दात अतिसंवेदनशील बनले आहेत? | पुढारी | पुढारी

दात अतिसंवेदनशील बनले आहेत? | पुढारी

डॉ. निखिल देशमुख

एखाद्या वेळेला खूप आवडीने पदार्थ खाताना दाताला थंड किंवा गरम सहन होत नाही. अशा वेळी दात संवेदनशील आहेत किंवा सेन्सेटिव्ह आहेत, असे म्हटले जाते. दातांची संवेदनशीलता व्यक्तीला काहीच थंड किंवा गरम खाऊ देत नाही. दाताला ठणका बसतो. ही समस्या नक्कीच गंभीर असते. कारण, त्यामुळे दात दुखतातच; पण अन्नसेवन करण्यावरही परिणाम होतो. 

एखादा थंड, गरम किंवा गोड, आंबट पदार्थ खाताना दातांमध्ये जर वेदना होत असतील, तर आपले दात संवेदनशील झाले आहेत, असे आपण म्हणू शकतो. संवेदनशील अर्थात सेन्सिटिव्ह दातांचा त्रास नक्कीच होतो; पण तो कमी करण्यासाठी काही नैसर्गिक उपाय करून घरीच त्यावर उपचार करू शकतो. या घरगुती उपायांमुळे दातांची संवेदनशीलता कमी होतेच; शिवाय दात किडण्यापासूनही त्याचा बचाव होतो. 

संवेदनशील दात ही खूपच सर्वसामान्य समस्या आहे. दात संवेदनशील किंवा सेन्सिटिव्ह होतात म्हणजे थंड, गरम आणि आंबट पदार्थ खाल्ल्यास दात दुखतात, एक सणक जाते. मुळात या संवेदनशील दातांची वेदना दातातील रक्तवाहिन्यांना इजा करते. त्यामुळे दात दुखतो. असे का होत असावे, असा विचार करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे दातांच्या मुळाशी अनेक लहान लहान नसा असतात आणि त्या दाताच्या स्नायूंशी जोडलेल्या असतात. एखादा थंड किंवा आंबट पदार्थ सेवन केल्यास या खाद्यपदार्थांचा प्रभाव या नसांमार्फत त्या दातांच्या स्नायूंपर्यंत पोहोचतात. त्यामुळे दाताच्या वेदना जाणवतात. दातांच्या या संवेदनशीलतेवर काही घरगुती उपाय सहज करता येतात. 

लवंग ः दातांशी निगडित समस्येवर उपचार करण्यासाठी लवंग हा मसाल्याचा पदार्थ अत्यंत उपयुक्त आहे. अनेक टूथपेस्टमध्ये लवंग असल्याचा दावा कंपन्या करतात. लवंग ही दाहशमन करणारी, वेदनाशामक आणि जीवाणूविरोधी गुण असणारा पदार्थ असल्याने दातांच्या संवेदनशीलतेमध्ये तिचा वापर करता येतो. दातांची संवेदनशीलता कमी करण्यासाठी तीन-चार लवंगा घेऊन त्या वाटाव्यात. एका वाटीत एक चमचा ऑलिव्ह तेल घेऊन लवंगांची पूड त्यात मिसळावी. हे मिश्रण संवेदनशील दातांवर लावावे. 30 मिनिटे तसेच ठेवावे. मग कोमट पाण्याने गुळण्या कराव्यात.

मीठाचे पाणी ः दातांची संवेदनशीलता कमी करण्यासाठी मीठाच्या पाण्याचा वापर करणे फायद्याचे ठरते. मीठ पाण्यामुळे तोंडाचा पीएच योग्य राहतो आणि दातांच्या समस्येपासून सुटका होते. मीठ-पाण्याचा वापर करण्यासाठी एक कप गरम पाणी घेऊन त्यात एक चमचा मीठ टाकावे. हे पाणी तोंडात धरून संपूर्ण तोंडात फिरवावे. थोडा वेळ हे पाणी तोंडात धरावे. 

लसूण ः दात संवेदनशील किंवा सेन्सिटिव्ह झाले असतील, तर त्यासाठी लसणाचा उपचारही करता येतो. लसणामध्ये एलिसिन असते, जे जीवाणूविरोधी असते. दातांच्या संवेदनशीलतेची समस्या सोडवण्यासाठी लसणाची एक पाकळी किसून घ्यावी. त्यात चार-पाच थेंब पाणी टाकावे. थोडे मीठ घालून त्याची पेस्ट करावी. जो दात संवेदनशील झाला आहे, त्यावर ही पेस्ट लावावी. पंधरा मिनिटे ही पेस्ट तशीच ठेवावी. मग कोमट पाण्याने गुळणा करून तोंड स्वच्छ धुवावे. 

पेरूची पाने ः पेरूच्या पानांच्या दाताच्या कोणत्याही समस्येवर चांगला फायदा होतो. पेरूच्या पानात फ्लेवोनाईडस् असतात. त्यामुळे दातांची संवेदनशीलता कमी होण्यास मदत होते. या पानांचा वापर करणे सोपेही आहे. एक किंवा दोन पाने एक मिनिटभर चाऊन खावीत. त्यानंतर थुंकून टाकावीत. 

कांदा ः कांद्यात फ्लेवोनाईडस् असतात. दाह कमी करणारे गुण त्यात असतात. त्यामुळे दातांच्या वेदनांपासून आराम मिळतो. कांद्याचा वापर करण्यासाठी कांद्याचे बारीक तुकडे करावेत. तोंडात धरता येतील एवढे बारीक तुकडे करावेत. कांद्याचा एक तुकडा 5-10 मिनिटे तसाच तोंडात ठेवावा. कांद्याचा वास तोंडाला येईल; पण संवेदनशीलता नक्कीच कमी होईल, जाईल. कांदाच्या वास घालवण्यासाठी मीठपाण्याने तोंड धुवावे. वास जातो. 

या उपायांनी घरच्या घरी संवेदनशील झालेल्या दातांवर उपाय करूनही न फरक आल्यास तत्काळ दंतवैद्यकांशी संपर्क साधावा. शक्य झाल्यास उपाय करण्यापूर्वीही एकदा तज्ज्ञांचा सल्ला घेणे हितकारक!

Back to top button