आरोग्यहितैषी खजूर | पुढारी | पुढारी

आरोग्यहितैषी खजूर | पुढारी

खजूर खाणे हे शरीरासाठी चांगले असते असे म्हणत आपल्यातले अनेक जण खजूर आवडीने खातात; पण खजुरात नेमकी कुठली पोषकतत्त्वे दडलेली आहेत आणि त्यामुळे आपल्या शरीरास त्याचा कोणकोणत्या पद्धतीने फायदा होऊ शकतो हे आहे का, आपल्याला ठाऊक?

खजुरातून शरीरास अत्यावश्यक असलेली लोह (आयर्न) निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत असते. खजूर खाल्ल्याने रक्‍तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण सुधारते. खजूर खाल्ल्याने आपल्याला ऊर्जा मिळते, शक्‍ती मिळते. यामुळे थकवा दूर होतो.

खजुरामध्ये विविध प्रकारची जीवनसत्त्वे असतात. खनिजे, फायबर, तेल, कॅल्शियम, सल्फर, पोटॅशियम, फॉस्फरस, कॉपर आणि मॅग्‍नेशियम यासारखे गुणकारी घटक असतात. ते आपल्या आरोग्यासाठी व शरीरासाठी उपयोगी असतात.

संबंधित बातम्या

आपल्याला आपले वजन वाढवायचे असेल तर खजूर खा. खजुरामध्ये प्रोटीन, विटामिन्स व शुगर असते. खजूर रोज नियमितपणे खाल्ल्याने आपल्याला त्याचे फायदे जाणवतील.

बर्‍याच जणांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो, त्यांच्यासाठी खजूर हे एक प्रकारे वरदान आहे. खजूर रात्रभर पाण्यात भिजवत ठेवून ते सकाळी खाल्ल्याने चांगला लाभ होतो. खजुरामध्ये सॉल्युबल फायबर असतात. ते बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी उपयुक्‍त ठरतात.

कॅन्सरसंदर्भातील एका संशोधनात असे आढळून आले आहे की खजूर खाल्ल्याने पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.

खजूर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा व सकाळी भिजवलेल्या खजुराचा चुरा करून खा. हे हृदयासाठी उपयोगी आहे. याच्यात पोटॅशियम असते. हृदयासंबंधीच्या आजारांचा धोका कमी करण्यास ते उपयुक्‍त ठरते.

खजूर खाल्ल्याने कोलेस्ट्रोल नियंत्रित राहते. हाडे मजबूत होतात. आणि मुख्य म्हणजे, खजूर खाल्ल्याने आपल्याला ऊर्जा मिळाल्याने ताजेतवाने वाटते. 

– विजयालक्ष्मी साळवी

 

Back to top button