कुपोषणाप्रमाणेच अतिपोषणही घातक ? | पुढारी | पुढारी

कुपोषणाप्रमाणेच अतिपोषणही घातक ? | पुढारी

एकीकडे कुपोषणामुळे होणारा मृत्यू, तर  दुसरीकडे अतिपोषणामुळे तरुण वयातच आजारांचे वाढत चाललेले प्रमाण हे वास्तव चित्र समोर येऊ लागले आहे. बदलत्या जीवनशैलीत खाण्यापिण्याच्या सवयीही बदलल्यामुळे कमी वयातच हृदयविकार, मधुमेह असे आजार वाढत सर्वच स्तरांमध्ये याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे पुरेसा पोषक आहार न मिळाल्याने कुषोषण, तर दुसरीकडे जंक फूडच्या वाढत्या सेवनामुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल, कॅन्सर यासारख्या आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे.

अति प्रमाणात कॅलरीचे सेवन केल्याने लठ्ठपणाशी संबंधित समस्या उद्भवतात. लठ्ठपणामुळे अनेक रोग होण्याची शक्यता वाढते. जसे हृदयरोग आणि धमन्यांचे आजार, मधुमेह असे विविध आजार जडतात. लठ्ठपणासारख्या आजारावर मात करण्यासाठी जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. 

संतुलित आहाराचे सेवन 

– रेस्टॉरंटमध्ये उच्च कॅलरीयुक्त जेवण दिले जाते. ज्यामुळे वजन किंवा लठ्ठपणा वाढू शकतो. म्हणूनच अशा खाण्याच्या सवयींपासून दूर राहणे गरजेचे असून निरोगी जीवनशैली अमलात आणणे आवश्यक आहे. हिरव्या पालेभाज्या, कोशिंबीर, सूप आणि ग्रील्ड फिश असे पदार्थ रेस्टॉरंटमध्ये खायला हरकत नाही, ज्यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते आणि फॅटस् देखील कमी असतात. बैठी जीवनशैली असणार्‍यांनी देखील वेळात वेळ काढून शारीरिक हालचाली आणि व्यायामाकडे लक्ष द्यावे.

– प्रत्येक घास चावून चावून सावकाश खा. भूक नसताना खाल्ल्यास तसेच अधिक प्रमाणात खाणे हेदेखील आरोग्यासाठी घातक ठरते. यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी साठल्यामुळे लठ्ठपणा होऊ शकतो.

– जंक फूड, फास्ट फूडचे सेवन करू नका. आपल्या रोजच्या आहारात ताजी फळे, तसेच पालेभाज्यांचा समावेश असावा. बेकरीचे पदार्थ, मैदायुक्त पदार्थ टाळणे योग्य आहे. बाहेर जे पदार्थ खातो, त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मुलांना संतुलित आहार द्या.

– अन्नाचे गरजेपेक्षा जास्त सेवन करू नका. आपल्याला दररोज किती आहार घ्यावा, याबद्दल आहारतज्ज्ञांशी चर्चा करा. अति खाणे टाळण्यासाठी लहान प्लेट वापरा. आपण एखाद्या कार्यक्रमात जात असल्यास आपण काय खावे आणि किती खावे, हे आपण स्वतः ठरवावे आणि त्यामध्ये कमी कॅलरीच्या पदार्थांचा समावेश करावा. 

आपल्या आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. संतुलित आहार आणि व्यायाम आपल्याला निरोगी आयुष्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतो.

Back to top button