मूल अंगठा का चोखते? जाणून घ्या कारण आणि त्यावर उपाय | पुढारी

मूल अंगठा का चोखते? जाणून घ्या कारण आणि त्यावर उपाय

अंगठा चोखण्याची सवय अनेक लहान मुलांमध्ये नैसर्गिक रूपानेच येते. काही वेळेला ही सवय म्हणजे भूक लागल्याचा संकेत असतो. तर काही वेळेला अंगठा किंवा बोट चोखल्यामुळे मुलांना आरामदायक, सुरक्षित जाणीव होते; परंतु मूल मोठे झाल्यानंतर आई-वडिलांची चिंता योग्यच असते.

मूल लहान असते तोपर्यंत या सवयीचे काही वाटत नाही, पण मूल जसजसे मोठे होऊ लागते तसतसे ही सवय चिंतेचा विषय बनते. मुलांची ही सवय कशी सोडवावी, असा मोठा प्रश्न पालकांसमोर उभा राहतो. अंगठा चोखल्याने एन्डोफिन्स नावाच्या स्रावाची निर्मिती होते. त्यामुळे बाळाचा मेंदू शांत होतो आणि त्याला लवकर झोप येते; परंतु मूल मोठे झाल्यानंतर आई-वडिलांची चिंता योग्यच असते. कारण अंगठा चोखल्यानंतर वरच्या दातांचे हाड बाहेरच्या बाजूने येते. यामुळे मुलांचे दात वाकडे तिकडे होतात. दुधाचे दात योग्य वेळी पडले नाहीत किंवा वेळेपूर्वीच पडले किंवा जबड्याच्या मध्ये काही समस्या निर्माण झाली तर यामुळेही मूल अंगठा चोखते. अनेकदा सतत अंगठा चोखत राहिल्यामुळे पोटात नखांमधली घाणही जाते आणि बाळ आजारीदेखील पडू शकते.

मूल अंगठा का चोखते?

ज्यावेळी मुलांना भूक लागते तेव्हा ते आपले हातपाय हलवतात. याच दरम्यान अंगठा त्यांच्या तोंडात जातो. त्याला ते निप्पल समजून चोखायला सुरुवात करतात. मुलाचे पोट भरलेले नाही हे देखील या कृतीतून संकेत देते. सहा महिन्यांपर्यंत मूल भूक लागल्यानंतर अंगठा चोखते, पण पोट भरल्यानंतर देखील तो अंगठा तोंडात टाकत असेल तर ही सवय सोडणे गरजेचे असते. सर्वसामान्यपणे जी मुले स्तनपान करतात, त्यांच्यासाठी वीस मिनिटांचे फिडिंग पुरेसे असते, पण त्यानंतरही ते अंगठा चोखत असेल तर त्यांना काही वेळेसाठी आणखी स्तनपान करावे. कदाचित यामुळे ते अंगठा चोखणार नाहीत.

बहुतेकवेळा असे दिसून येते की जी मुले बाटलीने दूध पितात ती मुले मोठी झाल्यानंतर वीस मिनिटांत संपणारी बाटली दहा मिनिटांत संपू लागते. यामुळे तेदेखील अंगठा चोखू लागतात. मूल मोठे झाल्यानंतर त्याला शक्ती येते आणि त्यामुळे बाटलीचे निप्पल कमकुवत बनते. अशा वेळी मुलांना दूध पाजताना बाटली पकडून त्याची दूध पिण्याची गती नियंत्रित करावी किंवा अतिशय बारीक छिद्रे असणारे निप्पल त्याला लावावे. कारण यामुळे मुलांना दूध पिण्यास थोडा वेळ लागेल आणि ताकदही थोडी जास्त लागेल. त्यामुळे तो अंगठा चोखणार नाही.

Back to top button