Diet in Monsoon : पावसाळ्यात पचन शक्ती मंदावते, उत्तम आरोग्यासाठी आहार कसा असावा? जाणून घ्या 'या' गोष्टी | पुढारी

Diet in Monsoon : पावसाळ्यात पचन शक्ती मंदावते, उत्तम आरोग्यासाठी आहार कसा असावा? जाणून घ्या 'या' गोष्टी

डॉ. अजय भिऊंगडे

आयुर्वेद प्रामुख्याने कुठलाही आजार होण्यास प्रतिबंध व्हावा, यावर जास्त जोर देतो व यामुळेच दिनचर्या, ऋतुचर्या, आहर यांचे सविस्तर वर्णन आयुर्वेद संहितांमध्ये आढळून येते. ऋतुमान बदलेले की, शरीरावर त्याचे काही चांगले, तर काही विपरित परिणाम दिसून येतात. अशा वेळी ऋतूनुसार दिनचर्येत व आहारात बदल केल्यास ऋतूबदलाचा शरीरावर फारसा परिणाम होत नाही व शरीरबल व्याधीक्षमत्व उत्तम राहते. अशा ऋतूनुसार राहणीमान व आहारातील बदलांचे सविस्तर वर्णन आयुर्वेदात आहे. यालाच ऋतुचर्या असे म्हणतात. ( Diet in Monsoon)

वर्षा ऋतू हा प्रामुख्याने उत्तरायनामध्ये येणारा ऋतू असून, या काळात शरीर बल हे कमी असते. तसेच जठाराग्नी मंद झाल्यामुळे पचन शक्तीदेखील मंदावते. यामुळेच शरीरामधील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. ( Diet in Monsoon)

हा काळ वात दोषाच्या प्रकोपाचा असून, या काळात शरीरातील वाताचे प्रमाण वाढते व तो वातविकारांना वाढवितो किंवा उत्पन्न करतो. पचनशक्ती कमी झाल्याने पचनाचे विकार बळावतात. वात प्रकोपास पोषक वातावरण असल्यामुळे वाढलेला वात हा संधीवात, आमवात, दमा, मणक्याचे विकार, ज्वर, त्वचाविकार अशा आजारांना उत्पन्न करतो किंवा वाढवितो तसेच या काळातील दूषित पाण्यामुळे अतिसार, काविळ, त्वचाविकार, मलेरिया, टायफॉईड असे विकार उत्पन्न होतात. यासाठी हे सर्व टाळण्यासाठी व वर्षा ऋतूतदेखील आरोग्य चांगले राहण्यासाठी आयुर्वेद ग्रंथांमध्ये आहार व राहणीमान यांचे पालन करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

आहार कसा असावा :

1) या ऋतूमध्ये आहार हा ताजा व गरम सेवन करावा. फ्रीजमधील पदार्थ, पेय व भाज्या खाणे टाळावे.

2) वेगवेगळ्या डाळींचे किंवा मांस पदार्थाचे युष (सुप) हे पाचक व जाठराग्निवर्धक असल्याने त्यांचे सेवन करावे. कडू, तुरट व तिखट पदार्थ या ऋतूत कमी प्रमाणात सेवन करावे.

3) आहारात पचण्यास हलक्या व ताज्या पदार्थांचा समावेश करावा. यात तांदूळ, गहू तसेच विविध डाळी भाजून यापासून वेगवेगळे पदार्थ बनवून सेवन करावेत.

4) या ऋतूमध्ये मांसाहार टाळावा कारण, पचनशक्ती मंदावलेली असते तसेच मांसदेखील दूषित असण्याची संभावना असते.

5) हिरव्या पालेभाज्या या ऋतूमध्ये दूषित असतात व त्यावर जीवाणू विषाणूंची अतिरिक्त वाढ होत असते. त्यामुळे हिरव्या पालेभाज्या कमी किंवा स्वच्छ धुवून वापराव्यात.

पावसाळ्यातील पथ्यकर आहार

नवीन धान्य हे पचनास जड असते. याउलट जुने धान्य हे पचनास हलके असते.

2) उष्णोदक (गरम पाणी) : अग्निसंस्कारामुळे पाणी हे पचनास हलके होते. तसेच वात व कफ दोषाचे शमन करते.

3) लघुभोजन : या ऋतूमध्ये अग्नी मंद असतो. म्हणून लघुभोजन (पचनास हलके) करणे योग्य.

4) लसून : हे रसायन आहे. लसून खाल्यामुळे कफवात दोषाचे शमन होते व श्वसनाचे विकार दूर करते.

5) मध : मध हे वर्षा ऋतूत खाणे अत्यंत गुणकारी असते ते वातदोषाचे शमन करण्यास मदत करते.

6) बाहेरचे तळलेले पदार्थ खाण्याचे शक्यतो टाळावेत.

पावसाळ्यातील राहणीमान

1) या ऋतूमध्ये जास्त पावसात जाणे टाळावे. जाणे झालेच तर छत्री/रेनकोट यांचा वापर करावा. घरी परत आल्यावर अंग व केस कोरडे करून घ्यावेत.

2) कपडे योग्य न सुकल्यामुळे बर्‍याचदा त्यात आर्द्रता असते व असे कपडे परिधान केल्यास त्वचाविकार होण्याची शक्यता असते. सुकलेले कपडे वापरणे योग्य.

3) स्नानापूर्वी कोमट तेलाने अभ्यंग केल्यास शरीरातील वात कमी होण्यास मदत होते.

4) अपरिचीत जलाशयात स्नान करणे टाळावे, खोलीचा अंदाज नसल्याने जीवितास धोका संभवतो.

5) जास्त शारीरिक श्रम व रात्री जागरण करणे टाळावे. वर्षा ऋतू (पावसाळा) हा आजार होण्यास पोषक ऋतू असल्याने सर्वात जास्त साथीचे किंवा संसर्गजन्य आजार या ऋतूत होतात, योग्य ऋतुचर्या पालन केल्यास या ऋतूमध्येही आपले आरोग्य चांगले राहील व हा ऋतूही आनंदी, आल्हाददायक व निरोगी जाईल.

Back to top button