मुलांच्या भवितव्यासाठी आर्थिक नियोजन | पुढारी | पुढारी

मुलांच्या भवितव्यासाठी आर्थिक नियोजन | पुढारी

विजयालक्ष्मी साळवी

पाल्यांवर चांगले संस्कार, शिक्षण देणे हे प्रत्येक पालकांचे कर्तव्य असते. त्याचबरोबर सुरक्षित भवितव्यासाठी देखील तरतूद करावी लागते. यादरम्यान,पालकांना जीवनात अनेक सत्याचाही सामना करावा लागतो. आपल्या मुलाचे भवितव्य पालकांनी आज घेतलेल्या निर्णयावर अवलंबून असते. उशिरा का होईना परंतु शांततेत, विचारपूर्वक केलेली कोणतीही योजना हा घाईगडबडीत केलेल्या योजनेपेक्षा उपयुक्‍त ठरते. यासाठी आपल्या मुलाचे भवितव्य पाहता आर्थिक नियोजन वेगळ्या पद्धतीने हवे. 

मुलाच्या जन्माबरोबरच नियोजन : लवकरात लवकर आर्थिक नियोजन करणे आणि त्यावर अंमल करणे ही बाब महत्त्वाची ठरते. सुरुवातीच्या काळात गुंतवणूक केलेली रक्कम कालांतराने दहा-पंधरा वर्षांनंतर चांगला परतावा देणारी ठरू शकते. त्याचा उपयोग मुलांचे आर्थिक लक्ष्य गाठण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. मुलाच्या जन्मानंतर वर्षभरातच किंवा पाच वर्षांच्या आत गुंतवणूक सुरू केल्यास त्याच्या बारावीपर्यंत बर्‍यापैकी पैसा हाताशी राहतो. 

उत्तम पर्यायांची निवड : आजकाल गुंतवणुकीचे असंख्य पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. मुलांचे शिक्षण, आरोग्य, परदेशातील शिक्षण यासाठी विविध योजना विमा कंपन्या किंवा आर्थिक संस्थांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. अशा स्थितीत योजना निवडीवरून संभ्रम निर्माण होऊ शकतो म्हणून आपला कौटुंबिक आकार, उत्पन्न, खर्च, जोखीम उचलण्याची तयारी, भविष्यातील खर्च या सर्व बाबींचे आकलन करूनच एखादी गुंतवणूक योजना तयार करावी. गरज पडल्यास आर्थिक सल्लागाराशीही चर्चा करावी. 

गुंतवणुकीबरोबरच सुरक्षाही हवी :  गुंतवणुकीत चांगला परतावा देण्याबरोबरच सुरक्षा प्रदान करणार्‍या योजनेची निवड करण्यावर प्राधान्य द्यायला हवे. मुलांसाठी उपलब्ध असलेल्या विशिष्ट जीवन विमा योजनेत नियमित कालावधीनंतर लाभधारकास ठराविक रक्कम प्रदान केली जाते. यास मनी बॅक पॉलिसी योजना असे म्हणतात.

मुलांच्या भविष्यातील ध्येय लक्षात घेता अशा प्रकारच्या पॉलिसीची निवड करावी की जेणेकरून शिक्षण कालावधीत अवांतर शिक्षणासाठी पैसा उपलब्ध राहील. 

योजनेचा अधिकाधिक लाभ : आपण निवडलेल्या आर्थिक याजनेतील पैशाचा वापर हा मुलांचे उच्चशिक्षण, विवाह याबरोबरच अन्य आर्थिक गरजा भागवण्यासाठी देखील करता येऊ शकतो. तसेच भविष्यात कर्ज मिळणे सुलभ व्हावे यासाठी कॉलेटरलच्या रूपाने (गहाण) हा निधी सादर करता येतो. लाभार्थीला योजनेच्या शेवटच्या काळात एक ठराविक रक्कम मिळते. त्याचा वापर करून शैक्षणिक कर्ज म्हणून करता येतो. कॉलेटरल निधीच्या आधारावर शैक्षणिक कर्जाची रक्कम निश्‍चित होते. हप्त्यात सवलत : जर आपण नोकरदार किंवा कमावते व्यक्ती असाल तर आपल्या पाल्यासाठी विमा असणे आवश्यक आहे. मुलाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कोणतीही तडजोड करू नये. यादृष्टीने चाइल्ड इन्शुरन्स प्लॅन प्रीमियममध्ये मिळणार्‍या सवलतीचा लाभ पालकांना मिळू शकतो. दुदैवाने पालकाचा मृत्यू झाल्यास अशा प्रकारची पॉलिसी उपयुक्त सिद्ध होऊ शकते.कारण पालकांच्या दुदैवी मृत्यूनंतर त्याचा विमाहप्ता कंपनी भरत असते आणि त्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ती रक्‍कम लाभार्थ्याला प्रदान करते म्हणून जीवन विमा पॉलिसीची निवड अशा पद्धतीने करावी की, त्याचा बोजा पाल्यावर पडू नये.

Back to top button