जग सुंदर दिसण्यासाठी… | पुढारी | पुढारी

जग सुंदर दिसण्यासाठी... | पुढारी

डॉ. वर्धमान कांकरिया, 

डॉ. श्रुतिका कांकरिया

नेत्रविकारांची काही लक्षणे आढळून येत असली तरी काही वेळा नेत्रविकार जडल्यानंतरही लक्षणे दिसून येत नाही. म्हणून विशेषत: वयाच्या चाळीशीनंतर नियमित नेत्रतपासणी करून घ्यायला हवी. नेत्रतपासणीमुळे केवळ नेत्रविकारांचेच निदान होते असे नाही; तर कित्येक वेळा मधुमेहासारख्या काही गंभीर व्याधींचेही निदान होऊ शकते.

निसर्गाने आपल्या शरीराची रचना करताना अगदी सूक्ष्म बाबींचाही विचार केला आहे. शरीराच्या प्रत्येक अवयवाचे कार्य ठरलेले असते. या अवयवांचे कार्य बरेचदा बाहेर घडणार्‍या गोष्टींवर अवलंबून असते. या बाहेर घडणार्‍या गोष्टींचे आपल्याला ज्ञान व्हावे म्हणून डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही पाच ज्ञानेंद्रिये आपल्याला लाभली आहेत. या ज्ञानेंद्रियांमधील डोळे हे अत्यंत महत्त्वाचे आणि नाजूक इंद्रिय आहे. आपल्याला या पाच ज्ञानेंद्रियांमार्फत मिळणार्‍या एकूण ज्ञानाच्या सुमारे 80 टक्के ज्ञान डोळ्यांमार्फत मिळत असते. यावरूनच डोळ्यांचे महत्त्व लक्षात येते. आपल्याला सभोवतालचे जग दाखवणार्‍या या डोळ्यांची योग्य निगा राखायची असेल तर सर्वप्रथम डोळ्याची रचना आणि एकूणच कार्यपद्धती समजून घ्यायला हवी.

आपला डोळा गोल किंवा काहीसा लंबगोल आकाराच्या लहान चेंडूप्रमाणे असतो. डोळ्याच्या पुढच्या भागात एक बहिर्वक्र भिंग असते. भिंगाच्या पुढे बुब्बुळ (कॉर्निया) असते आणि त्या बुब्बुळाच्या मध्यभागी बाहुली (प्युपिल) असते. या बाहुलीमधून प्रकाश भिंगावर पडतो आणि तो प्रकाश डोळ्याच्या मागच्या बाजूला असलेल्या नेत्रपटलावर (याला डोळ्याचा पडदा किंवा रेटिना असेही म्हणतात.) पडतो. म्हणजे डोळ्यासमोर असलेल्या दृश्याची प्रतिमा असलेल्या नेत्रपटलावर पडते. नेत्रपटलाच्या मागे एक नस असते. तिला ‘ऑप्टिक नर्व्ह’ असे म्हणतात. ही ऑप्टिक नर्व्ह नेत्रपटलावर पडलेल्या प्रतिमेचे मेंदूपर्यंत वहन करते आणि ते दृश्य आपल्याला दिसते. भिंग आणि पडदा यांच्यामध्ये एक पारदर्शक द्रवपदार्थ असतो. डोळा ओलसर राहावा म्हणून पापण्यांच्या कडेला अश्रूंच्या ग्रंथी असतात. या ग्रंथींमधून अश्रू स्रवतात आणि डोळा ओलसर राहतो.

डोळ्याच्या या रचनेत किंवा कार्यपद्धतीत काही बिघाड झाल्यास आपल्याला नेत्रविकार जडतो. या नेत्रविकाराची तीव्रता या बिघाडावर किंवा डोळ्यातील विविध नाजूक अवयवांना होणार्‍या हानीवर अवलंबून असते. बहुतेक नेत्रविकारांची काही लक्षणे जाणवतात. डोळा दुखणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळा लाल होणे, समोरचे धूसर दिसणे, डोळ्यांभावेती काळे डाग पडणे अशी लक्षणे दिसून आल्यास घरगुती उपचार करण्यापेक्षा नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे उत्तम. कारण ही लक्षणे काहीवेळा हिमनगाचे छोटेसे टोक ठरू शकतात. म्हणजे लक्षणांवरून येणार्‍या अंदाजापेक्षा प्रत्यक्ष व्याधी बरीच गंभीर असू शकते. काहीवेळा, विशेषत: मधुमेहाच्या रुग्णांना, नेत्रविकार जडला तरी बाह्य लक्षणे आढळून येत नाहीत. त्यामुळे मधुमेहांच्या रुग्णांनी नियमित नेत्रतपासणी करून घेणे अत्यावश्यक आहे.

डोळ्याच्या तक्रारींकडे थोडे दुर्लक्ष केले तरी ते महागात पडू शकते. काही नेत्रविकार उपचारांनी पूर्ण बरे होतात. पण, काही नेत्रविकारांवर वेळेत उपचार न झाल्यास दृष्टी पूर्ववत होणे अवघड होते. बरेचदा आपल्याला अंधूक किंवा अस्पष्ट दिसायला लागल्यावर आपण चष्म्याच्या दुकानात जातो, तिथे यंत्राच्या सहाय्याने डोळ्याचा ‘नंबर’ काढून घेतो आणि चष्मा करून घेतो, पण अंधूक किंवा अस्पष्ट दिसण्याचे नंबर किंवा चष्मा हे एकमेव कारण असते असे नाही. त्यामुळे नेत्रतज्ज्ञाच्या सल्ल्याविना परस्पर चष्मा तयार करून घेणे धोकादायक ठरू शकते. खरे तर असे करणे म्हणजे डोळ्याच्या गुंतागुंतीच्या यंत्रणेवर अन्याय करण्यासारखे असून त्यामुळे भविष्यात गंभीर दृष्टिदोषाला सामोरे जावे लागू शकते. म्हणून वर उल्लेख केलेली लक्षणे आढळल्यास नेत्रतज्ज्ञाकडे जाऊन डोळ्यांची परिपूर्ण तपासणी करून घ्यायला हवी. 

डोळ्यांचा केवळ 30 टक्केच भाग आपल्याला बाहेरून दिसत असतो. उरलेला 70 टक्के भाग बाहेरून दिसत तर नाहीच, पण तो अधिक महत्त्वाचा आणि नाजूक असतो. परिपूर्ण नेत्रतपासणीमध्ये पापण्यांपासून नेत्रपटलापर्यंत एकूण 12 तपासण्यांचा समावेश होतो. या तपासण्या करण्यापूर्वी डोळ्यात विशिष्ट औषध टाकून बाहुलीचा आकार थोडा मोठा केला जातो. त्यानंतर विशिष्ट यंत्राच्या सहाय्याने डोळ्यातील प्रत्येक अवयवाची तपासणी केली जाते. नेत्रपटलाच्या मागे असलेल्या ‘ऑप्टिक नर्व्ह’चीही तपासणी केली जाते. नेत्रपटल हा आपल्या शरीरातील एकमेव अवयव आहे की ज्यातील रक्तवाहिन्या उघड्या डोळ्यांनीही स्पष्ट पाहता येतात. या प्राथमिक तपासण्यांमध्ये एखादी व्याधी आढळली तर त्याचे नेमके निदान करण्यासाठी आणखी काही चाचण्या सुचवल्या जातात. काही नेत्रविकारांची लक्षणे रुग्णांना जाणवतही नाहीत. त्यांचेही निदान या चाचण्यांनी होऊ शकते. त्यामुळे नियमित नेत्रतपासणी आवश्यक ठरते.

डोळ्याला शरीराची खिडकी मानले जाते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अ‍ॅनिमिया, रक्ताचा कर्करोग अशा विकारांचा तसेच काही औषधांचा डोळ्यांवर परिणाम होतो. या व्याधी प्राथमिक अवस्थेत असताना बरेचदा त्यांचे निदान झालेले नसते; परंतु नियमित नेत्रतपासणी केल्यानंतर या (नेत्रविकारांव्यतिरिक्त इतर) व्याधींचेही निदान होऊ शकते. म्हणजे डोळ्यांची तपासणी करताना मधुमेहामुळे डोळ्यांवर झालेला परिणाम लक्षात येतो आणि त्या रुग्णाला मधुमेहही जडल्याचे समजते. मधुमेहासारख्या या व्याधींचे प्राथमिक अवस्थेत निदान झाल्यास त्यांचे दुष्परिणामही रोखले जाऊ शकतात. त्या दृष्टीनेही नियमित नेत्रतपासणी महत्त्वाची ठरते. विशेषत: वयाच्या चाळीशीनंतर इतर आरोग्य तपासण्यांबरोबरच नेत्रतपासणीही नियमित केल्यास हे सुंदर जग शेवटपर्यंत सुंदर दिसू शकेल.

(लेखक प्रख्यात नेत्रतज्ज्ञ आहेत.)

Back to top button