

डॉ. मनोज कुंभार
श्वासनलिकेत कृत्रिमरीत्या उघडण्यात येणारा छोटा मार्ग हा या शस्त्रक्रियेचा केंद्रबिंदू असतो आणि या मार्गातून रुग्णाला सहज व सुरक्षितरीत्या श्वास घेणे शक्य होते. ‘ट्रॅकिओ’ म्हणजे श्वासनलिका आणि ‘स्टोमा’ म्हणजे कृत्रिम उघडलेला मार्ग, या दोन शब्दांच्या संयोगातून या शस्त्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट होते.
श्वासोच्छ्वास ही मानवी जीवनाची सर्वात मूलभूत प्रक्रिया मानली जाते आणि ती कुठल्याही कारणाने व्यत्ययास आली की, त्वरित वैद्यकीय हस्तक्षेपाची गरज निर्माण होते. नैसर्गिक श्वसनमार्गात अडथळा निर्माण झाल्यास अथवा फुफ्फुसांपर्यंत पोहोचणार्या वायूच्या प्रवाहात अडचण निर्माण झाली की, ट्रॅकिओस्टोमी ही शस्त्रक्रिया जीवनरक्षक उपाय ठरते. श्वासनलिकेत कृत्रिमरीत्या उघडण्यात येणारा छोटा मार्ग हा या शस्त्रक्रियेचा केंद्रबिंदू असतो आणि या मार्गातून रुग्णाला सहज व सुरक्षितरीत्या श्वास घेणे शक्य होते. ‘ट्रॅकिओ’ म्हणजे श्वासनलिका आणि ‘स्टोमा’ म्हणजे कृत्रिम उघडलेला मार्ग, या दोन शब्दांच्या संयोगातून या शस्त्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट होते. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाच्या जीवाला श्वसनविकाराचा थेट धोका उद्भवल्यास ही प्रक्रिया त्वरेने केली जाते; परंतु दीर्घकाळ कृत्रिम श्वसनाची गरज असलेल्या रुग्णांमध्येही हीच प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने केली जाते.
ट्रॅकिओस्टोमीची प्रक्रिया अत्यंत नीटनेटक्या वैद्यकीय पद्धतीने राबविली जाते. अॅनेस्थेशिया दिल्यानंतर मानेच्या खालच्या भागावर छोटा आडवा छेद दिला जातो. आसपासच्या मृदू ऊती अलगद बाजूला करून शल्यचिकित्सक श्वासनलिकेपर्यंत पोहोचतो आणि श्वासनलिकेत अचूक जागी छोटासा गोलाकार मार्ग उघडतो. या मार्गातून ट्रॅकिओस्टोमी ट्यूब घातली जाते, ती दोर्यांनी किंवा पट्ट्यांनी सुरक्षित केली जाते आणि रुग्णाच्या गरजेनुसार ती श्वसनयंत्रणेशी किंवा ऑक्सिजन पुरवठ्याशी जोडली जाते.
या शस्त्रक्रियेनंतरची निगा ही रुग्णाच्या बरे होण्याच्या प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची पायरी मानली जाते. ट्रॅकिओस्टोमी ट्यूब स्वच्छ ठेवणे, श्वसनमार्गात जमा होणारे स्राव नियमितपणे सक्शनद्वारे काढून टाकणे, परिसर स्वच्छ व ओलसर ठेवण्यासाठी ह्युमिडिटीचा वापर करणे, ट्यूबस्भोवतालच्या कापड्या वेळेवर बदलणे आणि लालसरपणा अथवा स्राव वाढल्यास त्वरित तज्ज्ञांना कळवणे, या दैनंदिन प्रक्रियांमुळे संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. अनुभवी नाक-कान-घसा (ईएनटी) तज्ज्ञांकडून नियमित तपासणी झाली की ट्रॅकिओस्टोमीच्या ठिकाणी योग्यरित्या भरून येणे, श्वासनलिकेतील मार्ग स्वच्छ राहणे आणि कोणतीही अनपेक्षित गुंतागुंत वेळेवर ओळखणे शक्य होते.
शस्त्रक्रियेनंतरचे जीवन हा रुग्णासाठी नव्या टप्प्याचा आरंभ ठरतो. सुरुवातीला श्वास घेण्याची पद्धत वेगळी भासते; परंतु शरीर हळूहळू या नव्या मार्गाशी जुळवून घेते. काही दिवस रुग्णालयात राहण्याची गरज असते, जिथे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली श्वसन, स्वच्छता आणि देखभालीची पद्धत शिकविली जाते. बोलण्याची क्षमता सुरुवातीला मर्यादित असली तरी विशेष ‘स्पीकिंग व्हॉल्व्ह’च्या साहाय्याने संवाद पुन्हा साधता येतो. खाण्यापिण्याबाबतही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतल्यावर रुग्ण हळूहळू पूर्ववत होत जातो. या संपूर्ण प्रक्रियेत मानसिक आधार अत्यंत महत्त्वाचा असतो आणि कुटुंबीयांचे साथ-सहकार्य रुग्णाला नव्याने उभारी देते. अनुभवी ईएनटी तज्ज्ञ, तंतोतंत निदान, आधुनिक शस्त्रक्रिया पद्धती आणि रुग्णाला अनुरूप काळजी योजना या सर्व गोष्टी ट्रॅकिओस्टोमी यशस्वी ठरवण्यात निर्णायक ठरतात.