

डॉ. भारत लुणावत
लसणाचा खरा प्रभाव मात्र त्याच्या वापराच्या पद्धतीवर अवलंबून असतो. तो कसा कापला जातो, किती वेळ ठेवला जातो, कसा शिजवला किंवा साठवला जातो, यानुसार त्याचे गुणधर्म बदलतात.
कच्चा लसूण हा प्रतिकारशक्तीसाठी सर्वात प्रभावी मानला जातो. लसूण ठेचल्यावर त्यातून आलिसिन नावाचा द्रव्य घटक बाहेर पडतो आणि हा घटक प्रतिजैविक, प्रतिदाहक आणि रोगप्रतिकार वाढवणारा असतो. लसूण ठेचून दहा मिनिटे ठेवून मग सेवन केल्यास हा घटक जास्त कार्यक्षम राहतो. लिंबूपाण्यात, चटण्यांत किंवा कोशिंबिरीत तो सहज वापरता येतो आणि संसर्गाशी लढण्यास शरीराला मदत होते.
थोडा परतलेला लसूणही शरीरासाठी उपयुक्त असतो. तूप किंवा सौम्य तेलात हलके परतल्यास लसणातील बहुतेक गंधकद्रव्ये सक्रिय राहतात आणि यामुळे यकृत शुद्धी, सूज कमी करणे आणि रक्तशुद्धी या क्रियांना मदत होते. दाल, भाजी किंवा हलक्या परतवलेल्या पदार्थांत वापरला जाणारा हा प्रकार चव आणि आरोग्य या दोन्ही द़ृष्टीने उत्तम ठरतो.
फर्मेंटेशनद्वारे तयार होणारा परिपक्व लसूण हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी विशेष लाभदायक मानला जातो. या प्रक्रियेत एस-अॅलिल सिस्टीनसारखे प्रतिऑक्सिडंट वाढतात आणि त्यामुळे कोलेस्टेरॉल संतुलन, यकृताचे कार्य आणि हृदयाची क्षमता सुधारते. दिवसातून एक ते दोन पाकळ्या सरळ खाणे किंवा कोशिंबीरीत मिसळून घेणे उपयुक्त राहते. अतिउष्णतेने लसणाची पोषणक्षमता कमी होते. म्हणजे, जास्त वेळ तळणे, अतितापावर परतणे किंवा खूप भाजणे यामुळे आलिसिन नष्ट होतो आणि लसणातील उपयुक्त द्रव्ये कमी कार्यक्षम बनतात. त्यामुळे लसूण वापरताना त्याचे आरोग्यदायी गुण टिकवण्यासाठी मध्यम किंवा नियंत्रित उष्णता अधिक योग्य असते. लसणाचे हे विविध प्रकार शारीरिक गरजेनुसार वेगवेगळे फायदे देतात. योग्य पद्धत निवडल्यास लसूण शरीराच्या प्रतिकारशक्तीपासून हृदयसंरक्षणापर्यंत अनेक कार्यांत सहाय्यक ठरतो.