‘कोरोना’साठीची प्लाझ्मा थेरेपी | पुढारी | पुढारी

‘कोरोना’साठीची प्लाझ्मा थेरेपी | पुढारी

डॉ. प्रवीण हेंद्रे

भारतात (आय. सी. एम. आर.) या शासकीय आरोग्य संस्थेद्वारे प्लाझ्मा थेरपी ही केवळ संशोधनासाठी वापरण्यास परवानगी आहे. ही प्रणाली सर्वसाधारण उपचारपद्धती म्हणून आजपर्यंत तरी जगात कोठेही स्वीकारलेली नाही, हे आपण लक्षात घेणे गरजेचे आहे. या उपचारपद्धतीमागील तर्कशास्त्रीय तत्त्वे पाहता व काही प्रारंभिक यशस्वी परिणाम पाहता लवकरच ती सर्वश्रुत होईल, असे वाटते.

सर्वप्रथम एक गोष्ट समजणे गरजेचे आहे, ते म्हणजे जेव्हा मानवी शरीरावर बाह्य जंतूंचा (Bacteria) प्रादुर्भाव होतो. तेव्हा शरीरात अशा जंतूविरोधी प्रतिजैविक प्रतिपिंडे तयार होतात. जेव्हा विषाणूचा (व्हायरस) प्रादुर्भाव होतो, तेव्हा त्याच्याविरोधी interferon नावाची प्रतिपिंडे तयार होतात. म्हणूनच जेव्हा आपल्याला फ्लूचा आजार Influenza Virus चा प्रादुर्भाव होतो तेव्हा त्याच्याविरोधी interferon तयार होण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो व त्यानंतर ही सर्दी कमी होऊन आपण बरे होतो.

काही विषाणूची रचना माहिती झाल्यानंतर त्याच्याविरोधी लस तयार करून अशा प्रकारच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून आपण संक्रमणापासून बचाव करू शकतो. पोलिओचा डोस हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.

तसेच पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे रेबीजचा आजार होऊ नये यासाठी Rabipur नावाच्या लसीची तीन इंजेक्शन टोचून घेतलेल्या व्यक्‍तीस रेबीज होत नाही. याला आपण सक्रिय रोगप्रतिकारकशक्‍ती लसीकरण (Active Immunisation) म्हणू. त्यामुळे रेबीज विरोधीची प्रतिजैविके लसीकरण केलेल्या व्यक्‍तीच्या शरीरात तयार होतात. परंतु, ज्या व्यक्‍तीने असे रेबीजविरोधी लसीकरण करून घेतलेले नाही व जर त्याला रेबीज कुत्रा चावला, तर त्यास Rabipur लसीबरोबरच रेडीमेड रेबीजविरोधी प्रतिजैविके देतात. त्याला Anti Rabies immunoglobuline असे नाव आहे. (त्यास Passive immunisation म्हणतात). 

‘कोरोना’ हा आजार व विषाणू वैद्यकीय शास्त्रासाठी अगदी नवीन असल्यामुळे त्याच्याविरुद्ध (Active immunisation) सक्रिय लसीकरण आज उपलब्ध नाही. परंतु, आज ‘कोरोना’चा प्रादुर्भाव होऊन संपूर्ण बरे झालेल्या व्यक्‍ती आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यांच्या शरीरात ‘कोरोना’ विरोधी रेडिमेड प्रतिजैविके तयार झालेली असावीत, असे गृहीत धरून व ती वापरून ज्या व्यक्‍तीला कोरोनाचा गंभीर आजार झाला आहे, त्याला बरे करणे हा संशोधनाचा विषय आहे. 

प्रथम आपण प्लाझ्मा काय आहे हे समजावून घेऊ. उदा : दूध जेव्हा फाटते तेव्हा त्याचा (सांका) घट्ट पदार्थ व पाणी वेगळे होते तसेच काहीसे. जेव्हा रक्‍त गोठते तेव्हा रक्‍ताची गुठळी व त्यातील पाणी हे वेगळे होते, या द्रवास Serum म्हणतात. परंतु, दूध न फाटता त्यातील फॅट (लोणी) डेअरीमध्ये वेगळे केले जाते व उरलेले पाणीदार दूध काढून वेगळे करता येते. तशी काहीशी प्रक्रिया रक्‍ताबाबत करता येते.

रक्‍तामध्ये लाल रक्‍तपेशी, पांढर्‍या पेशी व प्लेटलेटस् हे घट्ट असलेले घटक आहेत. उर्वरित पाणी म्हणजेच प्लाझ्मा होय. या प्लाझ्मामध्ये काही immunoglobuline प्रतिजैविके व interferon म्हणजे प्रतिविषाणू प्रतिपिंडे व इतर घटक असतात. ज्या व्यक्‍तीस कोरोना झाला आहे, अशा व्यक्‍तीच्या शरीरातील प्लाझ्मामध्ये कोरोनाविरुद्ध तयार झालेल्या रेडिमेड प्रतिजैविकांचा वापर केल्यास, रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते, असे प्राथमिक प्रयोगानंतर काही रुग्णांमध्ये अनुभव आलेला आहे.

जसे डेंग्यूसाठी रक्‍तातील केवळ प्लेटलेटस् काढून उर्वरित रक्‍त त्या रक्‍तदात्यांच्या शरीरात परत संक्रमित केले जात असते. तसेच, असे Componant Sapration  यंत्राद्वारे रक्‍तातील विविध घटक विलगीकरण करण्याच्या प्रक्रियेने केवळ प्लाझ्मा वेगळा काढून उरलेल्या रक्‍तपेशी त्या रक्‍तदात्याला पुन्हा चढवण्याची प्रक्रिया करता येते. आपल्या शरीरातील एका वेळेस अशाप्रकारे 500 मिली प्लाझ्मा काढता येतो. रक्‍तदान जसे प्रत्येक तीन महिन्यांनी करता येते तसेच हे प्लाझ्मादान प्रत्येक दहा दिवसांनी करता येते. कारण काढलेल्या प्लाझ्मा पुन्हा दहा दिवसांत शरीरात तयार होत असतो. तेव्हा अशा कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन बरे झालेल्या व्यक्‍तीचा प्लाझ्मा दोन ते तीन कोरोना संक्रमित गंभीर प्रकृती झालेल्या रुग्णास देण्याच्या प्रक्रियेस प्लाझ्मा उपचार म्हणतात. अशा प्रयोगासाठी आपल्या कोल्हापूरला परवानगी मिळणे हे या महामारीसाठी योगदान करण्याची संधीच आहे, असे वाटते. हा प्रयोग मोठ्या प्रमाणात यशस्वी व्हावा, तसेच कोरोनावरील लस लवकरात लवकर तयार व्हावी, यासाठी संपूर्ण वैद्यकीय शास्त्रज्ञ अहोरात्र झटत आहेत.

Back to top button