

longevity tips dan buettner reveals blue zone diet lifestyle tips for long healthy life
पुढारी ऑनलाईन :
Longevity Tips : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण चांगले आणि सकस अन्न खाण्यापासून दुरावला आहे. आज प्रत्येक जण प्रोसेस्ड फूड आणि चटपटीत अशा जीभेचे चोचले पुरवण्याच्या नादात आपल्या आरोग्यपूर्ण आहाराकडे दुर्लक्ष करू लागला आहे. यामुळे आज अनेक रोग आपले शरीर पोखरू लागले आहेत. त्यामुळे दिर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी आपल्या आहारात कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत चला जाणून घेऊया....
ब्लू झोन म्हणजे अशा ठिकाणांचा समूह जिथे लोक दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगतात. डॅन ब्यूटनर यांनी या लोकांच्या आहार आणि जीवनशैलीचा अभ्यास केला आहे आणि ते स्वतःही त्यांच्याच सवयी अंगीकारतात. त्यांच्या आहारात सर्डिनियन मिनेस्ट्रोने सूप, प्लांट-बेस्ड प्रोटीन, फळे आणि भाज्या यांचा समावेश असतो.
या ठिकाणचे लोक जगता दीर्घायुष्य
जगात काही अशी ठिकाणे आहेत जिथे लोक इतर देशांच्या तुलनेत अधिक दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगतात. या ठिकाणांना ब्लू झोन असे म्हणतात. प्रत्येकालाच ब्लू झोनमधील लोकांसारखे हेल्दी आणि दिर्घ आयुष्य जगायचे असते, पण आपली जीवनशैली, आहार आणि रोजच्या छोट्या सवयी आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम करतात. अमेरिकेतील प्रसिद्ध संशोधक आणि लेखक डॅन ब्यूटनर यांनी अनेक वर्षे ब्लू झोनमधील लोकांचे दीर्घायुष्याचे गुपित शोधण्यात घालवली आहेत. विशेष म्हणजे, ते स्वतःही त्या वयस्क लोकांसारख्याच खाण्यापिण्याच्या सवयी पाळतात.
अलीकडेच 64 वर्षीय ब्यूटनर यांनी इंस्टाग्रामवर आपली दैनंदिन दिनचर्या शेअर केली. त्यांच्या डॉक्टरांचेही म्हणणे आहे की, ते त्यांचे सर्वात निरोगी रुग्ण आहेत, आणि डॅन याचे संपूर्ण श्रेय आपल्या आहाराच्या सवयींनाच देतात. चला तर जाणून घेऊया, हेल्दी आणि दीर्घ आयुष्यासाठी डॅन ब्यूटनर कोणता आहार घेतात, ज्यामुळे या वयातही ते इतके तंदुरुस्त आहेत.
दिवसाची सुरुवात या खास डिशने
जर तुम्हाला वाटत असेल की, डॅन सकाळची सुरुवात एखाद्या महागड्या सप्लिमेंटने करतात, तर तसे नाही. ते सर्वप्रथम एक साधी आणि स्वस्त डिश खातात, ज्याचे नाव आहे सर्डिनियन मिनेस्ट्रोने. नाव ऐकून हे फार विदेशी आणि दुर्मिळ साहित्याची डिश वाटेल, पण तसे नाही. सर्डिनियन मिनेस्ट्रोने हे एक प्रकारचे भाज्यांचे सूप आहे. यात डाळी, राजमा/बीन्स आणि विविध भाज्या असतात. वरून ते थोडे ऑलिव्ह ऑइल आणि ॲव्होकॅडो घालून खातात.
हे हेल्दी सूप प्यायल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि शरीरात ऊर्जा टिकून राहते. अनेक संशोधनांतून असेही दिसून आले आहे की, ज्यांच्या आहारात फळे, भाज्या आणि डाळी अधिक प्रमाणात असतात, त्यांच्यात अकाली मृत्यूचा धोका कमी असतो.
लंचमध्ये काय खातात ब्यूटनर?
लंचसाठी ब्यूटनर कोणताही कडक डाएट फॉलो करत नाहीत. त्यांचा साधा नियम आहे. मनाला आवडतील ती फळे, हव्या तितक्या प्रमाणात खा. तसेच त्या दिवशी जे खावेसे वाटेल, तेच ते खातात. त्यांचा विश्वास आहे की, जेव्हा अन्न चविष्ट आणि आपल्या पसंतीचे असते, तेव्हा आपण ते दीर्घकाळ सातत्याने खाऊ शकतो. संशोधनही सांगते की, रोज फळे खाणाऱ्या लोकांमध्ये हृदयरोग आणि इतर गंभीर आजारांचा धोका कमी असतो.
प्लांट-बेस्ड प्रोटीनचे फायदे
ब्यूटनर यांच्या आहारात बीन्स, डाळी, भाज्या आणि होल ग्रेन्स यांचा मुख्यत्वे समावेश असतो. जगभरातील अनेक अभ्यासांमध्ये सिद्ध झाले आहे की प्लांट-बेस्ड प्रोटीन हृदयासाठी अधिक चांगले असते, सूज कमी करते आणि मधुमेहासारख्या आजारांपासून संरक्षण करण्यात मदत करते. मात्र, ब्यूटनर यांचे म्हणणे आहे की, आहारात 100 टक्के परिपूर्णता आवश्यक नाही. फक्त बहुतांश अन्न नैसर्गिक आणि वनस्पतीजन्य असावे.
जर तुम्हाला वाटत असेल की, फक्त हेल्दी खाणे हेच ब्यूटनर यांच्या दीर्घायुष्याचे गुपित आहे, तर तसे नाही. ब्यूटनर म्हणतात, “मी बहुतेक वेळा प्लांट-बेस्ड अन्न खातो, पण मित्र-परिवाराशी असलेले नातेही तितकेच महत्त्वाचे आहे. ब्लू झोनमधील लोक रोज चालणे-फिरणे, घरकाम करणे, कुटुंबासोबत जेवण करणे आणि कमी प्रोसेस्ड अन्नावर भर देतात. हाच साधा जीवनपॅटर्न त्यांना दीर्घ आणि आनंदी आयुष्य देतो.”