू शकतो. सदर गुंतवणूक ही एकरकमी अथवा दर महिन्याला SIP च्या माध्यामातून करता येते.

गुंतवणूकदारांना फंडामार्फत गुंतवणूक केल्यानंतर युनिट्स अलाटमेंट केले जातात. अशा योजनेमधून मिळणारा लाभांश हा एक लाखापर्यंत  करमुक्‍त येतो. यानंतर रकमेवर  परवाच्या बजेटमध्ये जाहीर केलेला  LTCG 10 टक्के  कर लागणार आहे. या योजनेचा परतावा निश्चित नसतो. फंड मॅनेजरमार्फत केल्या जाणार्‍या शेअर्सच्या खरेदी-व्रिकीनुसार, नफा-तोट्यानुसार युनिटची किंमत ठरविली जाते. कर सवलतीबरोबर दीर्घकालीन वृद्धीसाठी गुंतवणूक केल्यास सरासरी मिळून भविष्यात एक मोठी संपत्ती निर्माण करता येते. डिसे 2017 अखेर गेल्या वीस वर्षांचा चांगल्या योजनांचा परतावा पाहिल्यास 21 टक्केपर्यंत मिळालेले आहेत.

गेल्या पंधरा वर्षांत ज्यांनी प्रतिवर्षी 1,50,000/- प्रमाणे गुंतवणूक केली असेल तर त्यांची एकूण गुंतवणूक  22,50,000/- आजचे मूल्य 1,17,00,000/- एक कोटी सतरा लाख झालेली दिसते, जी 8 टक्के परताव्याने 40,72,000/- झालेली दिसून येते म्हणून दीर्घकाळासाठी जोखीम घेणे फार महत्त्वचे आहे हे कळते. मुच्युअल फंड गुंतवणूक बाजाराशी जोखीम निगडित असते. योजनेचा तपशील काळजीपूर्वक वाचावा. हे फार महत्त्वाचे आहे.   

पी. पी. एफ. 7.6 टक्के नवीन दर 
पी. पी. एफ. मधील गुंतवणूक शासकीय रोख्यामध्ये गुंतवलेली असते. शासकीय रोख्यामध्ये कमी झालेल्या किमतीमुळे सध्या गेल्या दोन वर्षात पी. पी. एफ. चे व्याजदर कमी झालेचे दिसून येत आहेत. नजीकच्या काळात पी. पी. एफ. चे दर 0.20 टक्क्यांनी कमी झालेले आहेत आणि ते भविष्यातही  कमी होत राहतील असे दिसते. सध्या व्याजदरामध्ये कपात होत असताना पी. पी. एफ. मध्ये होणारी गुंतवणूक व मिळणारी रक्कम ही टॅक्स फ्री असते. जसे पी. पी. एफ.मध्ये मिळणारी वाढ ही 7.6 टक्के  आहे, जी एफ. डी. पेक्षा जास्त आहे. दुसर्‍या बाजूला महागाई वाढ ही 4 टक्के असताना पी. पी. एफ. चा परतावा दर हा महागाई दर वजा करता 3 टक्के आहे. जो पी. पी. एफ. चे खाते चालू करण्यासाठी पोस्ट ऑफिस किंवा PSU बँक यांच्यामार्फत सुरू करता येते. पी.पी.एफ.मध्ये गुंतवणूक ही वार्षिक करता येते परंतु वार्षिकी 500 रु. हे जमा करावे लागतात. नोकरदार(करदाते) व्यक्तीसाठी ई. पी. एफ. ही सुविधा पी. पी. एफ. प्रमाणेच काम करते. ई. पी. एफ. ही पगाराशी संलग्न असते. पी. पी. एफ. मधून मिळणारा पैसा हा 15 वर्षांनंतर काढता येतो. व मिळणारा परतावा करमुक्‍त आहे .

वरिष्ठ नागरिक बचत योजना- 8.3 टक्के 
वरिष्ठ नागरिक जे निवृत्त झालेले आहेत व जे करदाते आहेत आणि ज्यांना दरमहा ठरावीक रक्‍कम खर्चासाठी हवी असते अशा लोकांसाठी ही योजना उत्तम आहे. या योजनेमध्ये परतावा दर हा 8.3 टक्के आहे. या योजनेमध्ये कालावधी हा 5 वर्षांचा असून तो आणखी 3 वर्षे वाढवता येतो. यामध्ये गुंतवणूकदार हा जास्तीत जास्त 15 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकतो. आणि या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वयाची 60 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. तसेच कालावधी पूर्ततेआधी रक्‍कम काढली गेली तर 1.5 टक्के  रक्‍कम कपात केली जाते.

सुकन्या समृद्धी योजना – 8.1 टक्के  
ही योजना अशा लोकांसाठी आहे, जे करदाते आहेत व ज्यांना 10 वर्षांपेक्षा लहान मुलगी आहे. ही योजना खासकरून मुलींच्यासाठी आहे; ज्याचा परतावा दर हा 8.1 टक्के आहे, जो पी. पी. एफ. पेक्षा जास्त आहे. ह्या योजनेच्या माध्यमातून मिळणारा पैसा हा करमुक्‍त आहे व वार्षिकी 1.5 लाख रु. रक्‍कम गुंतवली जाऊ शकते. ही योजना चालू करण्यासाठी कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये आपण चालू करू शकतो व ती फक्‍त दोन अपत्यांना(मुलींना) लागू आहे. यामध्ये कमीत कमी 1000 रु. गुंतवावे लागतात. परंतु दोन्ही अपत्य मिळून ती रक्‍कम वार्षिकी 1.5 लाखापेक्षा जास्त नसावी. या योजनेचा सुरुवातीचा दर 9 टक्के  होता, तो आता कमी झाला आहे अन् भविष्यातही कमी होऊ  शकतो. सुकन्या योजनेतील शासकीय रोख्यातील गुंतवणूक असते जी भविष्यातील जास्त काळासाठी फायदेशीर ठरत नाही, जी बाजारातील इतर  गुंतवणूक योजनेपेक्षा कमी परतावा देते.

राष्ट्रीय पेन्शन योजना – 8 -9.5 टक्के 
NPS  योजनेंतर्गत तीन प्रकारे कर वाचवता येतो- 1. सेक्शन 80 सी अंतर्गत पूर्णपणे 1.5 लाख रु., 2. सेक्शन 80 CCD (1ला.) अंतर्गत 50 हजार रु., 3. नोकरदार त्याच्या बेसिक पगारातील 10 टक्के NPS मध्ये टाकू शकतो. NPS  मधून मिळणार्‍या परताव्यातील 40 टक्के  रक्‍कम ही करमुक्‍त असते आणि मिळणार्‍या परताव्यातून 40 टक्के  पैसा हा आपल्या निवृत्त जीवनासाठी गुंतवावा लागतो, जो कर देय असतो. NPS मधील गुंतवणूक ही निवृत्तीनंतरच मिळते, ती निवृत्तीआधी काढता येत नाही. जर काही अनैसर्गिक घटना किंवा काही गरज लक्षात घेऊन काढता येते. NPS मध्ये आपण 90 टक्केपासून 10 टक्केपर्यंत बाजारात गुंतवणूक करू शकतो. सध्याच्या बाजारातील चढत्या दरानुसार लोकांच्या अपेक्षासुद्धा वाढलेल्या आहेत. गेल्या तीन वर्षांत NPS ने 9.5 टक्के  दराने परतावा दिला आहे.

युलिप 9 -11 टक्के  
आयुर्विमा कंपन्यांच्या जोखीमयुक्‍त योजना म्हणजे युलिप प्लान होय. दीर्घकाळासाठी   गुंतवणूकदारांसाठी उत्तम परतावा व विमा संरक्षण मिळते . मोर्निंग स्टार एजन्सीच्या सर्व्हेनुसार आक्रमक युलिप प्लॅनने गेल्या वर्षभरात 20 टक्के  परतावा दिला आहे, जो इक्विटी मुच्युअल फंडाच्या तुलनेत अगदी कमी आहे, जो 30 – 35 टक्के  इतका  आहे. पाच वर्षांतील युलिपचा परतावा हा 11.96 टक्के  आहे जो इक्विटी मुच्युअल फंडाने 2012 पासून  सरासरी परतावा 25 टक्के  दिला आहे. युलिपमध्ये इक्विटी फंड व डेट फंड यांच्यामध्ये परस्पर हस्तांतरसाठी कोणतेही कर अदा केले जात नाहीत. युलिपमधील गुंतवणूक ही सेक्शन 10(10 डी) अंतर्गत येते. युलिपमध्ये शॉर्ट टर्म गुंतवणूक ही करमुक्‍त आहे. यामध्ये गुंतवणूक करताना विमा कंपन्यांचे वेगवेगळे चार्जेस आकारले जातात ते पाहणे गरजेचे असते.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र NSC परतावा – 7.6 टक्के 
ही सरकारी कर्मचारी, व्यावसायिक आणि इतर पगारदार वर्गासाठी आयकर विवरणपत्रांची विशेष योजना आहे. गुंतवणुकीसाठी कमाल  मर्यादा  नाही. परताव्यावर कर कपात नाही. बँकांकडून कर्ज मिळविण्यासाठी प्रमाणपत्रांना दुय्यम तारण म्हणून ठेवता येते. ट्रस्ट आणि एचयुएफसाठी गुंतवणूक करता येत नाही. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (एनएससी) प्रत्येक महिन्याला पाच वर्षांसाठी विकत घेता येतात. परिपक्व झाल्यावर पुन्हा गुंतवणूक करता येते आणि सेवानिवृत्तीनंतर एनएससी परिपक्व झाल्यावर तुम्हाला मासिक पेन्शन मिळेल. प्रत्येक व्यक्तीसाठी एकच प्रमाणपत्र खरेदी केले जाऊ शकते. ठेवींवरील कर सवलतीसाठी ठेवी पात्र होतात. सेक्शन 80 सी अंतर्गत दरवर्षी जमा होणारे व्याज पण आयटी अधिनियमाच्या कलम 80 सी अंतर्गत पुनर्गुंतवणुकीची समजावी. एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे सर्टिफिकेट्सचे हस्तांतरण केवळ मुदतपूर्तीच्या तारखेपासून एकदाच केले जाऊ शकते. एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे सर्टिफिकेट्सच्या हस्तांतरणाच्या वेळेस जुनी प्रमाणपत्रे डिस्चार्ज होणार नाहीत. जुन्या धारकाचे नाव गोलाकार असेल आणि नवीन धारकाचे नाव अधिकृत पोस्टमास्टरच्या दिनांकित स्वाक्षरीसह आणि पोस्टाच्या तारखेसह जुन्या प्रमाणपत्रावर आणि खरेदी अर्जावर (गैर सीबीएस पोस्ट ऑफिसच्या बाबतीत) लिखित केले जाईल. NSC मध्ये 7.6 टक्के  व्याजदर अपेक्षित आहे.

बँक एफ. डी. 7 टक्के – 7.5 टक्के  
नेहमीप्रमाणे बँक एफ. डी. करतो तशी कर वाचविण्यासाठी पाच वर्षांसाठी  बँक एफ. डी. हा एक पर्याय उपलब्ध आहे. जर आपल्याकडे नेट बँकिंग सुविधा उपलब्ध असेल तर आपण अगदी शेवटच्या दिवशीही बँक बंद असेल तरी आपण गुंतवणूक करू शकतो. ही  योजना  निवृत्त लोकांसाठीही उपलब्ध आहे. ज्यांनी वरिष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये 15 लाख गुंतवणूक केली आहे व राहिलेला पैसा जास्त काळासाठी पी. पी. एफ. मध्ये अडकवून ठेवू इच्छित नाहीत, त्यांच्यासाठी सुरक्षित पर्याय उपलब्ध आहे. सदर ठेव खात्यातील एफ. डी. मधील गुंतवणूकवरील मिळणारे  व्याजही पूर्णपणे करदेय असते. 
वरीलप्रमाणे अनेक पर्याय कर वाचविण्यासाठी उपलब्ध आहेत. कर वाचविणे हे निमित्त ठेवा व आपल्या भविष्यातील गरजा व वाढत्या महागाईचा आढावा घ्या. एखाद्या चांगल्या  सल्लागाराच्या मदतीने आराखडा तयार करून मगच गुंतवणूक करा व आपले भविष्य उज्ज्वल करा. 
(एस. पी. वेल्थ अ‍ॅडव्हायजर प्रा. लि.)

अनिल पाटील
 

Back to top button