Colds and pneumonia : जाणून घ्या सर्दी आणि न्यूमोनिया बद्दल | पुढारी

Colds and pneumonia : जाणून घ्या सर्दी आणि न्यूमोनिया बद्दल

डॉ. अनिल मडके

थंडी आणि सदीं (Colds and pneumonia) यांचे नाते जवळचे असले तरी, सध्याचे वातावरण चोवीस तासांच्या कालावधीत वेगवेगळी रूपे धारण करत आहे. थंडी सुरू होतेय, असा संदेश घेऊन गेल्या आठवड्यात ‘वातावरण’ आले आणि सर्वजण थोडेफार गारठून गेले. पण एक-दोन दिवसांतच पुन्हा उकाड्याने डोके वर काढले आणि हे कमी म्हणून की काय, परवा चक्क पावसाने हजेरी लावली. हल्ली वातावरणसुद्धा लहरी झाले आहे. सकाळी उकाडा, दुपारी कडक ऊन नंतर ढगाळ वातावरण, संध्याकाळी पाऊस आणि रात्री सोयीनुसार थंडी असा आता ‘ऋतु- ऑल’ काळ आहे. जोडीला प्रदूषणाचाही पाठिंबा आहे.

परवाच्या मुंबईच्या प्रदूषण पातळीने दिल्लीलाही मागे टाकल्याची बातमी होती. त्यात पुणे, कोल्हापूर आणि सांगली खूप मागे असण्याच्या शक्यता नाहीत. सकाळी कोवळ्या उन्हात जाऊन ड जीवनसत्त्व घ्यावे म्हटले तर त्याऐवजी धुके किंवा धुरके भेटते आणि अशा वातावरणाचा कांहीना त्रास होतो. ज्यांना आधीपासून दमा, सीओपीडी, अॅलर्जी, सर्दी, सायनस, आयएलडीसारखे श्वसनविकार (Colds and pneumonia) आहेत, त्यांना अशा वातावरणाचा त्रास होण्याची भीती असतेच, पण अगदी धडधाकट लोकांनासुद्धा अशा वातावरणाचा सांसर्गिक प्रसाद मिळू शकतो. या वातावरणात अनेकांना सर्दी पडसे- शिंका नाक गळणे घसा खवखवणे अशा तक्रारी सुरू झालेल्या आहेत. जर तुम्हाला आधीपासूनच थंडीच्या काळात सर्दी- शिकांचा त्रास होत असेल तर, ही सर्दी वातावरणामुळे असण्याची शक्यता अधिक आहे. नाक गळणे, शिका, डोळ्यांतून पाणी येणे, नाक खाजवणे, घसा खवखवणे, डोळे चुरचरणे, कान खाजवणे अशी याची लक्षणे असतात. यात शक्यतो ताप नसतो. खोकला क्वचितच असतो. तुम्हाला आधीपासूनच दमा सीओपीडी, आय एल डी असेल तर मात्र, दम खूप लागतो, धाप लागते.

याउलट, एन्फ्लूएंझा म्हणजे साध्या फ्ल्यूच्या सर्दीमुळे (Colds and pneumonia) बारीक ताप, डोकेदुखी, अंगदुखी, कणकण, अशक्तपणा या तक्रारी उद्भवतात. नाक गच्च होते, चोंदते. काही लोकांनाही सायनसचा त्रास होतो. काही वेळा घसा खवखवतो. अशा तक्रारींकडे दुर्लक्ष न करता किंवा सेल्फ मेडिकेशनच्या मार्गाने न जाता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

वेळीच डॉक्टरांचा सल्ला किंवा औषधोपचार न घेतल्यास, श्वसनमार्गाच्या वरच्या भागातील जंतूसंसर्ग श्वासनलिकांमार्गे फुफ्फुसांमध्ये जातो आणि न्यूमोनिया होतो.

सुरुवातीला कोरडा खोकला येणे, खोकल्यातून थुंकी पडणे, पुढच्या टप्प्यात थुंकी पिवळसर किंवा हिरवट होणे, सुरुवातीला कमी असणारा दम अचानक वाढणे, छातीत दुखणे किंवा अस्वस्थ वाटणे, अचानक भरभरून ताप येणे अशी न्यूमोनियाची (Colds and pneumonia) लक्षणे असतात.

आपल्याभोवती अनेक सूक्ष्मजीव असतात. यामध्ये विषाणू, जिवाणू, बुरशी, परजीवी जंतू असे अनेकविध प्रकार असतात. रुग्णाचे वय, रुग्णाचा आजार, त्याची रोगप्रतिकारक्षमता आणि जंतूचा प्रकार यावर न्यूमोनियाची (Colds and pneumonia) तीव्रता अवलंबून असते. कोविडनंतरच्या काळात न्यूमोनियाचे स्वरूपसुद्धा काहीअंशी बदलून गेले आहे.

ज्यांना पूर्वी कोव्हिड होऊन गेला आहे, त्यांनी आपल्या श्वसनाच्या तक्रारींबद्दल जागरुक राहणे हे महत्त्वाचे ठरते. कारण अशा व्यक्तींमध्ये न्यूमोनिया वाढण्याचा वेग हा थोडा जास्त असू शकतो. काहीवेळा लक्षणे हुलकावणी देऊ शकतात. कोव्हिड होऊन गेलेल्या रुणांमध्ये रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होण्याची शक्यता अधिक असते. या गुठळ्या फुफ्फुसाच्या रक्तवाहिन्यांत किंवा शरीरातील कोणत्याही भागातल्या रक्तवाहिन्यांत असू शकतात. म्हणून जागरूकता महत्त्वाची.आपली फुफ्फुसे (Colds and pneumonia) स्पंजसारखी- फुग्यासारखी असतात. फुफ्फुसांच्या पेशींमध्ये हवा असते. जेव्हा या पेशी जंतूसंसर्गामुळे किंवा अन्य कारणांमुळे घट्ट होतात, तेव्हा त्याला न्यूमोनिया म्हणतात. न्यूमोनियाग्रस्त फुफ्फुसाच्या भागातून रक्तप्रवाहात प्राणवायूची देवाण-घेवाण होत नाही. परिणामी रुग्णाला दम लागतो, धाप लागते. जंतुसंसर्ग वेळीच आटोक्यात आणला नाही तर, तो इतरत्र पसरतो.

ज्येष्ठ वयस्कर रुग्ण, मधुमेही व्यक्ती, हृदयविकार, अँजिओप्लास्टी किंवा बायपास झालेल्या व्यक्ती, उच्चरक्तदाब, स्थूलपणा, दमा, सीओपीडी, ओएसए, आयएलडी, शरीरात कुठेही असलेला कर्करोग, ल्यूपस, संधिवात, थायरॉइड अशा कोणत्याही दीर्घकालीन आजाराने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींना न्यूमोनिया (Colds and pneumonia) त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे न्यूमोनियाची लक्षणे त्वरित ओळखून ताबडतोब उपचार घ्यावेत. न्यूमोनिया तीव्र असेल तर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागते. रक्तातील प्राणवायूची पातळी कमी होऊन रुग्ण अत्यवस्थ होऊ शकतो. म्हणून अशा कोणत्याही तक्रारीकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

वर नमूद केलेले आजार असलेल्यांनी आणि सर्व ज्येष्ठांनी गारठ्यात चालणे सध्यातरी टाळावे. गर्दीत जाताना नाकावर मास्क लावावा. शक्यतो हस्तांदोलन टाळावे.

तुमची रोगप्रतिकारक (Colds and pneumonia) क्षमता चांगली ठेवा. वेळेवर सकस आहार घ्या. ‘क’ जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. बाहेरचे खाणे शक्यतो टाळा. जेव्हा काही खाता तेव्हा ते उत्तम दर्जाचे आणि स्वच्छतेचे नियम पाळून तयार केले जाते की नाही आणि त्याच पद्धतीने ते वितरित केले जाते की नाही याकडे लक्ष द्या. नियमित व्यायाम, योगासने करा. पुरेशी विश्रांती झोप घ्या. जीवनशैली ही तणावमुक्त आणि आनंदी ठेवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमची सुरू असलेली औषधे नियमितपणे घ्या.

हेही वाचा :  

Online fraud : ॲपची लिंक ओपन करताच खात्यातून ९० हजार झाले गायब

Back to top button