मांजर आणि कुत्रा | पुढारी | पुढारी

मांजर आणि कुत्रा | पुढारी

फार फार वर्षांपूर्वी मांजर व कुत्रा एकमेकांचे चांगले मित्र होते. दोघेही त्यांच्या धन्याची मन लावून सेवा करायचे. एके दिवशी कुत्रा मांजराला म्हणाला, “आपली कामे आपण वाटून घेऊ या. त्याबाबत रीतसर करारनामाच बनवू, मग भविष्यात वाद होणार नाहीत.”

मांजराने या गोष्टीला संमती दिल्यावर एक करारनामा करण्यात आला. त्या करारनाम्यानुसार कुत्र्याने घराबाहेर राहून घराचे संरक्षण करायचे व मांजराने घरात राहून घराची देखभाल करायची, असे ठरले. 

करारनामा घरातील एका अडगळीच्या खोलीत जपून ठेवण्यात आला. सहा महिने झाले, हिवाळा आला. घराबाहेर राखण करणारा कुत्रा थंडीने कापू लागला. मांजर मात्र घरात शेकशेगडीची ऊब घेत चवदार अन्नाचा आस्वाद घेत राहिले. कुत्र्याला हा अन्याय सहन होईना. एके दिवशी न राहवून तो मांजराला म्हणाला, “ऊन असो वा  पाऊस, मी घराबाहेर राखण करून चोरांपासून घराचे रक्षण करतो. त्याबदल्यात मला काय 

संबंधित बातम्या

मिळते? तर, शिळेपाके अन्न व कडाक्याच्या थंडीत कुडकुडणे! तू घरात केवळ शेपटी वर करून फिरतेस. काही काम करत नाहीस. तुझी मात्र मौज आहे. हा माझ्यावर अन्याय आहे. हा अन्याय मी सहन करणार नाही.”

मांजर रागावून म्हणाली, “पण करार तर तसा आहे.” कुत्र्याने करारनाम्याची प्रत मांजराकडे मागितली. मांजर अडगळीच्या खोलीत करारनामा आणण्यास गेले. तेथे उंदरांनी करारनाम्याच्या कागदाचा चावून चोथा केला होता. प्रचंड संतापलेल्या मांजराने त्याच्या पंज्यांनी जमेल तेवढ्या उंदरांना ठार केले. कुत्र्याला जेव्हा करारनाम्याबाबत कळले तेव्हा त्याने मांजराला दातात पकडले. त्याचा दम निघेपर्यंत त्याने त्याला चांगलेच हलवले. आताही कुत्रा मांजराला पाहतो तेव्हा रागावून त्याच्या पाठी लागतो, तर मांजर कुत्र्याकडून झालेल्या अपमानाबद्दल उंदरांना जबाबदार धरत त्यांना ठार मारते.

Back to top button