निद्रानाश? वेळीच ’जागे’ व्हा! | पुढारी

निद्रानाश? वेळीच ’जागे’ व्हा!

डॉ. मनोज कुंभार

झोप न लागणे हा आजार नव्हे; मात्र सातत्याने झोप न लागण्याची समस्या डोके वर काढत असेल, तर डॉक्टरांना भेटलेले बरे; कारण हीच समस्या निद्रानाशाचा कायमस्वरूपी आजार जडण्यास कारणीभूत ठरते.

कामकरी स्त्री-पुरुषांना सात ते आठ तास शांत झोप आवश्यक असते; मात्र व्यस्त जीवनशैली आणि ताणतणावांमुळे झोप हळूहळू कमी होऊ लागते. नंतर अचानक जाणवते की झोप गायबच झाली आहे. या परिस्थितीचा कामकाजावर आणि सामाजिक जीवनावर प्रतिकूल परिणाम होत असल्याने झोपेच्या बाबतीत वेळीच ‘जागे’ होणे गरजेचे असते.

निद्रानाश ही जगभरातील अनेकांना सतावणारी समस्या आहे. कोणत्याही वयातील पुरुषाला किंवा स्त्रीला ही समस्या जाणवू शकते.स्निद्रानाशाची व्याख्या तशी सोपी आहे. झोप न लागणे किंवा प्रदीर्घकाळ झोपू न शकणे म्हणजे निद्रानाश होय. निद्रानाशाचे अनेक प्रकार असून, अनेकांच्या द़ृष्टीने ही समस्या वेगवेगळी असू शकते. अल्पावधी किंवा तीव— निद्रानाश हा एक प्रकार आहे. हा त्रास काही दिवसांपुरताच जाणवतो. विशिष्ट औषधांचे सेवन किंवा जीवनशैलीतील छोट्याशा बदलामुळेही तात्पुरत्या स्वरूपात उद्भवतो. जर ही समस्या दीर्घकाळ पाठलाग करीत असेल आणि तुमच्या गुणवत्तांवर प्रतिकूल परिणाम करू लागली असेल, तर या समस्येची गांभीर्याने दखल घ्यायलाच हवी. अशा वेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतलाच पाहिजे. जर व्यक्तीला तीस दिवसांपेक्षा जास्त कालावधीत नीट झोप लागली नसेल, तर ती व्यक्ती चिरकालीन निद्रानाशाच्या विकाराचा बळी ठरली आहे असे ओळखावे. चिरकालीन निद्रानाशाच्या रुग्णाला ‘इन्सोम्नियाक’ या नावाने संबोधले जाते.

लक्षणे आणि परिणाम

1. झोप न लागणे : झोप न लागणे हे निद्रानाशाचे मूलभूत लक्षण आहे. चांगली झोप येण्यासाठी काही ः‘इन्सोम्नियाक’ आपल्या मनाने उपाय योजत राहतात. ‘दारूचे चार घोट घेतल्याने मला चांगली झोप लागते,’ असे म्हणणारे अनेकजण आपल्याला भेटतात. ‘इन्सोम्नियाक’ रुग्णांपैकी अनेकांना पहाटे लवकर जाग येते तर उर्वरित रुग्णांना रात्री काही मिनिटेच झोप लागते. अनेक दिवस झोपूच न शकलेल्यां रुग्णांची पीडा पाहून आपण निद्रानाशाच्या आजाराचे उग्र स्वरूप समजून घेऊ शकतो.

2. थकवा असूनही जागरण : रात्री चांगली झोप न लागल्याने सकाळचा ताजेपणा अनेकजण अनुभवू शकत नाहीत, हे चिकित्सकांनी प्रमाणित केलेले वास्तव आहे. पुरेशा झोपेअभावी शरीराच्या चयापचय संस्थेला नुकसान सहन करावे लागते. जाग आल्यावर डोके जड वाटणे, सुस्ती जाणवणे अशी लक्षणे यामुळे दिसतात. झोपेतून उठल्यानंतरही सुस्ती येणे आपले आपल्यालाच अजब वाटते.

3. दिवसा सुस्त राहणे : निद्रानाश जडलेल्या व्यक्ती दिवसभर सुस्त जाणवणे, हे सर्वसाधारण लक्षण आहे. अनेकांमध्ये ते दिसून येते. या अवस्थेत अनेकदा दिवसभर मनही अस्वस्थ असल्याचे जाणवत राहते. दिवसभर सुस्ती राहिल्यास त्याचा संबंधित व्यक्तीच्या कामावर आणि सामाजिक जीवनावर अत्यंत प्रतिकूल परिणाम होण्यास सुरुवात होते.

4. चिडचिडेपणा आणि स्वभावात बदल : जेव्हा एखाद्या व्यक्तीची झोप पूर्ण होत नाही, तेव्हा त्याच्या स्वभावात चिडचिडेपणा येणे स्वाभाविक आहे. अशा व्यक्तींना राग लवकर येतो. शिवाय ते चिंता आणि निराशेच्या आहारी जाऊ शकतात. त्यांची वर्तणूक सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा वेगळीच असते. अशा व्यक्तींना कोणत्याही गोष्टीत लक्ष एकाग्र करण्यात किंवा जुन्या गोष्टी आठवण्यात अडचणी येतात.

5. कायमस्वरूपी नैराश्य : निद्रानाशाचा विकार दुर्लक्षित केल्यास आणि तो दीर्घकालीन बनल्यास गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. अशी व्यक्ती कायमस्वरूपी नैराश्याच्या गर्तेत लोटली जाऊ शकते. या ठिकाणी नैराश्य या शब्दाचा अर्थ केवळ तात्पुरती मानसिक स्थिती असा नसून, वैद्यकीय परिभाषेतील नैराश्य अभिप्रेत आहे. अशा व्यक्तीच्या मेंदूतील ‘न्यूरोट्रान्समीटर’ क्षीण होतात.

झोपणे हे जेव्हा अत्यावश्यक काम आहे, असे वाटू लागते, तेव्हा निद्रानाशाच्या विकाराने आपल्याला घेरले आहे, असे समजावे. निद्रानाश ही भारतातील कामकरी स्त्री-पुरुषांसाठी एक जटिल समस्या बनत चालली आहे. खरे तर हा आजार नाही; परंतु जीवनशैलीच्या बदलांमध्ये मूळ असलेली ही प्रक्रिया आजाराचे रूप धारण करू शकते. चांगले काम करण्यासाठी, स्वास्थ्यवर्धक जीवनासाठी सात ते आठ तासांची झोप आवश्यक असल्याचे डॉक्टर सांगतात. परंतु नोकरी-व्यवसायातील ताणतणाव, व्यस्त दिनक्रम, स्पर्धेच्या अपरिहार्यतेचा परिणाम म्हणून ही झोप घेणे अनेकांना शक्य होत नाही आणि नंतर ते निद्रानाशाला बळी पडतात.

Back to top button