हवी आर्थिक शिस्त आणि सुरक्षित गुंतवणूक | पुढारी

हवी आर्थिक शिस्त आणि सुरक्षित गुंतवणूक

– प्रा. दीपाली चांडक

आपली जीवनशैली कशी आहे? आणि आपण आयुष्य जसे जगत आलो, तसेच जगण्यासाठी किती खर्च लागतो? दरमहा हातात जेवढा पैसा येतो, त्यातून सध्या जी जीवनशैली जगतो आहोत, अगदी तशीच जीवनशैली, आपले मासिक उत्पन्‍न बंद झाले तरी आपण जगू शकतो का? असा प्रश्‍न जर स्वत:ला विचारला तर उत्तर येते ‘नाही.’ जसा निसर्गाचा नियम मुंगी पाळते आणि पावसाळ्याच्या कठीण दिवसांसाठी उन्हाळ्यात बचत करते. तसेच काहीसे आपणासाठी सुद्धा लागू होते. कारण जेव्हा आपण काम नाही करू शकणार, त्या दिवसांसाठी आज आपणास बचत करावी लागेल. पण, काळाचे आणि पैशाचे गणित बघता, नुसतीच बचत करून चालणार नाही. तर मग करावी लागेल, त्या बचतीतून आपणास योग्य अशी गुंतवणूक. सहजसोप्या पद्धतीने होणारी बचत आणि त्याची अभ्यासपूर्ण गुंतवणूक आपल्या गरजा आयुष्यभर भागवता येतील, एवढा पैसा नक्‍की पुरवतात.

आपले उत्पन्‍न आणि खर्च : सर्वसामन्यपणे आपल्या उत्पन्‍नाच्या किमान 30 टक्के बचत करावी. परंतु, आयुष्याच्या विविध टप्प्यावर होणारी बचत वेगवेगळी असते कारण, या टप्प्यांवर उत्पन्‍न बदलते तसेच खर्चाचे प्रमाणसुद्धा बदलते. आणि नेमकी यांच्याच बद्दल स्पष्टता आवश्यक आहे. मासिक उत्पन्‍न व खर्चाची मांडणीचे अंदाजपत्रक (र्इीवसशीं) बनविणे अत्यंत आवश्यक असते आणि तीच तर असते बचत सुरू करण्याची प्रथम पायरी… आपले खर्च किंवा पैशांच्या घराबाहेर जाण्याच्या महत्त्वाच्या वाटा ओळखल्या आणि त्यातून उत्पन्‍नाचा एक भाग आधीच राखून ठेवल्यास बचत सहजरीत्या शक्य होते. कारण बचत आपणास करावयाची असते ती स्वतः होणार नसते. म्हणून उत्पन्‍न हातात आल्याबरोबर, आधी बचत करा आणि मग खर्च.

बचत : आर्थिक उद्दिष्टे गाठण्यासाठी, बचतीकडे तरुणपणापासूनच म्हणजे उत्पन्‍नाच्या अगदी प्रथम टप्प्यापासूनच लक्ष देणे आवश्यक असते. नियमित किमान मूल्याचे बचतीचे ध्येय आपणास नेहमी बचतीच्या मार्गावर टिकून राहण्यास प्रवृत्त करते. उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी बचत वाढवत जाणे आवश्यक असते, पण वयाच्या विविध टप्प्यांवर येणार्‍या वेगवेगळ्या जबाबदारी पार पाडताना, बचत वाढत जाईल की नाही हे सांगणे खूप अवघड आहे आणि त्यासाठी उत्तम मार्ग म्हणजे होत असणार्‍या बचतीची अभ्यासपूर्ण गुंतवणूक. पण, त्याने प्रश्‍न सुटत नाही कारण योग्य गुंतवणुकीचा पर्याय निवडणे तितकेच महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी हवी असते आपल्या आर्थिक उद्दिष्टांची स्पष्टता.

आपल्या जीवनातील आर्थिक उद्दिष्टांची स्पष्टता : मी कुठे आहे? आणि मला कुठे पोहोचायचे आहे? हे प्रश्‍न उद्दिष्ट्ये ठरविल्याशिवाय सुटत नाही. आपल्या गरजा कोणत्या? आयुष्यभर प्रत्येक गरजा पूर्ण करण्यासाठी किती रुपये लागतील हे जोपर्यंत ठरवणार नाही तोपर्यंत गुंतवणुकीचे योग्य पर्याय ठरविता येत नाही. उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी, पैशाच्या रूपात त्यांचे मूल्य ठरविणे महत्त्वाचे असते. आर्थिक उद्दिष्ट एकदा निश्‍चित केल्यानंतर त्यानुसार बचत व गुंतवणुकीचे नियोजन आणि त्यानुसार कृती आवश्यक ठरते. आपली आर्थिक उद्दिष्ट्ये, किती बचत करणे योग्य आहे? आपण करतो तितकी बचत पुरेशी आहे का? किती काळासाठी गुंतवणूक करावी लागेल? कोणते पर्याय निवडावे? अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे सहज देऊन जातात.

आपली नियमित गुंतवणूक : जर आपण नियमितपणे पैसे खर्च करू शकतो, तर बचत ही नियमित असावी आणि त्यातून करावयाची गुंतवणूक सुद्धा नियमितपणे केली पाहिजे. गुंतवणुकीचे पर्याय प्रत्येकासाठी सारखे नसतात. आपल्या आर्थिक उद्दिष्टांचा, जोखीम घेण्याच्या क्षमतेचा, इ. विविध घटकांचा अभ्यास करून मगच गुंतवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. आयुर्विमा योजना, बँकेतील मुदत ठेवी, भविष्य निर्वाह निधी, निधी, शेअर्स, म्युच्युअल फंड, सोने-चांदी, रिअल इस्टेट, इ. विविध अशा अनेक गुंतवणूक साधनांतून आपण गुंतवणूक करू शकतो.

आपले निवृत्तीसाठी नियोजन : निवृत्तीनंतरची उद्दिष्ट्ये निश्‍चित करावी आणि त्यांची तरतूद तरुण वयापासूनच करावी. तरुणपणी आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेला जोड देणारे, सुसंगत असे गुंतवणुकीचे पर्याय, निवृत्तीनंतर स्वावलंबी, आनंदी व निश्‍चिंतपणे जीवन जगण्यासाठी पुरेसे उत्पन्‍न मिळवून देण्यास समर्थ ठरतात.

(अर्थविषयक अभ्यासक तसेच मेनेजमेंट कन्सल्टंट)

Back to top button