Mental Health | आयुष्यातील समस्यांवर तोडगा काढता येऊ शकतो; जाणून घ्या कसे? | पुढारी

Mental Health | आयुष्यातील समस्यांवर तोडगा काढता येऊ शकतो; जाणून घ्या कसे?

डॉ. ईश्वरचंद गिलाडा

आपल्या आयुष्यात येणार्‍या विविध प्रसंगांना नि भावनांना समर्थपणे सहजतेने सामोरे जाण्याची क्षमता ज्या व्यक्तीमध्ये असते, अशा व्यक्तीला मानसिक स्वास्थ्य लाभले, असे म्हणता येईल; परंतु आपल्या आयुष्यात येणार्‍या सर्वच समस्यांना समाधानकारक उत्तरे मिळतात किंवा मार्ग सापडतात, असे होत नाही. ( Mental Health )

संबंधित बातम्या

सर्वच व्यक्तींमध्ये येणार्‍या प्रसंगांना समतोलाने, धीराने सामोरे जाण्याची कुवत असतेच असे नाही. एखाद्या तज्ज्ञ मानसशास्त्रीय सल्लागाराची मदत घेतली, तर मनावरचा ताण कमी होऊन समस्येवर निश्चितपणे तोडगा काढता येऊ शकतो; पण आपल्याकडे मनोविकारांबाबत मुळातच जागरुकतेचा अभाव आहे. यामुळेच देशात मानसिक आरोग्याचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे.

जोधपूर आयआयटीने अलीकडेच केलेल्या अभ्यासात ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. यात म्हटले आहे, मानसिक आरोग्याच्या समस्येची माहिती कुटुंबीयांना देण्याचे प्रमाण भारतात एक टक्क्यापेक्षा कमी आहे. हे विश्लेषण 75 व्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या आकडेवारीवर आधारित आहे.

ही आकडेवारी ग्रामीण अणि शहरी भागातील 5.55 लाखांपेक्षा अधिक लोकांशी केलेल्या चर्चेच्या आधारावर आहे. अभ्यासकांच्या मते, मानसिक आरोग्याबाबत समाजात चुकीच्या संकल्पना पसरलेल्या असून, त्या भीतीपोटी बरीच मंडळी मदत किंवा उपचार करण्याऐवजी मौन बाळगणे श्रेयस्कर मानतात आणि परिणामी समस्या वाढत जाते.

मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, भारतात अशा स्थितीला सर्वात मोठे कारण म्हणजे विभक्त कुटुंबांची संख्या वाढणे आणि व्यवसाय आणि कामाच्या निमित्ताने मोठ्या कुटुंबापासून दुरावणे. यामुळे मानसिक आरोग्याचा सामना करणार्‍या व्यक्तीला भावनिक सहकार्य मिळणे कठीण होत आहे.

पारंपरिक मोठ्या कुटुंबात ज्येष्ठ मंडळी ही समुपदेशक म्हणून भूमिका बजावत असत. ते कोणत्याही समस्येत सकारात्मक हस्तक्षेप करू शकत आणि त्यांचे म्हणणे मानलेही जात असे. परिणामी, मानसिक आरोग्यावर फारशी चर्चा करण्याची गरज भासत नसे; मात्र विभक्त कुटुंबांची संख्या वाढत गेल्यानंतर समुपदेशनाची गरज भासू लागली.

दोन व्यक्तींत संतुलत असेल आणि ते एकमेकांच्या समस्यांवरून संवेदनशील राहत असतील, तर आयुष्य सुकर आणि समाधानी राहू शकते; परंतु सध्याची स्थिती पाहता असे चित्र अपवादाने दिसते. परिणामी, अंतर वाढत जाते आणि समस्यादेखील. आजच्या काळातील जीवनशैली पाहिली तर कामकाजाची पद्धत, आर्थिक आव्हाने, धावपळ या गोष्टी मानसिक आरोग्यासमोर आव्हाने निर्माण करत आहेत आणि त्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

विशेष म्हणजे गरीब लोकांच्या तुलनेत श्रीमंत लोक आपली समस्या सांगण्यास आणि त्यावर तोडगा काढण्यात आघाडीवर असल्याचे अभ्यासातून निष्पन्न झाले आहे. यामागचे कारण म्हणजे श्रीमंत मंडळी ही आपल्या जीवनमान आणि आरोग्याबाबत अधिक सजग असतात. ते निरुपयोगी गोष्टींचा विचार करत नाहीत. ते आपली समस्या समुपदेशक आणि डॉक्टरांसमोर अधिक मोकळेपणाने मांडतात.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे पैसा असल्याने ते चांगल्या सुविधा घेतात आणि आपला खासगीपणा जपतात. या गोष्टींचा विचार करता सरकार आणि समाजाने मानसिक आरोग्याबाबतच्या जनजागृतीचा अधिकाधिक प्रसार करण्याबाबत अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.

साधारणपणे मानसिक आरोग्याबाबत चर्चा, सल्लामसलत, उपचाराची सोय सुविधा या गोष्टी शहरांमध्येच केंद्रित दिसतात. या जोडीला लहान गावांत, खेडोपाडी या गोष्टी उपलब्ध करून देणे तितकेच महत्त्वाचे आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच पंचायतींच्या माध्यमातून गावांत मानसिक आरोग्याबाबतचे समज आणि गैरसमज याबाबतची माहिती देणे, कार्यशाळेचे आयोजन करणे आणि सल्लागार मंडळ यासारख्या व्यवस्था करायला हव्यात.

2017 मध्ये ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्स’ने राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात सुमारे 19.73 कोटी जनता मानसिक आरोग्याचा सामना करत असल्याचे आढळून आले. हा खूप मोठा आकडा आहे. ताज्या आकडेवारीनुसार, 23 टक्क्यांपेक्षा कमी लोकांकडे मानसिक आरोग्याचा समावेश असलेला आरोग्य विमा आहे. गरीब वर्गात हा आकडा केवळ 3.4 टक्के आहे.

मानसिक आरोग्याच्या आघाडीवर सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत पाच टक्के अधिक खर्च खासगी रुग्णालयात करावे लागतात. एकंदरीत उपचाराचे सर्वाधिक प्रमाण खासगी रुग्णालयांतच अधिक दिसून येते. याचाच अर्थ सरकारी रुग्णालयांत सुविधांचा अभाव किंवा काही ठिकाणीच सुविधा आहेत, हे लक्षात येते. हा फरक कमी करणे आवश्यक आहे; अन्यथा आपण या मोठ्या आव्हानांचा मुकाबला करू शकणार नाहीत.

बदलत्या काळात मुलांमध्ये, किशोरवयीनांमध्येही मानसिक आजारांची समस्या वाढत असल्याचे आढळून येत असून, त्याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची नितांत गरज आहे. पहिल्या टप्प्यांतच त्याकडे लक्ष दिले नाही, तर आयुष्यभर त्यांना त्रास सहन करावा लागू शकतो. याबाबत पालक आणि शिक्षकांनी सजग राहणे आवश्यक आहे. काही शाळांत समुपदेशक नेमणे आणि कार्यशाळा आयोजित केली जाते. त्याची व्याप्ती वाढवणेदेखील तेवढेच गरजेचे आहे.

कुटुंबात पती आणि पत्नी, कार्यालयात अधिकारी आणि सहकारी कर्मचारी तसेच समाजातील नागरिकांत चांगले संबंध राहणे गरजेचे आहे. याखेरीज कुटुंबातील ज्येष्ठांनादेखील वेळ देणे गरजेचे आहे; अन्यथा त्यांना आपला पाल्य लक्ष देत नसल्याचे जाणवू लागते आणि कालांतराने ते मानसिक समस्येच्या गर्तेत अडकत जातात.

Back to top button