दुर्बीण शस्त्रक्रिया : शोध व सद्यस्थिती | पुढारी

दुर्बीण शस्त्रक्रिया : शोध व सद्यस्थिती

युद्ध करण्यापूर्वी युद्धभूमीबद्दल संपूर्ण इत्थंभूत माहिती असणारा वाटाड्या जर भेटला तर युद्धाचे डावपेच व्यवस्थितपणे करून युद्धात विजय प्राप्त करणे सोपे जाते. हे जीवनातल्या कोणत्याही घडामोडीसाठी लागू पडते.

अगदी स्वयंपाक करीत असताना जर स्वयंपाक घरातील जिन्नस, मसाले, भांडी व इतर उपयुक्त गोष्टींची माहिती असेल, तर चांगला स्वयंपाक अगदी थोड्या वेळेत करायला एखाद्या सुगरणीला शक्य आहे.

तसेच काहीसे शस्त्रक्रियेबद्दल म्हणावे लागेल. शरीरविज्ञान शिकत असताना Anatomy हा एक भाग आहे. व Applied Anatomy हा दुसरा भाग आहे. हा झाला पारंपरिक शरीर विज्ञानातील घटक, परंतु बदललेल्या काळानुसार आज दुर्बीण शस्त्रक्रियेला अनुरूप शरीर विज्ञान असे म्हणजेच Laproscopic Anatomy पारंपरिक शस्त्रक्रियेदरम्यान एक एक थर उलगडल्यानंतर दिसणारी शरीररचना दुर्बिणीतून दिसणार्‍या शरीर विज्ञानापेक्षा थोडीसी भिन्न असते. विशेषत: हर्नियाच्या रचनेबाबत शरीराचे वेगवेगळे पडदे एकाखाली एक असतात व एकमेकास जवळजवळ चिकटलेलेच असतात. परंतु, या दोन पडद्यांमध्ये CO2 गॅस भरून दिसणारी Structures काही प्रमाणात भिन्न दिसतात. 

संबंधित बातम्या

टाक्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान प्रत्येक अवयवाचे प्रत्यक्ष अवलोकन करून त्याच्या भागाला स्पर्श करून आपण त्याबद्दलची परिस्थिती जाणून घेत असतो. परंतु, पारंपरिक शरीरशास्त्रापेक्षा थोडी वेगळी व स्पर्शज्ञानाचा आढावा न घेता येणारी (Tactile Feedback) हे तंत्र, म्हणजेच दुर्बीण शस्त्रक्रिया होय. केवळ आपल्या नजरेने पडद्यावर बघून त्याबद्दलचे आडाखे बांधण्यासाठी खरोखर खूप कालावधीपर्यंत दुर्बीण शस्त्रकियेचा अभ्यास आत्मसात करणे गरजेचे बनलेले आढळते. केवळ दुर्बिणीद्वारे दिसणार्‍या अवयवाच्या भागाला (Visual Parception)  अवलोकन करून त्याचे Tissue differanciation  ओळखणे व पडद्यावर दिसणार्‍या उतीबद्दल चित्राद्वारे आकलन करून अवयव सामान्य आहे की व्यंग रोगग्रस्त आहे हे जाणून घेण्यासाठी खरोखर या विज्ञानाचा ध्यास घ्यावा तेवढा कमीच.

तर प्रत्यक्ष अवयव न हाताळता पडद्यावर दिसणारी रचना याचा स्वत:च्या मनात एक त्रिमीती चित्र रंगवून केलेली शस्त्रक्रिया ही त्या रुग्णासाठी दुर्बीण शस्त्रक्रियेचे वरदानच म्हणावे लागेल. Laproscopic Anatomy चा अभ्यास करताना काही वेळेस अवयवाच्या आतमध्ये आपण प्रवेश केला आहे, असे समजून आजूबाजूच्या अवयवाचे आकलन करावे लागते. 

आपण मागील लेखामध्ये Enrgy Source दुर्बीण शस्त्रक्रियेत रक्तस्राव कसा आटोक्यात आणावा किंवा रक्तस्राव कसा बंद करतात, हे जाणून घेतले आहे. आज आपण दुर्बीण शस्त्रक्रियेमध्ये दुर्बीण शस्त्रक्रियेचा कशाप्रकारे विकास झाला, हे पाहू. आपण शाळेत बहिर्गोल व आंतरगोल भिंग शिकलो आहोत. त्याचा वापर वर्षानुवर्षे आपण करीत आहोत. 1960 साली ठेव Rod Lense चा शोध लागला. या ठेव Rod Lense द्वारे त्याच्या एका टोकास ठेवलेला पदार्थ कोणताही फरक न होता दुसर्‍या टोकाला डोळा लावल्यास दिसू शकतो. याचा उपयोग दुर्बीण शस्त्रक्रियेच्या दुर्बिणीसाठी Laproscopy, Hysteroscopy, Cysteoscopy इत्यादीसाठी झाला. 19 व्या शतकातील 7-8 दशकात Handicam चा शोध लागला तेव्हा या दुर्बिणीच्या एका टोकाला Handicam लावल्यास चित्र टी.व्ही.मध्ये दिसत असे. अशाप्रकारे दुर्बीण शस्त्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर सर्वेक्षण (CCTV) चे कॅमेरे आले. हे कॅमेरे Handicam पेक्षा छोटे असल्यामुळे ते दुर्बिणीच्या टोकाला लावल्यास सोयीचे झाले व त्याचा वापर दुर्बीण शस्त्रक्रियेसाठी होऊ लागला. विमानातून जमिनीवरचे व्हिडीओ घेणार्‍या कॅमेर्‍याचा शोध लागल्यानंतर अशा प्रकारच्या Analogue वरून डिजिटल कॅमेरे वापरात आले. तरीही त्याचा सिग्नल लॉस होत होता व चित्र अजून अस्पष्ट होत असे. तेव्हा Camera Chips चा शोध लागला. तेव्हा अवयवात किंवा पोटात जाणार्‍या टोकाला अशा चिप्स बसविता येतात, हे आढळले व त्यामुळे Chip on Tip Camera वापरात आला. सुरुवातीला चिप ऑन टिपमध्ये पूर्वीच्या Camera मध्ये रॉडसारख्या दुर्बिणीतून लाईट म्हणजे प्रकाशाचा प्रवास करून चित्र पडद्यावर आणावे लागे. आता त्या दुर्बिणीतून प्रकाशाचा प्रवास करण्याऐवजी चिपकडून टी.व्ही. स्क्रीनकडे जाणार्‍या वायर्स असल्याने दुर्बिणी लवचिक किंवा वाकड्या करता येऊ लागल्या.

लहानपणापासून आपण प्रकाश सरळ रेषेत प्रवास करतो हे वाचलेले आहे. परंतु, 1980 च्या दरम्यान Fiber Optic चा शोध लागला व त्यामुळे जसे पाणी प्लास्टिकच्या पाईपमधून वाहते, तसेच काहीसे प्रकाशाचे झाले व लाईट बल्ब बाहेर ठेवून Fiber Optic केबलद्वारे प्रकाशझोत पोटात टाकले जाऊ लागले. अशा प्रकारे दुर्बीण लवचिक व पॉवरफुल्ल Cold लाईटद्वारे पोटातील सूक्ष्म बदल टी.व्ही.च्या पडद्यावर पाहणे शक्य झाले आहे.

अशाप्रकारे गेल्या 25 ते 30 वर्षांमध्ये दुर्बीण शस्त्रक्रियेमध्ये आमूलाग्र बदल घडून हे शास्त्र आता कमीत कमी धोक्याचे व जास्तीत जास्त मानवी जीवनास उपयुक्त झालेले दिसते.  90 च्या दशकातील वैद्यकीय व्यावसायिक या उत्क्रांतीचे साक्षीदार आहेत व एकूणच याचा इतिहास रंजक आहे. आज स्वादूपिंडाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, पॅराथायरॉईडची शस्त्रक्रिया, स्तनातील गाठीपासून ते विविध प्रकारचे हर्निया, बेंबीतील, जांघेतील ऑपरेशनंतरचा हर्निया तसेच गर्भाशय, पित्ताशय व अपेंडिक्स काढण्याच्या शस्त्रक्रियेपासून ते गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर उद्भवलेले दोन आंतड्यातील चिकटा सोडविण्याच्या शस्त्रक्रियेपर्यंत विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे यशस्वीरीत्या करता येतात. जे तंत्रज्ञान उपयुक्त असते त्याचा विकास होतो व ज्याच्या उपयुक्ततेपेक्षा Complications  जास्त असतात ते काळाच्या पडद्याआड जातात. अशाच एका तंत्रज्ञानाबद्दल (Notes) Natural Orifice transluminal Endoscopic Surgery व इतर शस्त्रक्रियेबद्दल पाहू.

Back to top button