Career in Tourism | पर्यटन क्षेत्रात रोजगाराची मोठी संधी, जाणून घ्या पर्यटनविषयक अभ्यासक्रमांविषयी | पुढारी

Career in Tourism | पर्यटन क्षेत्रात रोजगाराची मोठी संधी, जाणून घ्या पर्यटनविषयक अभ्यासक्रमांविषयी

हिंडण्या-फिरण्याची आवड, सर्व प्रकारच्या लोकांशी संवाद साधण्याची कला, विविध ठिकाणचा इतिहास आणि संस्कृती याविषयीची जिज्ञासा, प्रसन्न व्यक्तिमत्त्व, लोकांना सांभाळून घेण्याची कला, चांगली स्मरणशक्ती, आत्मविश्वास, संयोजनाची आवड, व्यवहारज्ञान, न संकोचता वेगवेगळ्या भाषा शिकणं आणि बोलणं असं सगळं जर तुम्हाला आवडत असेल, यात जर तुम्हाला गती असेल, तर पर्यटन अर्थात टुरिझमचं क्षेत्र हे करिअर करण्याचं क्षेत्र म्हणून तुम्हाला खुणावू शकेल, यात शंका नाही. (Career in Tourism)

संबंधित बातम्या 

आजघडीला देशातल्या सगळ्या महत्त्वाच्या संस्था आणि विद्यापीठातून ट्रॅव्हल अँड टुरिझम संदर्भातले पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. सामान्यतः दहावी करून बारावीची दोन वर्ष चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर पर्यटनविषयक अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतात. अर्थात पूर्वीच्या मानाने हल्ली पर्यटन क्षेत्र बरंच बहरलं आहे. तसंच या अभ्यासक्रमांकडचा ओढाही वाढला आहे. त्यामुळे प्रवेशाबाबत बरीच स्पर्धा जाणवते. आपला नोकरी-व्यवसाय किंवा इतर शिक्षण चालू असताना पर्यटनाशी संबंधित लहानसा कोर्स करायचा असेल, तर टिकेटींग अँड रिझर्व्हेशन अर्थात तिकीट काढणं आणि आरक्षण करणं, तसंच टुरिझम अँड गाईडिंग अशा छोट्या अभ्यासक्रमांचाही विचार करता येऊ शकतो.

टुरिझम संदर्भातलं शिक्षण पूर्ण केल्यावर खासगी प्रवासी कंपन्यांमध्ये नोकरीला वाव असतो; परंतु नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय सुरू करणंही शक्य असतं. हल्ली अनेक जण प्रवासी कंपन्यांबरोबर न जाता टूर संयोजकाचं मार्गदर्शन घेऊन टूर्सचं नियोजन करून घेतात आणि फिरस्तीचा आनंद लुटतात. टूर संयोजक या नात्याने कन्सल्टन्सी व्यवसाय सुरू करणं शक्य असतं. प्रवासाची दिशा आणि मार्ग ठरवण्यापासून तिकीट काढून देणं, हॉटेलची तसंच राहण्या-खाण्याची व्यवस्था करून देणं आणि प्रवासात कोणतीही अडचण आल्यास त्यातून मार्ग काढण्यासाठी मदत करणं, अशा सर्व प्रकारच्या सेवा या कन्सल्टन्सीअंतर्गत पुरवता येतात.

हल्ली प्रवासासाठी म्हणून अनेक कुटुंबं वेगळं बजेट आखतात, त्यासाठी खास बचत करतात. दरवर्षी काही पैसे टूर्ससाठी म्हणून बाजूला टाकतात. त्यामुळे जर कुणी टूर संयोजक म्हणून व्यवसाय सुरू केला, तर त्यासाठी फी आकारून चांगली सेवा देणं आणि विश्वासार्ह टूर कन्सल्टन्ट म्हणून बस्तान बसवणं, हे काही अशक्य नाही. (Career in Tourism)

Back to top button