त्रासदायक ‘फिशर’ आणि आयुर्वेद उपचार | पुढारी

त्रासदायक ‘फिशर’ आणि आयुर्वेद उपचार

डॉ. आनंद ओक  

‘सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही’ अशी अवस्था करून टाकणार्‍या विकारांपैकी एक विकार म्हणजे ‘फिशर’.

रक्त पडणे, आग होणे अशा लक्षणांनी जाणवणार्‍या या विकाराचे मूळव्याध या विकाराच्या लक्षणांशी साधर्म्य असल्याने गैरसमजुतीने अनेकजण याला ‘मूळव्याधीचा त्रास असेच संबोधतात..’

विकाराच्या जागेमुळे लाज, संकोच या कारणांनी काही वेळा सौम्य स्वरूपात असताना काही जण फिशरकडे दुर्लक्ष करतात किंवा डॉक्टरला दाखविणे टाळतात. काही जण मूळव्याधच आहे, असे समजून विविध जाहिराती करून बाजारात मिळणारी मूळव्याधीवरील औषधे खात असतात. काही जण वेगवेगळी मलमे लावत असतात. ग्रामीण भागात पदवीरहित मूळव्याध तज्ज्ञांकडून वनस्पतीज औषधे खाऊन तात्पुरता आराम मिळविणारे काही जण असतात. स्वयंघोषित फिशर तज्ज्ञ भोंदू वैद्याकडून ऑपरेशन करून हजारो रुपयांना फसविले गेलेले काही रुग्ण आहेत. काहीजण पहिल्यांदाच तक्रार झाल्यावर भीतीमुळे, गैरसमजामुळे, गडबडीने ऑपरेशन करून घेतलेले असतात. काही दिवसांनी पुन्हा त्रास उद्भवल्यामुळे आयुर्वेदिक औषधी उपचारांकडे वळणारेदेखील अनेक जण आढळतात.

या गोष्टी घडण्याचे कारण शोधले, तर असे लक्षात येते की, या विकाराबद्दलची शास्त्रीय माहिती अजूनही जनमानसामध्ये पुरेशी मिळालेली नाही.

संबंधित बातम्या

‘फिशर’ म्हणजे काय? 

प्रातःविधीच्या जागी तणावामुळे त्या जागेची अंतत्वचा फाटल्यामुळे त्या जागी चिरणी पडते. म्हणजेच लांब जखम होते यालाच ‘फिशर’ असे म्हणतात. आयुर्वेदीय शास्त्रामध्ये यालाच ‘परिकर्तिक’ असे नाव आहे. अनेक जण यालाच मूळव्याध म्हणतात, पण मूळव्याधीमध्ये त्रास होत असला तरी कोंब आलेले असतात. फिशरच्या विकारात जखम अथवा चीर पडते/असते.

फिशरची लक्षणे –

फिशरच्या विकारात प्रातःविधीला जाऊन आल्यानंतर त्या जागेला दुखते, आग होते, काही वेळा रक्त पडते. सुरुवातीला ही लक्षणे प्रातःविधीच्या वेळी व त्यानंतर थोडा वेळ जाणवतात; पण तीव्रता जास्त असल्याने मात्र हा त्रास नंतरही टिकून राहतो. काही वेळा तर याची तीव्रता इतकी असते की, माणसाला बसताही येत नाही. वेदनेने त्रासिकपणा वाढलेला असतो. कशातही लक्ष लागत नाही. अशक्तपणादेखील जाणवत असतो. काही वेळा दाह, भगभग वेदना इतक्या असतात की ओरडायची वेळ येते.

काही स्वरूपात विशिष्ट उष्ण पदार्थ खाण्यात आल्यावरच एक-दोन दिवस त्रास जाणवतो. या नंतर आपोआप बंद होतो. काही जणात फिशरच्या जागी जंतुसंसर्ग झाल्यामुळे सूज अधिकच वाढून अ‍ॅब्सेसदेखील होऊ शकते. काही वेळा यातून पुरास्राव होत असतो. तर काही जणात ज्या जागी फक्त आग जाणवते काही वेळा फिशरच्या जोडीलाच मूळव्याधीचे कोंब देखील आढळून येतात. सर्वसामान्यपणे स्त्रियामध्ये या विकाराचे प्रमाण जास्त आढळते. तसेच वयाच्या तीस-पन्नास वर्षे या काळात हा विकार प्राधान्याने आढळतो.

फिशरची कारणे –

फिशरवरील उपचार करताना औषधी होण्याबरोबरच आजाराची कारणे टाळावी लागतात. त्यामुळे ही कारणे प्रत्येकाला माहीत असणे गरजेचे आहे. 

वेगवेगळ्या कारणांमुळे होणारी बद्धकोष्ठता हे या विकाराचे महत्त्वाचे कारण असते. म्हणजेच बद्धकोष्ठता करणारी विविध कारणेच फिशर उत्पन्न करण्यास मदत करतात. पचावयास जड मसालेदार, तिखट, चमचमीत तळलेले असे पदार्थ मांसाहार वारंवार सेवन करणे. अनियमित जेवण, अति धुम्रपान, मद्यपान, अति जागरण, वारंवार प्रवास, टेन्शन, चिंता तसेच वेळच्यावेळी प्रातःविधीला न जाणे अजिबात व्यायाम न करणे या गोष्टींमुळे पोटातील पचन यंत्रणा बिघडते. शरीरांतर्गत उष्णता वाढते, संडास कडक होते. ती लवकर बाहेर पडत नाही. त्यामुळे कुंथावे लागते ही क्रिया करताना गुद मार्गावर ताण येतो व चिरणी पडते. 

फिशरवरील उपचार –

फिशरचा त्रास सुरू झाल्यानंतर बरेच जण आता ऑपरेशन करावे लागणार अशा भीतीने घाबरून गेलेले असतात. वास्तविक फिशरमध्ये प्रत्येक वेळेला ऑपरेशन करावे लागते असे नाही. तर फिशर या विकारावर आयुर्वेदिक शास्त्रीय उपचार बहुतांश रुग्णांना उपयोगी पडतात व ऑपरेशन टाळता येते. फिशर खूपच मोठे असेल तर औषधी उपचारांना दाद देत नसेल. म्हणजेच कमी होत नसेल तर आणि तरच ऑपरेशन करावे आणि ऑपरेशननंतर देखील पुन्हा उत्पन्न होण्याचे टाळण्यासाठी आयुर्वेदीय उपचारांचा अतिशय चांगला उपयोग होतो.

उपचारांची योजना –

या विकारांवरील उपचार करताना झालेली जखम भरून आणणे. त्या जागेचा दाह किंवा सूज कमी करणे आणि मलप्रवृत्ती सहजगतीने मऊ कोणताही ताण न देता होणे या उद्देशाने आयुर्वेदीय उपचार केले जातात. तसेच या गोष्टीसाठी स्थानिक आणि पोटातून प्यावयाची औषधे अशा दोन्ही गोष्टी एकावेळी करणे गरजेचे असते. याचबरोबर आजार लवकर बरा व्हावा आणि पुन्हा होऊ नये यासाठी कोणता आहार टाळावा आणि कोणते पदार्थ नियमित खावेत याचे सखोल मार्गदर्शनही महत्त्वाचे असते. स्थानिक उपचारात कोमट पाण्याने ती जागा नियमित स्वच्छ ठेवणे आणि त्यानंतर जेष्ठमध, जाई, त्रिफळा हरिद्रा, निंब, खदीर इत्यादींनी सिद्ध केलेले तेल अथवा तुपाचा बोळा त्याजागी रात्रभर ठेवावयाचा असतो. तसेच दिवसा आंघोळीनंतर जखम भरून आणणारे दाह कमी करणारे मलम लावावयाचे असते. त्रास कमी झाला तरी पुढे काही दिवस हे उपचार सुरू ठेवणे महत्त्वाचे असते. काही रुग्णांत विविध काढ्यांमध्ये बसणे ही क्रियाही करावी लागते. 

पोटात घेण्यासाठी आवळा, हिरडा, निंब, चंदन, वाळा, कमलदल, अडुळसा, गुग्गुळ लोध्र, लागकेशर, सारिवा, निरगुडी, कढी चिराईत, रास्ना या वनस्पतींचा आणि शंख जिरक, प्रवाळीभस्म. मौतिक भस्म, गौरिक इत्यादी भस्मांच्या म्हणजेच या वनौषधींच्या एकत्रिकीकरणातून तयार झालेल्या विविध गोळ्यांचा वापर केला जातो. फिशरची जखम पूर्ण भरून आल्यानंतरही शरीरातील पित्तप्रकोप म्हणजेच उष्णता पूर्ण निराकरण होण्यासाठी पित्तनाशक विशेष उपचार केले जातात. शरद ऋतूत म्हणजेच ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये विरेचन हे पंचकर्म उपचार यासाठी खूपच उपयोगी पडतात. विकारांचा पुन्हा उद्भव न होण्यासाठी काही काळ पित्तनाशक सौम्य विरेचक औषधे घेणेदेखील महत्त्वाचे असते. 

फिशर विकारात उपयोगी आहार –

फिशर झालेल्या रुग्णांनी आहार दूध, ताजे ताक, तूप, पालेभाज्या, संत्री, कलिंगड, डाळिंब, सफरचंद, चिकू, लिंबू सरबत, कोकम सरबत, मोरावळा, गुलकंद कोहाळा, विविध फळांचे रस या पदार्थांचा नियमित वापर करावा.

थोडक्यात महत्त्वाचे फिशरचा त्रास होऊ लागल्यावर घाबरून न जाता तो लवकर संपूर्ण बरा होण्यासाठी आणि ऑपरेशन होऊनही पुन्हा त्रास होत असल्यास देखील आयुर्वेद तज्ज्ञाच्या सल्ल्याने सांघिक शास्त्रीय आयुर्वेद उपचार करून घेतल्यास या विकारावर निश्चित विजय मिळवता येतो.

Back to top button