बद्धकोष्ठतेशी दोन हात | पुढारी | पुढारी

बद्धकोष्ठतेशी दोन हात | पुढारी

बद्धकोष्ठता ही काही जीवघेणी समस्या नाही किंवा हे आरोग्य ढासळत असल्याचे चिन्हही नाही. पण बद्धकोष्ठतेचा त्रास खरोखरच कुणाला धड सांगताही येत नाही आणि सहन करायचा म्हटलं तर तेही सहजसाध्य नाही. म्हणून बद्धकोष्ठतेचा त्रास का होतो आणि या त्रासाशी दोन हात कसे करता येऊ शकतात, याविषयी…

आपल्यापैकी अनेकांचा आणि अनेकींचाही हा अनुभव असेल की, बद्धकोष्ठतेमुळे बरीच गैरसोय होऊ शकते. सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, अशी परिस्थिती काही वेळा उद्भवते. कोणालाही कोणत्याही वेळी या समस्येला तोंड द्यावं लागू शकतं. वृद्ध आणि गरोदर स्त्रियांमध्ये तर ही समस्या वरचेवर होताना आढळते. या समस्येशी दोन हात करायचे तर त्यापूर्वी या समस्येमागची कारणं समजून घ्यायला हवीत. ही कारणं थोडक्यात पुढीलप्रमाणे सांगता येऊ शकतात.

अयोग्य जीवनशैली

पाण्याचं कमी सेवन

फायबरचं कमी सेवन

ठराविक मिनरल सप्लिमेंटस् किंवा औषधांचा वापर

बद्धकोष्ठता दूर ठेवण्यासाठी काही सोपे आणि वर्षांनुवर्षे चालत आलेले तोडगे आहेत. हे तोडगे समजून घेऊन, योग्य पद्धतीने, कुठलाही अतिरेक न करता अंमलात आणून बद्धकोष्ठतेशी दोन हात करणं शक्य होऊ शकतं.

विशेषत: पाणी भरपूर प्यावं.

सकाळी झोपेतून उठल्यावर कोमट पाणी प्यायल्याने शौचाला साफ होतं.

ताजी फळं, भाज्या विशेषत: हिरव्या पालेभाज्या आणि अख्खी धान्यं आणि त्यांचा कोंडा भरपूर खावा.

विशेषत: भरपूर फायबर असलेला आहार घेतल्याने केवळ बद्धकोष्ठताच नियंत्रणात येत नाही, तर इतरही अनेक फायदे होतात. फायबरमुळे पचनसंस्थेचं आरोग्य राखलं जातं, वजन नियंत्रणात राहतं.

 नियमित व्यायाम करावा.

शौचाला होण्यासाठी प्रेरित करणार्‍या घटकांचं नियमित सेवन करू नये. त्यामुळे आतड्यांमध्ये उपकारी जीवाणू नष्ट होऊन बद्धकोष्ठता गंभीर रूप धारण करते. अर्थात वेळीच सावध होऊन सुद‍ृढ जीवनशैलीच्या दिशेने पावलं टाकली तर बद्धकोष्ठतेशी दोन हात करणं आवाक्यात येऊ शकतं.

अवंती कारखानीस

 

Back to top button