एक ‘चोरटा’ आजार! | पुढारी

एक ‘चोरटा’ आजार!

क्लॅप्टोमेनिया एक आवेग नियंत्रण विकार आहे. या विकारातील काही विशेष लक्षणांमुळे हा आजार एकप्रकारे मनोवस्थेसंबंधी विकार आहे. यामध्ये व्यक्ती चोरी करण्यापूर्वी तणावात असते आणि त्याला चोरी केल्यानंतर आनंद, समाधान मिळते.

‘दे धक्का’ चित्रपटात सिद्धार्थ जाधवने साकारलेल्या व्यक्तिरेखेला वस्तू चोरण्याची सवय असल्याचे दाखवले आहे.क्लॅप्टोमेनिया ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये व्यक्तीमध्ये कोणतीही वस्तू चोरण्याची प्रवृत्ती निर्माण होते. ती वस्तू भलेही त्याच्या उपयोगाची असो किंवा नसो, तसेच त्याचे त्याला काही महत्त्व असो नसो. ही एक गंभीर मानसिक आजाराची अवस्था आहे. त्यावर उपचार न केल्यास पीडित व्यक्तीला आणि त्याच्या इतर नातेवाईकांना खूप भावनिक कष्ट पडतात. मानसोपचारतज्ज्ञांच्या मते क्लॅप्टोमेनिया एक आवेग नियंत्रण विकार आहे. या विकारातील काही विशेष लक्षणांमुळे हा आजार एकप्रकारे मनोवस्थेसंबंधी विकार आहे. यामध्ये व्यक्ती चोरी करण्यापूर्वी तणावात असते आणि त्याला चोरी केल्यानंतर आनंद, समाधान मिळते.

व्यक्तीला राग, बदला किंवा भ्रम याच्या प्रभावाखाली चोरी करत नाही, तर उन्मादाच्या स्थिती किंवा असामाजिक व्यक्तित्वामुळे होते. हा विकार भावनात्मक समस्या आणि वर्तणुकीवरील स्वयंनियंत्रणाशी निगडीत वैशिष्ट्ये असणारा आहे. क्लॅप्टोमेनियाने पीडित व्यक्ती सर्वसाधारणपणे चोरीची योजना बनवत नाहीत आणि त्यांना भीतीही वाटत नसते.

पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये ही विकृती जास्त प्रमाणात दिसते. ही विकृती अनुवांशिकही असते. क्लॅप्टोमेनियाने ग्रस्त व्यक्ती अचानक, पूर्वनियोजनाशिवाय तसेच दुसर्‍या कोणा व्यक्तीच्या मदतीने एखादी गोष्ट चोरतो.या विकाराने ग्रस्त व्यक्ती सर्वसाधारणपणे सार्वजनिक जागा जसे दुकाने, सुपर मार्केटमध्ये चोरी करतात. अशा व्यक्ती ओळखीच्या किंवा मित्रांकडील एखाद्या समारंभातही चोरी करतात. अशा व्यक्तींना चोरी करण्याची इच्छा किंवा आवेग इतका जबरदस्त असतो की, तो स्वतःला थांबवू शकत नाही.

चोरीच्या या वर्तणुकीशी संबंधित इतरही समस्या उत्पन्न होऊ शकतात. या व्यक्ती समाजापासून वेगळ्या होतात तसेच अमली पदार्थांचे सेवन करू लागतात. सामान्यपणे चोरी करणारी व्यक्ती आणि क्लॅप्टोमेनियाने ग्रस्त व्यक्ती यांच्या चोरी करण्याच्या पद्धतीत फरक असतो. सामान्य चोरीची घटना नियोजनबद्धरितीने होत असेल; पण त्यामागे काही विशिष्ट उद्देश तसेच आर्थिक फायदा हेच कारण असते; पण क्लॅप्टोमेनियाग्रस्त व्यक्ती अशा वस्तूंची चोरी करते ज्यांचा त्यांना काहीच उपयोग नसतो.

हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. लहानवयापासून ते तरुण वयापर्यंत होऊ शकतो. वृद्धापकाळात याचे प्रमाण कमी असते. आजारपण ओळखण्याचे काही लक्षणे नाहीत. क्लॅप्टोमेनिया होण्यामागे काही परिस्थिती कारणीभूत असू शकते. विनाउपचार हा विकार आपोआप बरा होत नाही. ही दीर्घकालीन परिस्थिती आहे. त्याचा उपचार औषधे आणि मानसोपचार यांच्याद्वारे करता येतो. आतापर्यंत या विकारावर ठोस किंवा सुयोग्य उपचार उपलब्ध नाहीत.

संशोधक आजही योग्य आणि प्रभावी उपचार शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. संभावित उपचारात व्यवहार, परिवर्तन उपचार, कौटुंबिक उपचार चिकित्सा व्यवहार उपचार तसेच मानसोपचारांचा समावेश आहे. याच्या उपचारात सिरोटोनीनयुक्त औषधे नैराश्यग्रस्त व्यक्तींना दिली जातात. विद्युत चिकित्सा, लिथियम आणि वेलप्रोइक अ‍ॅसिडचाही यात समावेश होतो. क्लॅप्टोमेनिया पुन्हा पुन्हा होणे नक्कीच असामान्य गोष्ट नाही. कोणालाही चोरीची इच्छा होण्याने ग्रस्त असाल तर मानसिक आरोग्याशी निगडीत उपचार केेले पाहिजेत.

-डॉ. जयदेवी पवार

Back to top button