स्टॉप लॉस ट्रेडिंगमधील हेल्मेट | पुढारी

स्टॉप लॉस ट्रेडिंगमधील हेल्मेट

भारतीय शेअर बाजारात नुकतीच झालेली मोठी घसरण सर्वांनीच पाहिली असेल. अर्थसंकल्पानंतर तेजीच्या दिशेने बाजाराचे मार्गक्रमण सुरू असताना अचानकपणाने त्याला ब्रेक लागला. रशिया-युक्रेन युद्धानंतर झालेल्या या घसरणीत बहुतांश समभागांत मोठी घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असणार्‍या निफ्टीमध्ये 52 आठवड्यांतील उच्चांकी पातळीपासून जवळपास 2000 अंकांची घसरण दिसून आली. शेअर बाजारात चढउतार हे नवे नाहीत. मात्र एकाएकी झालेल्या तीव्र घसरणीच्या काळात गुंतवणूकदारांना खूप मोठा फटका बसतो. ज्यांनी दीर्घकालीन द़ृष्टिकोन ठेवून शेअर्सची खरेदी केलेली असते, त्यांना याचा फटका बसत नाही. पण अल्पकाळासाठी गुंतवणूक केलेल्यांना किंवा इंट्राडे ट्रेडिंग करणार्‍यांना, ऑप्शन-फ्युचर्समध्ये ट्रेडिंग करणार्‍यांना अशा तीव्र घसरणीमुळे मोठे नुकसान सोसावे लागते.

घसरणीच्या शक्यता गृहीत धरून त्यामुळे होणारे नुकसान नियंत्रणात राहण्यासाठी शेअर बाजारात ट्रेडिंग करताना ‘स्टॉप लॉस’ हे टूल किंवा संकल्पना वापरली जाते.  रस्त्यावरून दुचाकी चालवताना ज्याप्रमाणे हेल्मेट परिधान केले असल्यास अपघातप्रसंगी आपले डोके शाबूत राहते, त्याचप्रमाणे बाजारात ट्रेडिंग करताना स्टॉप लॉस ठेवल्यास आपले होणारे नुकसान सीमित राखता येते.

या संकल्पनेच्या नावातून त्याची रचना कशी असेल हे लक्षात येते. स्टॉप लॉस म्हणजे ट्रेडिंग करताना आपल्याला किती प्रमाणापर्यंत नुकसान झालेले परवडू शकते, ती सीमारेषा होय. उदाहरणार्थ, आपण जर एखाद्या कंपनीचे 220 रुपयांचे 100 शेअर्स इंट्राडेमध्ये खरेदी केले असतील आणि अचानकपणाने त्या शेअर्सचा भाव घसरू लागला, तर मॅन्युअली आपल्याला कोणत्याही पातळीवरून ते ‘सेल’ करून बाहेर पडण्याचा मार्ग असतोच; परंतु बरेचदा घसरणीचा जोर इतका प्रचंड असतो की, आपल्याला संधी मिळेपर्यंत भाव खूप खाली गेलेला असतो. अशा वेळी जर आपण 210 रुपयांचा स्टॉप लॉस सेट करून ठेवला असेल, तर त्या शेअर्सचा भाव या पातळीवर आल्याबरोबर तुमचे शेअर्स आपोआप विकले जातात. मग त्यानंतर त्यामध्ये कितीही घसरण झाली अथवा तिथून ते पुन्हा वधारले तरी तुमचा व्यवहार संपुष्टात आलेला असतो.

विशेषतः निफ्टी किंवा बँक निफ्टीच्या ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जर तुम्ही ट्रेड करत असाल, तर स्टॉप लॉसचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे असते. अन्यथा लाखाचे बारा हजार व्हायला वेळ लागत नाही.
निफ्टी अथवा बँक निफ्टीच्या निर्देशांकात हल्ली 200 ते 250 अंकांची घसरण वारंवार दिसून येते. अशा वेळी एखाद्या व्यक्तीने जर स्टॉप लॉस लावलेला नसेल, तर त्याला याचा खूप मोठा फटका बसू शकतो. याऐवजी स्टॉप लॉस सेट केला असेल तर घसरण कितीही मोठी झाली तरी आपण त्यापूर्वीच निसटून गेलेलो असतो.

स्टॉप लॉस किती असावा याला ठोस असे निकष अथवा नियम नाहीत. प्रत्येक ट्रेडर्स आपापल्या जोखीम क्षमतेनुसार त्याची पातळी ठरवत असतो. स्टॉप लॉस ट्रिगर लावल्यानंतर भाव दहापैकी एक किंवा दोन वेळा सुधारण्याची शक्यता असते; पण आठ वेळा असा भाव घटत जात असतो.

स्टॉप लॉसचा वापर केवळ होणारे नुकसान मर्यादित राखण्यासाठीच होतो असे नाही, तर फायद्यासाठीही होतो. उदाहरणार्थ, वर उल्लेख केलेल्या शेअर्सचा भाव 220 रुपयांवरून 230 रुपयांवर गेला आणि तिथेच तो रेंगाळत राहिला किंवा एक-दोन अंकांनी खाली-वर होत राहिल्यास आपण तत्काळ 228 रुपयांचा स्टॉप लॉस सेट करून ठेवू शकतो. यामुळे सदर शेअरचा भाव जरी पुन्हा 220 रुपयांवर आला तरी 228 रुपयांच्या पातळीवर असताना आपला स्टॉप लॉस हिट होऊन आपल्याला प्रती शेअर 8 रुपये नफा मिळवून देऊन व्यवहार संपुष्टात आलेला असतो.

थोडक्यात, कोरोना काळात ज्याप्रमाणे मास्कचा वापर केला जातोय, अगदी तीच भूमिका स्टॉप लॉसचे टूल शेअर बाजारात ट्रेडिंग करताना पार पाडते. सामान्यतः आपण खरेदी केलेल्या भावापेक्षा 10 ते 20 टक्के वजा करून स्टॉप लॉसची पातळी ठेवली जाते. स्टॉप लॉस म्हणजे ट्रेडिंग करताना आपल्याला किती प्रमाणापर्यंत नुकसान झालेले परवडू शकते, ती सीमारेषा होय. विशेषतः निफ्टी किंवा बँक निफ्टीच्या ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जर तुम्ही ट्रेड करत असाल, तर स्टॉप लॉसचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे असते. अन्यथा लाखाचे बारा हजार व्हायला वेळ लागत नाही.

-सुधीर मोकाशे

Back to top button