उपचार गोवर-कांजिण्यांवर  | पुढारी | पुढारी

उपचार गोवर-कांजिण्यांवर  | पुढारी

– वैद्य विनायक खडीवाले 

गोवर-कांजिण्यांमध्ये औषधी द्रव्यांची गरज बहुधा पडत नाही. दोन ते तीन दिवसांत गोवर-कांजिण्यांचे फोड आपोआप मावळतात. तापाचा जोर कमी होतो. अशक्तपणा दूर व्हायला आठ ते दहा दिवस लागतात. तथापि, या विकारातील उष्णता काही कोमल अवयवांवर दीर्घ काळाचा काही वाईट परिणाम करू नये, म्हणून उपचारांची नितांत गरज असते. 

लहान बालकांना प्रवाळ आणि कामदुधा प्रत्येकी तीन गोळ्या दोन वेळा दुधाबरोबर द्याव्यात. मोठ्या माणसांना प्रत्येकी सहा गोळ्या दोन वेळा द्याव्यात. तापाचा ऐन बहर असताना खूप तगमग, लाही लाही होत असली किंवा अरती म्हणजे चैन पडणे, हे लक्षण तीव्रतेने असल्यास मौक्तिक भस्म पन्नास ते शंभर मिलीग्रॅम एक वा दोन वेळा द्यावे. मंद भूक, अरुची असल्यास आणि प्रकृती सुधारावी अशा अपेक्षेने गुलाबद्राक्षासव दोन ते चार वयोमानानुसार दोन वेळा जेवणानंतर घ्यावे. 

पूर्ण विश्रांतीत राहावे. हातापायांची, डोळ्यांची आग होत असल्यास शतधौतघृत लावावे. फोडांना काहीही औषध लावू नये. नाईलाज असला, तर संगजिर्‍याची पूड लावावी. पोटात चंदन गंध उगाळून घ्यावे. काळे मनुके किंवा गोड द्राक्षे अवश्य द्यावीत. धने, मनुका यांचा काढा खडीसाखरेबरोबर द्यावयास हरकत नाही. 

विशेष दक्षता आणि विहार : पूर्ण विश्रांतीत शक्यतो इतरांपासून लांब राहावे. व्यायाम करू नये. 
पथ्य : अनम्ल, अलवण, विनातिखटाचे जेवावे. ज्वारीची भाकरी, तांदूळ भाजून भात, कोथिंबीर, कोहळा, दुध्या, नारळाचे पाणी, मनुका द्राक्ष, अंजीर, भेंडी, पडवळ
कुपथ्य : चहा, आंबट, खारट, आंबवलेले पदार्थ, लोणचे, पापड, मिरची, दही, इडली, सोडा. 
योग आणि व्यायाम : पूर्ण विश्रांती, शवासन. विश्रांतीकरिता स्वतंत्र खोलीत प्रवेशित रुग्ण म्हणून राहावे. 
चिकित्साकाल : दोन ते सात दिवस.

संकीर्ण : तीव्र गोवर-कांजिण्याच्या आघातामुळे भावी आयुष्यात कीडनीचे, लीव्हरचे, पाणथरीचे रोग संभवतात. त्याकरिता काही काळ चंदन, वाळा, नागरमोथा, धने आणि किंचित सुंठ यांचे सिद्ध जल प्यावे.

 

Back to top button