रिलायन्स इंडस्ट्रीज : अर्थवार्ता | पुढारी

रिलायन्स इंडस्ट्रीज : अर्थवार्ता

* ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ चा समभाग दि.22 एप्रिल रोजी ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोहोचला. या समभागाने शुक्रवारी बाजाराच्या सत्रांतर्गत व्यवहारामध्ये आजवरची सर्वोच्च पातळी गाठत 2,802 रुपयांच्या पातळीला स्पर्श केला. शुक्रवारअखेर या समभागाने 2,759 रुपये किमतीवर बंदभाव दिला. एकूण सप्‍ताहाचा विचार करता, रिलायन्स इंडस्ट्रीज समभाग तब्बल 207 रुपये म्हणजेच 8.12 टक्क्यांनी वधारला. तसेच रिलायन्सच्या भांडवल बाजारमूल्याने 19 लाख कोटींचा विक्रमी टप्पा पार केला. गेल्या वर्षी म्हणजेच ऑक्टोबर 2021 मध्येही कंपनीचा समभाग 2,731.50 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. बाजार विश्‍लेषकांनी आगामी काळात किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. तर ‘मॉर्गन स्टॅन्ली’ यांनीही ‘रिलायन्स’ची किंमत ही सुमारे 20 टक्के वाढून 3,253 रुपयांपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज व्यक्‍त केला आहे.

* एलआयसीचा आयपीओ बाजारात आणण्याच्या द‍ृष्टीने केंद्र सरकारच्या हालचालींना वेग. या सप्‍ताहात सेबीकडे अंतिम कागदपत्रे सादर करणार. साधारण 5 टक्के हिस्सा विक्रीचे सरकारचे उद्दिष्ट आहे. या कंपनीचे सध्याचे मूल्य सुमारे 6 लाख कोटींदरम्यान असल्याचे विश्‍लेषकांचे मत. किंमत पट्टा सुमारे 1000 ते 1100 रुपये प्रतिसमभाग असण्याचा अंदाज. 12 मेपर्यंत आयपीओ बाजारात येण्याची शक्यता. आताच्या अंदाजानुसार आयपीओचा आकार सद्य:स्थितीत कमी होण्याची शक्यता.

* गतसप्‍ताहात निफ्टी व सेन्सेक्सने मोठ्या चढउतार अनुभवले. निफ्टी व सेन्सेक्समध्ये एकूण अनुक्रमे 303.70 अंक व 1141.78 अंकांची घसरण होऊन दोन्ही निर्देशांक 17171.95 अंक व 57197.15 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 1.74 टक्के, तर सेन्सेक्समध्ये 1.96 टक्क्यांची घट नोंदवली गेली.

* आर्थिक अडचणीत सापडलेली फ्यूचर रिटेल आणि रिलायन्स इंडस्ट्रीज उद्योग समूहाची उपकंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स यांच्यामधील कराराला फ्यूचर रिटेलच्या कर्जदात्या बँकांचा विरोध. ऑगस्ट 2020 मध्ये फ्यूचर रिटेल खरेदी करण्यासाठी रिलायन्स रिटेलने 24713 कोटी मोजले होते. परंतु फ्यूचर कंपनीमधील आधीपासूनचा गुंतवणूकदार अ‍ॅमेझॉनने यावर आक्षेप घेतला होता. याविरोधात अ‍ॅमेझॉन कंपनी सिंगापूर आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेली आणि हे प्रकरण कायद्याच्या कचाट्यात अडकले. दरम्यान, फ्यूचर एंटरप्राईजेस 2911.51 कोटींचा हफ्ता फेडण्यास असमर्थ ठरली. यामुळे कर्जदात्या बँकांनी दिवाळखोरी प्रक्रिया चालू करण्यासाठी दिवाळखोरी संबंधित प्रकरणे हाताळणारी नियामक सरकारी संस्था ‘एनसीएलटी’कडे धाव घेतली.

* देशातील महत्त्वाची आयटी कंपनी ‘एचसीएल टेक्नॉलॉजी’चे आर्थिक वर्ष 2022 चे चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर. निव्वळ नफा मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 226 टक्क्यांनी वधारून 3593 कोटींवर पोहोचला. मागील तिमाहीची तुलना करता नफ्यामध्ये 4.4 टक्क्यांची वाढ. कंपनीचा महसूल मागील वर्षीच्या तुलनेत 15 टक्क्यांनी वधारून 22597 कोटींनी वाढला.

* टेस्ला कंपनीचे प्रमुख आणि जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्‍ती इलॉन मस्क ट्विटर कंपनी खरेदी करण्यासाठी प्रयत्नशील. यासाठी इक्‍विटी व रोख्यांच्या माध्यमातून 46.5 अब्ज डॉलर्स मस्क यांनी तयार ठेवले आहेत. संपूर्ण ट्विटर खरेदी करण्यासाठी 43 अब्ज डॉलर्सचा प्रस्ताव याआधीच कंपनीकडे दिला असून, इलॉन मस्क वैयक्‍तिकरीत्या 33.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत. यापैकी 21 अब्ज डॉलर्स इक्‍विटी स्वरूपात, तर 12.5 अब्ज डॉलर्स टेस्ला कंपनीचे समभाग गहाण ठेवून त्याबदल्यात कर्ज स्वरूपात उभे करण्याची योजना आहे. उरलेले 13 अब्ज डॉलर्स मॉर्गन स्टॅन्ली बँक इलॉन मस्क यांना ट्विटर खरेदी करण्यासाठी कर्ज स्वरूपात देण्यास तयार आहे. ट्विटरमधील दुसरे प्रमुख गुंतवणूकदार सौदी अरेबियाचे राजपुत्र तलाल यांनी या व्यवहारास विरोध केला आहे. सध्या सौदीचे राजपुत्र तलाल यांच्याकडे ट्विटरचा 9 टक्के हिस्सा.

* देशातील महत्त्वाची एफएमसीजी कंपनी ‘नेस्ले इंडिया’चा निव्वळ नफा मागील वर्षीच्या तुलनेत 1.25 टक्के घटून 594.71 कोटी झाला. कंपनीचा महसूल मागील वर्षीच्या तुलनेत 10.24 टक्के वधारून 3980.70 कोटी झाला.

* मार्च 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत सिमेंट कंपनी ‘एसीसी’चा निव्वळ नफा 29.6 टक्क्यांनी घटून 396.33 कोटी झाला. कंपनीचे एकूण उत्पन्‍न 3.43 टक्क्यांनी वाढून 4485.01 कोटी झाले. इंधनाच्या दरांमध्ये वाढ झाल्याने प्रामुख्याने नफा घटल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले.

* शुक्रवारच्या सत्रात रुपया डॉलरच्या तुलनेत 25 पैसे कमजोर झाला. रुपयामागील 25 महिन्यांच्या सर्वांत कमजोर पातळीवर म्हणजेच 76.42 रुपये प्रती डॉलर किमतीवर बंद झाला. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह व्याजदर अर्ध्या टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या शक्यतेने जगभरातील चलन डॉलरच्या तुलनेत कमकुवत होत आहेत.

* 15 एप्रिल रोजी संपलेल्या सप्‍ताहात भारताची परकीय गंगाजळी 311 दशलक्ष डॉलर्सनी घटून 603.694 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली.

प्रीतम मांडके (मांडके फिनकॉर्प)

या पुरवणीत देण्यात येणारे गुंतवणुकीचे सल्ले, लेखक अभ्यास करून देत असतात. पण गुंतवणुकीत जोखीम ही असतेच. ती लक्षात घेऊनच गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा निर्णय आपल्या जबाबदारीवर घ्यावा.

Back to top button