थंडीत लोणी का खावे?, जाणून घ्या फायदे

थंडीत लोणी का खावे?, जाणून घ्या फायदे
Published on
Updated on

हिवाळ्यात लोणी सेवन करणे हे आरोग्याला लाभदायीच असते. अर्थात लोणी खातानाही आरोग्याची काळजी घेण्यासाठी बाजारातील बटर न खाता घरी दह्या-ताकापासून केलेले पांढरे लोणी जरूर खाऊ शकता. बाजारातील लोणी न खाण्याचे कारण म्हणजे त्यात असणारे मीठ. अती मीठ असल्याने ते आरोग्यासाठी फारसे चांगले नसते.

हिवाळा म्हटले की खाण्याचे विविध पर्याय डोळ्यासमोर येतात. साहजिकच आहे हिवाळा म्हटलं की उष्ण पदार्थ खाण्याकडे कल असतो. त्याचबरोबर अनेक भाज्या, फळेही बाजारात येतात. मुळातच हिवाळा हा आरोग्यवर्धक काळ मानला जात असल्याने आणि याच काळात भूकही बर्‍यापैकी प्रज्वलित असते. त्यामुळे विविध आरोग्यदायी पदार्थ खाऊन हिवाळ्यातील थंडीपासून बचाव करता येतो. जसे लोणी आणि बाजरीची भाकरी. कारण हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी पौष्टिकच आहेत. आता लोण्याचे नाव घेतले की कॅलरी कॉन्शस व्यक्ती ते खाण्यासाठी का कू करतील, पण हिवाळ्यात लोणी सेवनाचे फायदे समजून घेतले तर नक्कीच द़ृष्टिकोनात फरक पडू शकतो. लोणी हाडांच्या मजबुतीसाठी खूप गरजेचे असते.

हिवाळ्यात आहाराच्या सवयींमध्ये बदल करावा लागतो, कारण पोटाला उष्णतेची गरज असते. त्यामुळे बहुतेकांच्या घरी गरम गरम भाकरी, भाजी आणि लोणी असा बेत होतो. सध्याचा जमाना मोजून खाण्याचा म्हणजे कॅलरी कॉन्शस असण्याचा आहे. त्यामुळेच हल्ली लोक लोणी, तूप सेवन करण्यास नकारच देतात. परंतु हिवाळ्यात लोणी सेवन करणे हे आरोग्याला लाभदायीच असते. अर्थात लोणी खातानाही आरोग्याची काळजी घेण्यासाठी बाजारातील बटर न खाता घरी दह्या-ताकापासून केलेले पांढरे लोणी जरूर खाऊ शकता. बाजारातील लोणी न खाण्याचे कारण म्हणजे त्यात असणारे मीठ. अती मीठ असल्याने ते आरोग्यासाठी फारसे चांगले नसते. घरी काढलेले लोणी हे योग्य प्रक्रियेतून काढलेले असल्याने ते अर्थातच आरोग्यवर्धक असते. हिवाळ्यात पांढरे लोणी खाण्याचे फायदे जाणून घेऊया.

तयार लोणी नको : बाजारात मिळणारे तयार लोण्यामध्ये मिठाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे नियमितपणे त्याचे सेवन केल्यास शरीरात अतिरिक्त मीठ जाऊ शकते आणि रक्तदाब वाढू शकतो. घरच्या लोण्यामध्ये मीठ नसते, अगदीच गरज लागल्यास प्रत्येक व्यक्ती त्याला हवे तितके मीठ घेऊ शकते. अर्थात घरी काढलेल्या पांढर्‍या लोण्यात मीठ मिसळण्याची गरज नसते कारण ते तसेच चवदार लागते.

ट्रान्स फॅट कमीच : घरी काढलेल्या लोण्यामध्ये चरबीचे किंवा मेदाचे प्रमाण असते परंतु ते आरोग्यासाठी चांगले असते. तुलनेत बाजारातील बटरमध्ये ट्रान्स फॅट किंवा मेदाचे प्रमाण अधिक असते. घरी काढलेल्या लोण्यातील ट्रान्स फॅट वजन कमी करण्यास मदत करतात.

उष्मांकांचे प्रमाण कमी ः घरी तयार केलेले लोणी आणि बाजारातील तयार लोणी या दोन्हींमध्ये उष्मांकांचे प्रमाण अधिक असते. परंतु तुलनेत बाजारातील लोण्यामध्ये केवळ उष्मांक किंवा कॅलरी असतात तर पांढर्‍या लोण्यामध्ये जीवनसत्त्व आणि खनिजे देखील असतात. जी आरोग्यासाठी चांगली असतात.

लोण्यामध्ये संपृक्त मेद : घरात जे पांढरे लोणी काढतो त्यात संपृक्त वसा किंवा मेद असतेच. त्याचा संबंध वाढत्या हृदय रोगाची वाढती जोखीमीशी लावू शकतात. परंतु ही गोष्ट सत्य नसल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. अर्थात लोण्याचे सेवन करण्याचा सल्ला देत असताना ही गोष्ट लक्षात घेतलेली आहे. संपृक्त मेद किंवा चरबी ही पांढर्‍या लोण्यातील चरबी प्रमाणे हृदय रोग आणि स्ट्रोक किंवा लकवा या विकारांमध्ये संरक्षणात्मक प्रभावच पाडतात.

लोणी कसे काढावे ः घरी लोणी काढण्याची प्रक्रिया सोपी आहे. रोज दूध तापवल्यानंतर गार झाले की त्याची साय एकाच भांड्यात काढून घ्यावी. पुरेशी साय जमा होईपर्यंत म्हणजे दोन तीन कप साय जमा होईल एवढी साय एकत्र त्याच भांड्यात साठवावी, ती फ्रीज मध्ये ठेवावी. पाहिजे तेवढी साय जमा झाल्यानंतर ती बाहेर काढून त्याला विरजण लावून ती एक रात्र बाहेरच ठेवावी. त्यानंतर दुसर्‍या दिवशी सर्वसाधारण तापमानाला आल्यानंतर साय मिक्सरमध्ये फिरवावी किंवा रवीने घुसळावी. मग थोडे पाणी घातले की लोणी वर येऊ लागते.
वरील प्रक्रियेने उत्तम गुणवत्तेचे लोणी तयार होते. हे लोणी आपल्या डोळ्यासमोर तयार होते त्यामुळे भेसळ असण्याचाही संभव नाही. असे पांढरे लोणी हिवाळ्यात सेवन केल्यास आरोग्य चांगले राहाते. घरी काढलेल्या पांढर्‍या लोण्याचे फायदेही आता आपण पाहिले आहेत. त्यानुसार थंडीच्या काळात पांढर्‍या लोण्याचे जरूर सेवन करावे.

डॉ. भारत लुणावत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news