हिवाळ्यात वाढतो प्रोस्टेटचा आजार | पुढारी | पुढारी

हिवाळ्यात वाढतो प्रोस्टेटचा आजार | पुढारी

डॉ. सूरज लुणावत

बेनाईन प्रोस्टेटिक हायपरप्लाशिया (बीपीएच) अर्थात प्रोस्टेट ग्रंथीच्या आकारमानात हिवाळ्याच्या काळात होणारी वाढ ही वयस्कर पुरुषांमध्ये आढळणारी सामान्य अवस्था आहे. या काळात प्रोस्टेटच्या रुग्णांमध्ये 30 टक्के वाढ झाल्याचे दिसून येते. रात्री द्रवपदार्थांचे सेवन कमी करणे, जीवनशैलीतील बदल तथा औषधे घेऊन ही लक्षणे दूर करता येतात. वृद्ध (60 वर्षांवरील) पुरुषांना प्रोस्टेटच्या आकारमानातील वाढीची समस्या जास्त भेडसावते.

वीर्यस्खलनाच्या वेळी शुक्राणूंचे वहन करणारा स्राव प्रोस्टेट ग्रंथी निर्माण करते. या ग्रंथी मूत्रनलिकेच्या बाजूला असतात. जेव्हा एखाद्याला बेनाईन प्रोस्टॅटिक हायपरप्लाशियाचा (बीपीएच) त्रास होतो, तेव्हा त्या व्यक्तीची प्रोस्टेट ग्रंथी सामान्य आकारमानाहून मोठी झालेली आहे. त्यामुळे मूत्रनलिका पिळल्यासारखी होते. परिणामी, मूत्राचा प्रवाह कमकुवत होतो व रात्री लघवीची भावना होऊन सतत झोपेतून जाग येत राहते. लघवीला सतत जावे लागणे किंवा घाईने जावे लागणे, रात्रीच्या वेळी लघवी लागणे आणि मूत्राशय पूर्णपणे रिकामे न करता येणे आदी लक्षणे जाणवतात. दुर्दैवाने हवामान थंड झाले, की लघवीसंदर्भातील लक्षणे अधिक तीव्र होतात आणि हिवाळ्यात प्रोस्टेट ग्रंथी वाढण्याचे प्रमाणही वाढते.  

हिवाळ्यात आपल्याला घाम कमी येतो आणि घामावाटे आपल्या शरीरातील द्रवपदार्थ बाहेर टाकले जाण्याचे प्रमाण कमी होते. मूत्राची निर्मिती अधिक होते. त्यामुळे हिवाळ्यात आपल्याला अधिक वेळा लघवीला जावे लागते. एरवी ही समस्या फारशी गंभीर नाही; पण त्यावर वेळीच उपाय झाला नाही, तर त्याचा त्रासदायक परिणाम होऊ शकतो.

बीपीएचच्या लक्षणांपासून आराम हवा असेल, तर काही सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक ठरते. लघवी करताना मूत्राशय पूर्णपणे रिकामे होईल, याची काळजी घ्यावी. कारण, त्यामुळे सतत लघवीला जाण्याची गरज कमी होईल. पुरुष चिंतेत किंवा तणावाखाली असतात, तेव्हा त्यांना वारंवार लघवीची भावना होते. शारीरिकद़ृष्ट्या तंदुरुस्त राहून तसेच ध्यानधारणेसारख्या तणावमुक्तीच्या उपाययोजना करून तणाव कमी करावा. संध्याकाळनंतर द्रवपदार्थांचे सेवन टाळावे. रात्री कॅफिनयुक्त पेये किंवा मद्य घेणे टाळावे. कारण, त्यामुळे मूत्राशयात दाह निर्माण होऊ शकतो आणि मूत्रपिंडे अधिक मूत्रनिर्मितीसाठी उत्तेजित होऊ शकतात. परिणामी, रात्रीच्या वेळी लघवीची भावना वाढते. ओटीपोटाचे स्नायू मजबूत करण्यासाठी व्यायाम करावा. त्याचप्रमाणे हिवाळ्यात थंड हवामानामुळे वारंवार लघवीला जावे लागत असल्याने गरम कपडे घालून स्वत:ला उबदार ठेवण्याचा प्रयत्न करावा.

 

Back to top button