टायफॉईड ची प्रमुख लक्षणे आणि त्यावरील उपचार | पुढारी

टायफॉईड ची प्रमुख लक्षणे आणि त्यावरील उपचार

डॉ. महेश बरामदे

पावसात अनेक प्रकारचे बॅक्टेरिया सक्रिय असतात. यापैकी ‘साल्मोनेला टायफी’, ‘साल्मोनेला परायइफी ए’ आणि ‘बी’ या बॅक्टेरियांपासून टायफॉईड होऊ शकतो. टायफॉईडचा ताप कोणत्याही वयाच्या व्यक्तीला येतो. रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असल्यास आणि स्वच्छता न बाळगल्यास लहान मुलांना इन्फेक्शनची शक्यता अधिक राहते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दरवर्षी सुमारे 2 कोटी नागरिकांना टायफॉईडचा आजार होतो आणि यामध्ये सुमारे दीड लाख जणांचा मृत्यू होतो.

एखादा व्यक्ती शौचानंतर योग्यरितीने हात धुवत नसेल किंवा स्वच्छतेची निगा न राखता भोजन करत असेल तेव्हा त्यास टाइफॉईड होण्याची शक्यता अधिक असते. टाइफॉईडचे जीवाणू पाणी किंवा कोरड्या ठिकाणी आठवडाभरापर्यंत जीवंत राहू शकतात आणि संपर्कात येणार्‍या कोणत्याही व्यक्तीला बाधित करू शकतात. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने आजार पसरू शकतो.
संसर्ग झाल्यानंतर हे बॅक्टेरिया रुग्णांच्या आतड्यात पोहोचतात आणि हा संसर्ग दहा ते चौदा दिवसांत दुप्पट होतो. तो पचनशक्तीवर परिणाम करतो. तसेच हे बॅक्टेरिया रक्तात मिसळून लिंफनोडस, गॉलब्लॅडर लिव्हरमध्ये पोहोचतात.

प्रमुख लक्षणे

टाइफॉईड मध्ये सर्वात आढळून येणारे लक्षण म्हणजे अतिताप येणे. थंडी वाजण्याबरोबरच तापात चढ-उतार येणे, पोटदुखी, उलट्या, थकवा आणि अशक्तपणा जाणवणे. याखेरीज डोकेदुखी, अंगदुखी, भूक कमी लागणे, शौचात रक्त पडणे यासारखी लक्षणे देखील असू शकतात.

संसर्ग झाल्यानंतर दुसर्‍या आठवड्यात छातीच्या खालच्या भागात आणि पोटावर लाल चट्टे दिसू शकतात. हृदयाच्या ठोक्याची गती कमी होते. त्यास ब्रॅडिकार्डिया असेही म्हणतो. बाधित व्यक्तीला बद्धकोष्टतेचा त्रास होतो. लिव्हरवर सूज येते. आतड्यात बॅक्टेरियल इन्फेक्शन वाढू लागते. बॅक्टेरियाच्या विषस्रावामुळे तिसर्‍या आठड्यात डायरिया (अतिसार) होतो आणि वजन कमी होऊ लागते. रुग्णांच्या आतड्यात अल्सर होतो.

निदान

टायफॉईडच्या तपासणीसाठी सीबीसी काऊंट, ब्लड कल्चर, बोन मॅरो कल्चर, यूरियन कल्चर आणि स्टूल कल्चरची चाचणी केली जाते. याशिवाय टाइफी आयजीएन चाचणी देखील केली जाते. या चाचण्या चार ते पाच दिवसांच्या तापानंतर केल्या जातात.

उपचार

सामान्यतः डॉक्टरांकडून माईल्ड स्टेजवरील टायफॉईड मध्ये ओरल अँटिबायोटिक्स मेडिसिन देण्यात येतात. रुग्णाने या अँटिबायोटिक्सचा कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे; अन्यथा बरे होण्यास वेळ लागू शकतो किंवा पुन्हा ताप येण्याची शक्यता राहते. ही औषधे घेऊनही रुग्णाच्या स्थितीत सुधारणा झाली नाही तर त्याला रुग्णालयात अ‍ॅडमिट करण्याची गरज भासू शकते.

गंभीर किंवा गुंतागुंत झाली असेल तर रुग्णाला ब्लड इंट्राव्हेस किंवा आयव्हीच्या माध्यमातून ग्लुकोज आयव्ही फ्लूड आणि अँटिबायोटिक इंजेक्शन देण्यात येते. याशिवाय सिम्टोमॅटिक थेरेपी देखील देण्यात येते. गंभीर प्रकरणात रुग्णाला स्टेराईड देण्यात येते. रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर देखील डॉक्टरच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे. जेणेकरून गंभीर स्थिती उद्भवणार नाही.

आहार कसा असावा

टाइफॉईडच्या रुग्णाला लिक्विड डायट अधिकाधिक देणे गरजेचे असते. यामध्ये डाळीचे पाणी, ताक, नारळाचे पाणी, ज्यूस, हलके भोजन आहारात असावे. दलिया, खिचडीचे सेवन करता येऊ शकते. मूगडाळ, दही हे फायदेशीर आहे. प्रत्येक शौचानंतर इलेक्ट्रोलाईटस्/ओआरएसचा डोस द्यायला हवा. हंगामी फळे आणि ज्यूसचे अधिकाधिक सेवन करावे. डबल टोंड दूध किंवा दूध घेता येऊ शकते.

लसीने बचाव करा

लस घेऊन आपण टायफॉईड पासून बचाव करू शकतो. पहिली लस टाइफॉईड काँजूगेट व्हॅक्सिन (टीसीव्ही) ही सहा महिन्यांच्या बाळापासून 45 वयोगटातील व्यक्तीपर्यंत देता येऊ शकते. दुसरी लस अनकाँजूगेट लस म्हणजेच ‘व्ही-पीएस’ 2 वर्षांच्या मुलाला दिली जाते.

दोन वर्षांनंतर दर तीन वर्षांनी 18 वर्षांपर्यंत आणि नंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लस घ्यायला हवी. तिसरी लस ‘ओरल लाईव्ह टीवाय 21 ए’आहे. ही लस 6 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील मुलांना दिली जाते.

Back to top button