चाळिशीमध्ये होणारा संधिवाताचा त्रास | पुढारी

चाळिशीमध्ये होणारा संधिवाताचा त्रास

डॉ. अनुप खत्री

जसजसे वय वाढते तसतसे आपले स्नायू कमकुवत होतात. चाळिशीत प्रवेश केल्यावर हळूहळू आपली हाडे ठिसूळ होतात. संधिवातासारखी परिस्थिती ही वाढत्या वयानुसार चिंतेची बाब ठरू शकते.

संधिवात टाळण्यासाठी आणि चाळिशीनंतर निरोगी राहण्यासाठी खालील टिप्स वापराव्यात.
सक्रिय राहा : नियमित व्यायामामुळे सांधे लवचिक राहण्यास मदत होते. वर्कआउट, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि लवचिकता वाढविणारे व्यायाम प्रकार करायला विसरू नका. पोहणे, सायकलिंग आणि योगा यासारखे व्यायाम सांध्यांना बळकटी आणण्यास मदत करतात.

वजन नियंत्रित राखा : जास्त वजनामुळे सांध्यांवर विशेषत: गुडघे, नितंब आणि मणक्यांवर अनावश्यक ताण पडतो. संतुलित आहार आणि नियमित व्यायामामुळे वजन नियंत्रणात राखण्यास मदत होते आणि सांधेदुखीचा धोका देखील कमी होतो.
संतुलित आहाराचे सेवन करा : तुम्ही जे पदार्थ खातात ते तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. फळे, भाज्या, फॅटी फिश (जसे सॅल्मन आणि मॅकरेल), सुकामेवा आणि तेलबियांचा आहारात समावेश करा. या खाद्यपदार्थांमध्ये आढळणारे ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड सांध्यामधील जळजळ कमी करतात.

सांध्यांचे संरक्षण करा : जड वस्तू उचलताना विशेष काळजी घेणे, विशिष्ट पद्धतीचा वापर करणे, वस्तू उचलताना तुमचे गुडघे वाकवा आणि तुमच्या सांध्यांवर जास्त ताण देऊ नका. खांद्यावरील आणि पाठीचा ताण कमी करण्यासाठी बॅकपॅकचा वापर करा.

संबंधित बातम्या

वार्म-अप आणि स्ट्रेचिंग : व्यायाम करण्याआधी स्ट्रेचिंग करा. वार्म-अपमुळे स्नायूंमधील रक्त प्रवाह वाढतो आणि सांध्याची लवचिकता सुधारते. रोज स्ट्रेचिंग केल्याने तुमचे सांध्याचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते.

हायड्रेटेड राहा : तुमच्या सांध्यांना वंगणासाठी योग्य हायड्रेशनची गरज असते. पाणी सायनोव्हियल द्रवपदार्थ तयार करण्यास मदत करते, जे सांध्यांना वंगण घालण्यास आणि हालचाली दरम्यान घर्षण कमी करण्यास मदत करते. नेहमी हायड्रेटेड राहणे गरजेचे आहे.

सांध्यांची योग्य काळजी घ्या : सहायक उपकरणांचा वापर करा. गुडघ्यासाठी ब्रेसेस, मनगटाला आधार देणारी किंवा एर्गोनॉमिक साधने यांसारखी सहायक उपकरणे वापरण्याचा प्रयत्न करा. ही उपकरणे सांध्यावरील ताण कमी करण्यास आणि इजा टाळण्यास मदत करू शकतात.

नियमित तपासणी करा : तुमच्या आरोग्यावर लक्ष ठेवा. प्रारंभिक चिन्हे शोधण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी गरजेची आहे. सतत सांधेदुखी किंवा अस्वस्थता जाणवत असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यायला विसरू नका.

आनुवंशिक इतिहास जाणून घ्या : कोणत्याही आजारास प्रतिबंध करताना त्याचा कौटुंबिक इतिहास महत्त्वाचा असतो.जर तुमच्याकडे संधिवाताचा कौटुंबिक इतिहास असेल तर, निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा आणि तुमच्या सांध्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या.

संधिवात समजून घ्या : संधिवात साठी जोखीम घटक आणि प्रतिबंधात्मक उपाय समजून घेणे गरजेचे आहे. संधिवात, त्याचे विविध प्रकार आणि त्याबाबत असलेल्या संशोधनाबद्दल माहिती मिळवा. सांधे निरोगी राखण्याकरिता त्याविषयी पुरेशी माहिती असणे गरजेचे आहे. चाळिशीत संधिवात टाळण्यासाठी सक्रिय जीवनशैली बाळगणे, वजन नियंत्रित राखणे आणि संतुलित आहाराचा अवलंब करणे गरजेचे आहे. सांध्यांची योग्य काळजी घेतल्यास भविष्यातील सांधेदुखीवर मात करता येते.

Back to top button