Diabetic Wound Care | मधुमेह आणि जखमा
डॉ. संजय गायकवाड
मधुमेह हा आजार केवळ रक्तातील साखर वाढवतो, इतक्यापुरताच त्याचा परिणाम मर्यादित नसतो. शरीराची जखम भरून येण्याची क्षमता, त्वचेचे संरक्षण आणि रोगप्रतिकारक शक्ती या तिन्ही क्षेत्रांवर तो खोलवर परिणाम करत असतो.
रक्तातील साखरेची पातळी सतत उंच राहिल्यास शरीरातील ऊती स्वतःची दुरुस्ती पूर्वीसारखी वेगाने करू शकत नाहीत. ही दुरुस्ती मंदावते आणि अगदी साधी जखम सुद्धा दीर्घकाळ न भरून येण्याचा धोका वाढतो. अशा जखमांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता जास्त असल्याने मधुमेह असलेल्या व्यक्तींनी या पैलूंचा बारकाईने विचार करणे अत्यंत गरजेचे ठरते. रक्तप्रवाहावर होणारा परिणाम हा मधुमेहाच्या दुष्परिणामांचा सर्वांत गंभीर भाग मानला जातो. रक्तवाहिन्या कठोर होणे, त्यांचा आकार अरुंद होणे आणि त्यातून शरीराच्या टोकाच्या भागांतविशेषतः पायांतरक्तपोहोचण्याचे प्रमाण घटणे, या साखळीचा शेवट जखम भरून न येण्यामध्ये होतो. पोषणद्रव्ये आणि प्राणवायू हे जखम दुरुस्तीसाठी अनिवार्य घटक आहेत. मधुमेह ही प्रक्रिया मंदावतो, आणि त्यामुळे रिकव्हरी नैसर्गिक वेगाने होत नाही. एवढ्यावरच थांबत नाही; संसर्गाविरुद्ध लढण्यासाठी ज्या पांढर्या रक्तपेशी आवश्यक असतात, त्या जखमेपर्यंत तत्काळ पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे सौम्य जखमेचेही गंभीर रूप धारण होण्याची भीती कायम असते.
मज्जातंतूंची हानी : दीर्घकाळ रक्तातील साखर नियंत्रित न राहिल्यास निर्माण होणारी मज्जातंतूंची हानी म्हणजे न्यूरोपथी हा आणखी एक गंभीर पैलू आहे. पायांची संवेदना कमी होणे, टोचल्याचे किंवा जखम झाल्याचे न कळणे, वेदना न जाणवणेही स्थिती मधुमेहात विशेषत: आढळते. संवेदना मंदावल्याने जखम होणे यांसारख्या अनेक गोष्टी लक्षातच येत नाहीत आणि त्यामुळे उपचार उशिरा सुरू होतात. पण, नियमित पायांची तपासणी, त्वचेमधील बदल ओळखणे आणि लहान जखमदेखील तत्परतेने हाताळणे या गोष्टी आवश्यक ठरतात.
रोगप्रतिकारक क्षमता : नकारात्मक परिणाम करतो. रक्तातील साखर वाढल्याने रोगप्रतिकारक पेशींची कार्यक्षमता कमी होते आणि शरीरातील सूज घटण्याऐवजी दीर्घकाळ टिकून राहते. सूज कमी न झाल्यास जखम भरून येण्याचा नैसर्गिक क्रमच विस्कळीत होतो. परिणामी, जखमा दीर्घकाळ न भरून येणार्या, सहज संसर्ग होणार्या आणि गुंतागुंती निर्माण करणार्या बनतात. मधुमेहाशी संबंधित पायांच्या जखमा (डायबेटिक फूट अल्सर्स) हा याच प्रक्रियेचा परिणाम मानला जातो. अशा जखमा काटेरी असतात, हळू भरतात आणि त्यावर संसर्गांचा धोका जास्त असतो. योग्य काळजी घेतली नाही तर त्यातून गंभीर अंगेच्छेदाची वेळ येऊ शकते.
त्वचेचे आरोग्य : मधुमेहामुळे त्वचेतील कोलेजनचा संतुलित विघटन-निर्मितीचा क्रम बिघडतो, त्वचा अधिक कोरडी, कमी लवचिक आणि फाटण्यास प्रवण बनते. घाम कमी येणे व रक्तवाहिन्यांमध्ये होणारे बदल यामुळे त्वचा संरक्षक कवचाची भूमिका पूर्वीसारखी पार पाडू शकत नाही. अशा परिस्थितीत त्वचेवरची अगदी किरकोळ भेगही संसर्गासाठी पुरेशी ठरते. सतत दाब पडणार्या भागांतविशेषत: तळपायावरअल्सर निर्माण होणे हे याचे उदाहरण. या त्वचेतील बदलांवर नियमित मॉइस्चरायझेशन, योग्य प्रकारचे पादत्राणे आणि सतत निरीक्षण यांद्वारे बरीच मर्यादा घालता येऊ शकते.
या सर्व घटकांचा एकत्र परिणाम म्हणजे कोणतीही जखम लवकरच गंभीर बनण्याची भीती. जखमेभोवती लालसरपणा, वेदना, सूज, द्रव स्राव, दुर्गंधी यांसारखी चिन्हे दिसल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घेणे अत्यावश्यक ठरते. कारण संसर्ग वाढल्यास जखम भरून येणे आणखी कठीण होते आणि परिणाम अधिक गुंतागुंतीचा ठरू शकतो. मधुमेह आपल्याला अनेक प्रकारे आव्हान देतो; पण त्याच वेळी तो आपल्याला शरीराच्या संकेतांकडे अधिक सजग राहायला शिकवतो. हे संकेत ओळखून वेळेवर प्रतिसाद दिल्यास आरोग्याचे सर्वांगीण रक्षण शक्य होते.

