Diabetes : मधुमेहावर नियंत्रण ठेवायचेय? मग, हे टाळा… | पुढारी

Diabetes : मधुमेहावर नियंत्रण ठेवायचेय? मग, हे टाळा...

Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी काही पदार्थ टाळावेत. ते न टाळल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेह हा देशात वाढलेला एक प्रमुख आजार आहे. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. या आजारावर वेळीच उपचार न केल्यास शरीरात इतर अनेक आजार उद्भवू शकतात. रक्तात दीर्घकाळ ग्लुकोजची उपस्थिती धोकादायक आहे. यामुळेच मधुमेही रुग्णांनी आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे.

मधुमेहामध्ये सर्वाधिक टाळण्याची गरज असलेली बाब म्हणजे साखर किंवा साखरेपासून बनवलेल्या वस्तू. साखरेपासून बनवलेल्या गोष्टींचा विचार केल्यास मधुमेहींना अनेकदा काय खावे आणि काय खाऊ नये, याबाबत संभ्रम असतो. जास्त साखरेचे पदार्थ मधुमेहाच्या रुग्णांसाठी विषापेक्षा कमी नाहीत. कारण, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते.

Diabetes : दुधाची चव वाढवण्यासाठी अनेकदा त्यात वेगवेगळ्या गोष्टी टाकल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे चॉकलेट. बरेच लोक दुधात चॉकलेट मिसळतात. त्यात भरपूर साखर असते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी लगेच वाढू शकते. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांनी चॉकलेट दूध पिणे आवर्जून टाळावे. दह्याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. आतड्यांसाठी ही संजीवनी औषधी वनस्पतीपेक्षा कमी नाही; मात्र दह्यामध्ये कोणत्याही प्रकारची चव मिसळून सेवन करणे धोकादायक आहे. चवीचे दही मधुमेहाच्या रुग्णांची समस्या वाढवू शकते. चवीच्या दह्यात कृत्रिम साखर असते. ती थेट रक्तात जाते आणि साखरेची पातळी वाढवते.

जास्त प्रमाणात कॉफी पिणे नेहमीच धोकादायक मानले गेले आहे; पण काही लोक त्यात चवीसाठी काही पदार्थ घालून अधिक धोकादायक बनवतात. चवीच्या कॉफीमध्ये असलेल्या साखरेमुळे रक्तातील साखरेची पातळी त्वरित वाढू शकते. यामुळेच चवीची कॉफी आरोग्यासाठी घातक आहे. मधुमेहाच्या रुग्णांना नेहमी अशी फळे टाळण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामध्ये साखरेचे प्रमाण आधीच जास्त असते. आंबा आणि अननस यासारख्या फळांमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. फळे साखरेची पातळी अचानक वाढवू शकतात. लोक बरेचदा ब्रेड, समोसा, चाउमीन यासारख्या फास्टफूडमध्ये टोमॅटो सॉस मिसळून खातात; पण केचपमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे साखरेची पातळी वाढू शकते. Diabetes

डॉ. दिलीप बागल

Back to top button