

Heart Attack
नवी दिल्ली : आजकाल तरुणांमध्येही हृदयविकाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. विविध अहवालांनुसार, भारतीयांमध्ये मृत्यूचे एक प्रमुख कारण हार्ट अटॅक ठरत आहे. दर मिनिटाला सुमारे ४ भारतीयांचा जीव हृदयविकाराच्या झटक्याने जातो, आणि यातील अनेक मृत्यू वेळेवर योग्य मदत न मिळाल्याने होतात.
पाश्चात्य देशांच्या तुलनेत हार्ट अटॅकमुळे भारतीयांच्या मृत्यूचे प्रमाण अजूनही कमी आहे. याच संदर्भात, कार्डिओलॉजिस्ट डॉ. जिवितेश सतीजा यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करून लोकांना हृदयविकाराच्या झटक्याच्या वेळी सर्वात आधी काय करावे, याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. पहिल्या काही मिनिटांमध्ये उचललेले योग्य पाऊल हे जीव वाचवू शकतो, असे त्यांचे मत आहे.
१. धोक्याची चिन्हे ओळखा
हार्ट अटॅकचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीच्या मध्यभागी तीव्र वेदना किंवा जडपणा, जो पाच मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकतो. ही वेदना डाव्या हात, मान किंवा जबड्यापर्यंत पसरू शकते. यासोबत घाम येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येणे किंवा अस्वस्थता जाणवू शकते. विशेषतः मधुमेहग्रस्त आणि वृद्धांमध्ये तीव्र वेदनांशिवाय केवळ थकवा किंवा अस्वस्थता जाणवू शकते.
२. त्वरित मदत घ्या आणि रुग्णालयात पोहोचा
हार्ट अटॅकचा संशय येताच त्वरीत आपत्कालीन सेवेला फोन करा आणि हृदयविकाराच्या झटक्याची माहिती द्या. हृदयाची बंद नस उघडण्याची सुविधा असलेल्या मोठ्या रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेची मागणी करा. रुग्णालयात पोहोचण्यास विलंब करू नका. प्रत्येक ३० मिनिटांच्या विलंबाने जीव वाचण्याची शक्यता कमी होते. रुग्ण स्वतः वाहन चालवणार नाही याची काळजी घ्या.
३. रक्त पातळ करणारी गोळी द्या
मदतीसाठी फोन केल्यानंतर किंवा रुग्णालयात जात असताना, रुग्णाला रक्त पातळ करणारी गोळी (डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार) चावून त्वरित द्या. गोळी गिळण्याऐवजी चावल्यास तिचा परिणाम लवकर होतो.
४. रुग्णाला आरामदायी स्थितीत ठेवा
रुग्णाला बसलेल्या किंवा ४५ अंशावर टेकलेल्या स्थितीत ठेवा (सरळ झोपवू नका). घट्ट कपडे सैल करा आणि त्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण तणावामुळे हृदयावर अधिक दबाव येतो. रुग्णाला चालणे किंवा पायऱ्या चढणे टाळण्यास सांगा.
५. श्वासोच्छ्वास आणि प्रतिसादावर लक्ष ठेवा
रुग्ण बोलत आहे की नाही आणि त्याचा श्वास व्यवस्थित चालू आहे की नाही यावर सतत लक्ष ठेवा. जर रुग्ण अचानक बेशुद्ध झाला, श्वास घेणे थांबले किंवा नाडी थांबली, तर ही कार्डिॲक अरेस्टची स्थिती असू शकते. अशा वेळी, वैद्यकीय मदत मिळेपर्यंत त्वरित सीपीआर सुरू करा.
हा सल्ला सामान्य माहितीसाठी दिला गेला आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांशी बोला.