

मंजिरी फडके
खजूर हा भारतीय आहार संस्कृतीतला जुना परंतु अत्यंत उपयुक्तअसा सुकामेवा मानला जातो. आयुर्वेदाने त्याला नैसर्गिक शक्तिवर्धक, प्रकृतीने उष्ण आणि हिवाळ्यात विशेष उपयोगी असे स्थान दिले आहे.
थकवा, अशक्तपणा, पचनातील अडचणी आणि रक्ताची कमी अशा अनेक समस्यांसाठी खारीक उपयुक्तमानला जाते. परंतु, बाजारात गडद काळी आणि फिकट पिवळी अशा दोन प्रकारात खारीक मिळत असल्याने अनेकांना यातील आरोग्यदायी प्रकार कोणता याबाबत संभ्रम असतो.
जेव्हा खजूर झाडावर नैसर्गिकरीत्या पूर्ण पिकतो, तेव्हा त्याचा रंग गडद काळा होतो. हा नैसर्गिक पिकण्याचा प्रक्रियेतून तयार झालेला खजूर खर्या अर्थाने पोषक घटकांचा पॉवरहाऊस ठरतो. त्यात आयर्न, कॅल्शियम, झिंक आणि इतर आवश्यक खनिजे नैसर्गिक स्वरूपात मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता, स्नायूंचा अशक्तपणा, हाडांची घडी सैल होणे किंवा दीर्घकालीन थकवा अशा समस्यांमध्ये काळा छुहारा अत्यंत प्रभावी मानला जातो. आयुर्वेदातील ‘रसायन’ या संकल्पनेत बसणारी त्याची उष्ण तासीर हिवाळ्यात शरीरातील उष्णता संतुलित करण्याचेही महत्त्वाचे कार्य बजावते.
याउलट पिवळी खारीक पौष्टिकतेच्या बाबतीत कमी असते. कारण, यामध्ये खजूर झाडावर पूर्ण पिकण्याआधीच तोडले जातात. अनेक व्यापारी त्यांना खाण्यायोग्य दिसावे म्हणून कधी कोमट पाण्यात, तर कधी साखरेच्या चाशनीत उकळतात. काहीवेळा रंग अधिक स्वच्छ दिसावा म्हणून पॉलिश अथवा ‘अॅसिड वॉश’ केल्याचीही चर्चा असते.
खजूर कसा खावा, हा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न. आयुर्वेदानुसार सुकामेव्याचे गुणधर्म पूर्णपणे मिळवण्यासाठी त्याला भिजवून खाणे हितावह मानले जाते. रात्री पाण्यात भिजवलेला खजूर सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास शरीरात त्याचे शोषण अधिक प्रभावी होते. मात्र, दुप्पट फायदा हवा असल्यास खजूर दुधात उकळून खाण्याची पद्धत अधिक उपयुक्तठरते. दुधातील कॅल्शियम, प्रथिने आणि इतर सूक्ष्म पोषक घटक खजुरातील खनिजांशी एकत्र येऊन शरीराला अधिक सुद़ृढ बनवतात आणि हिवाळ्यात आवश्यक उष्णताही प्रदान करतात.