सतत सर्दी, खोकल्याचा त्रास! जाणून घ्या सायनसची लक्षणे आणि उपचार | पुढारी

सतत सर्दी, खोकल्याचा त्रास! जाणून घ्या सायनसची लक्षणे आणि उपचार

डॉ. प्राजक्ता पाटील

सायनस किंवा सायनोसाईटस ही समस्या सर्वसामान्यतः पहायला मिळते. सायनस असलेल्या लोकांना सतत सर्दी आणि खोकला होत असतो. हल्ली सायनस असणारे नवे रुग्ण सातत्याने समोर येत आहेत. ज्या लोकांना अ‍ॅलर्जिक सायनस असतो त्यांना हवेतील फुलांचे परागकण आणि सर्दीमध्ये धूर आणि धुके यांच्यामुळे त्रास होण्याचा धोका असतो. सुरुवात होताना सर्दी होते. मग प्रदूषणामुळे घशात खवखव होते. त्याचबरोबर नाक चोंदते, नाक वाहते तसेच ताप येणे असा त्रास होतो. ही लक्षणे अनेक दिवस कायम राहिल्यास सायनसची स्थिती गंभीर होते. आणि हा रोग सतत होत राहिल्यास सायनस तीव्र होऊ शकतो. त्यामुळे सुरुवातीची लक्षणे पाहून घरगुती उपचार केल्यास बरे वाटते; मात्र जास्त त्रास होत असल्यास वैद्यकीय सल्ला घेण्यास प्राधान्य द्यावे.

श्वास घेण्यास अडथळा, नाकातील हाड वाढणे आणि तिरके होणे. अ‍ॅलर्जी होणे ही सायनसची सामान्य लक्षणे आहेत. सायनसच्या मार्गात अडथळे आल्यास ही समस्या उद्भवते. अनेक नाकाच्या छिंद्रांमध्ये कफ साचल्याससुद्धा सायनस बंद होतात. तसेच संसर्गामुळे सायनसच्या आवरणाला सूज येते. त्यामुळे डोके, कपाळ, गाल आणि जबड्याच्या वरच्या भागात वेदना होऊ लागतात. बर्‍याचदा यामुळे अस्वस्थता येते आणि उच्च रक्तदाबाचा त्रासही होऊ शकतो.

सायनसची लक्षणे : सायनस झाल्यावर आवाजात बदल होतो, डोकेदुखी आणि जडपणा वाटतो. ताप येणे, डोळ्यांच्या वरच्या भागात वेदना होणे, वास न येणे, तोंडाची चव बिघडणे तसेच केस पांढरे होणे आदी लक्षणे दिसून येतात.

बचाव कसा कराल?

अ‍ॅलर्जीपासून वाचण्यासाठी धुळीपासून दूर रहावे. शक्यतो अवजड फर्निचर करणे टाळावे तसेच गाद्यांचा वापर कमी करावा.
उश्या, गाद्या, कार्पेट यांची नियमित साफसफाई करावी. गालिचे, जाजम यांची नियमित साफसफाई करावी. तसेच परफ्युम, डिओ यांच्या सुगंधापासून दूर रहावे. घरातील वायुविजन व्यवस्था योग्य असावी. दारे, खिडक्या यामधून हवा खेळती राहील याकडे लक्ष द्यावे.
वाफ घ्यावी आणि डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

Back to top button