यकृत कसे राहील नीट? | पुढारी

यकृत कसे राहील नीट?

आपल्या शरीरात फॅट किंवा चरबी साठली की, त्याचे दुष्परिणाम जाणवू लागतात; पण हीच चरबी जर लिव्हर म्हणजे यकृतापर्यंत पोहोचली, तर त्यामुळे समस्या खूप वाढते. अर्थात, थोडी काळजी घेतली तर आपले यकृत तंदुरुस्त आणि सुरक्षित राहू शकते. फॅटी लिव्हर किंवा चरबीयुक्त यकृताशी संबंधित समस्या आणि त्यावरील उपायांविषयी…

फॅटी लिव्हरची लक्षणे

  • फॅटी लिव्हर झाल्यानंतर शरीरात अनेक प्रकारचे बदल होतात.
  • पोट प्रमाणाबाहेर मोठे दिसू लागते.
  • वजन सतत वाढलेलेच राहते.
  • दीर्घकाळ फॅट जमा झाल्याने यकृताचा आकार वाढतो आणि त्याला सूज येते.
  • सारखे मळमळते.
  • चिडचिड होत राहते.
  • भूक लागत नाही.
  • आळसावल्यासारखे वाटते.
  • शरीराचा रंग बदलू लागतो. म्हणजे पायावर तपकिरी डाग उठणे, डोळ्यांत पिवळेपणा येणे.
  • पायांना सतत सूज येते. पायांच्या त्वचेचा रंग बदलतो आणि अशक्तपणा वाटतो.
  • सतत थकल्यासारखे वाटत राहते.
  • वजन अचानक कमी होते.
  • चक्कर येते.
  • पोटात उजव्या बाजूला सतत वेदना होत राहतात.
  • फॅटी लिव्हर आणि हृदययकृतात फॅट जमा होण्यामुळे हृदयाकडे जाणार्‍या रक्तवाहिन्यांतही फॅट जमा होते आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
  • जर हे ब्लॉकेज मेंदूत जाणार्‍या नसांमध्ये झाले तर मेंदूत रक्तस्राव होण्याचा धोका असतो.
  • प्रतिबंध वजन नियंत्रित करा.
  • रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवा.
  • तुम्ही जाड असाल तर एकदम वजन कमी करू नका. दरवर्षी तुमच्या एकूण वजनाच्या 10 टक्के वजन कमी करण्याचे लक्ष्य ठेवा. उदाहरणार्थ, तुमचे वजन जर 100 किलो असेल तर पहिल्या वर्षी 10 किलो वजन कमी करण्याचे आणि त्याच्या पुढील वर्षी 9 किलो वजन कमी करण्याचे लक्ष्य ठेवा.
  • मद्यपान आणि धूम्रपान ताबडतोब बंद करा.
  • कोलेस्टेरॉल आणि रक्तदाबावर नियंत्रण ठेवा.
  • पौष्टिक आणि संतुलित आहार घ्या.
  • नियमित व्यायाम करा.
  • फळे, भाज्या, बिन्स, कोंडायुक्त धान्याचा आहारात समावेश करा.
  • तळलेले पदार्थ आणि जंक फूड वर्ज्य करा.
  • आहारतज्ज्ञांकडून डाएट चार्ट तयार करून त्यानुसारच आहार घ्या.
  • डॉक्टरना न विचारता पेनकिलर्स किंवा कोणतेही औषध घेऊ नका.
  • पवनमुक्तासन, वज्रासन, मकरासन या योगासनांमुळे यकृताच्या समस्यांना प्रतिबंध करता येतो. रोजच्या आहारातील काही पदार्थांमुळे फॅटी लिव्हरपासून बचाव होऊ शकतो. आयुर्वेदात हे उपाय सांगण्यात आले आहेत.
  • आयुर्वेदात गरम ताक खूप उपयोगी मानले जाते. ताक जरा गरम करून त्याला हळद आणि जिर्‍याची फोडणी द्यावी. असे ताक प्यायल्याने यकृत तंदुरुस्त राहण्यास मदत होते.
  • हळदीतील अँटी ऑक्सिडंट यकृताच्या पेशींना ताकद देतात. त्यामुळे आहारात हळदीचा समावेश करा.
  • संत्र्याचा रस, नारळाचे पाणी नियमितपणे पिण्याने यकृताचे आरोग्य चांगले राहते.
  • फॅटी लिव्हरपासून मुक्तता हवी असेल तर ग्रीन टी प्या. रोज ग्रीन टी प्यायलात तर हा आजारच राहणार नाही.

– डॉ. महेश बरामदे

Back to top button