

डॉ. मनोज कुंभार
गेल्या काही वर्षांत व्यायामाच्या जगात झुंबाने एक स्वतंत्र स्थान मिळवले आहे. एकीकडे तो एखाद्या क्लबमधील मोकळ्या डान्ससारखे दिसतो, तर दुसरीकडे त्यात लॅटिन अमेरिकन संगीताची लय, विविध नृत्यप्रकारांचे मिश्रण आणि ऊर्जादायी हालचालींचा मेळ असा बनतो की, व्यायामाची पारंपरिक कल्पनाच बदलून जाते. त्यामुळे झुंबा आज जगभरातील व्यायामप्रेमींचा आवडता पर्याय बनला आहे.
झुंबाचा पहिला आणि सर्वात परिणामकारक फायदा म्हणजे शरीरातील चरबी कमी होणे. झुंबानृत्य करताना होणार्या सततच्या लयबद्ध हालचाली, कंबर हलवणे, स्क्वॅटस्, पुश-अप्स यांसारख्या गुंतवून ठेवणार्या क्रिया यांमुळे एका सत्रात साधारण 600 ते 1000 कॅलरीजपर्यंत जळू शकतात, त्यामुळे वजनकाट्यावर बदल दिसण्यासाठी हा प्रकार अतिशय परिणामकारक ठरतो.
झुंबाचे संगीत अतिशय ऊर्जादायी असल्यामुळे हा व्यायाम करताना मिळणारा आनंद शरीराबरोबरच मनासाठीही फायद्याचा ठरतो. कारण यामुळे स्ट्रेस हार्मोन्सवर सकारात्मक परिणाम होतो. जगभरातील 180 देशांमध्ये दर आठवड्याला सुमारे 15 दशलक्ष लोक झुंबामध्ये सहभागी होतात आणि त्यांच्या अनुभवातून हे स्पष्ट झाले आहे की, झुंबानृत्य ही मानसिक विश्रांती देणारी पद्धतदेखील आहे. एखाद्या लयदार गाण्यावर स्वतःला हरवताना मनातील वाईट भावना, नकारात्मक अनुभव किंवा दैनंदिन ताण नैसर्गिकपणे दूर जातात. साहजिकच यामुळे मानसिक आरोग्य सुधारते.
झुंबा हा टोटल-बॉडी वर्कआऊट म्हणूनही ओळखला जातो. पायांच्या हालचाली, कंबरेची लय, हातांच्या हालचाली, पुश-अप्स, स्क्वॅटस् हे सर्व मिळून शरीरातील प्रत्येक भागावर एकाचवेळी काम होते. त्यामुळे पोट, कंबर, मांडी, हात आणि नितंब यासारख्या जागांवरील चरबी कमी होण्यास मदत होते. झुंबामध्ये सतत गती बदलत असल्याने याचा कार्डिओ व्यायाम म्हणूनही मोठा फायदा होतो. झुंबा करताना हृदयाचे ठोके नियंत्रित पातळीवर वेगाने वाढत असून ते हृदयविकार टाळण्यासाठी उपयुक्त ठरते. आज तरुणांमध्ये कार्डिओ समस्यांचे प्रमाण वाढत आहे. अशावेळी झुम्बा डान्स हा त्यांच्यासाठी प्रभावी व्यायाम प्रकार आहे. यामुळे शरीरातील स्नायू टोन होतात. आठवड्यात दोन-तीन सत्रे घेतल्यास शरीरात लवचिकता लक्षणीयरीत्या वाढते. सर्वात आनंददायी गोष्ट म्हणजे झुंबा मूड त्वरित सुधारतो. नाचताना मेंदूतून एंडॉर्फिन नावाचे ‘फील-गुड’ हार्मोन्स स्रवतात. त्यामुळे ताण कमी होतो, मन प्रसन्न होते आणि शरीरात ऊर्जा वाढते. एकूणच पाहता झुंबा हा फक्त वजन कमी करणारा व्यायाम नसून शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी पोषक व्यायाम आहे. योग्य प्रशिक्षक, नियमित सत्रे आणि स्वतःच्या क्षमतेनुसार हालचाली निवडल्यास झुंबा तंदुरुस्तीच्या प्रवासात मोठा बदल घडवू शकतो.