दातांचे सौंदर्य टिकवण्यासाठी ‘ही’ फळे खावीत | पुढारी

दातांचे सौंदर्य टिकवण्यासाठी 'ही' फळे खावीत

डॉ. निखिल देशमुख

दात कुंदकळ्यांसारखे असावेत, असे म्हटले जाते. दातांचे सौंदर्य टिकवण्यासाठी लहानपणापासूनच प्रयत्न करावे लागतात. मग मोठेपणी मात्र वर म्हटल्याप्रमाणे कुंदकळ्यांसारखे दात येतात; पण दात आजारी पडले तर काय? दंतवैद्याकडे जावे लागते.

संबंधित बातम्या 

दंतवैद्याकडे जाणे कुणालाही आवडत नाही. म्हणूनच बहुतेकदा दातांची दुखणी अंगावरच काढली जातात. अगदीच नाइलाज झाला म्हणजे डेंटिस्टकडे जाणे होते. दातांचे दुखणे नको आणि त्यावर औषधोपचार तर नकोच नको, असे वाटत असेल तर मुळात हे दुखणेच उद्भवू नये, यासाठी काहीतरी करायला हवे. हे काही तरी करायचे, म्हणजेच चक्क विविध फळे, भाज्या आणि कडधान्ये खायची. विविध फळे, पालेभाज्यांमध्ये खूप पोषक द्रव्ये असतात आणि हेल्दी फूड म्हणून हे शरीराचे संरक्षणही करतात.

टूथब्रश फूडस् ही संज्ञा हेच सुचवते. ही संज्ञा युरोप आणि अमेरिका या देशांपाठोपाठ आता भारतातही लोकप्रिय होऊ लागलेली आहे. टूथब्रश फूडस् हे प्रत्येकासाठीच सुंदर हास्य आणि आरोग्यदायी जीवनशैली राखण्यासाठी आवश्यक आहे. नैसर्गिक टूथब्रश फूडसाठी खालील काही पदार्थांचे आणि फळांचे नियमित सेवन केले पाहिजे.

आपले दात स्वच्छ आणि मजबूत राहावेत, यासाठी स्ट्रॉबेरी हे एक अत्यंत उपयुक्त फळ आहे. स्ट्रॉबेरीमध्ये असे अनेक गुणधर्म आणि वैशिष्ट्ये आहेत, जे दात स्वच्छ करून त्यांना ब्लीच करण्यास मदत करतात. चहा आणि कॉफीमुळे दातांवर पडलेले डाग स्ट्रॉबेरीमुळे स्वच्छ होतात. सबब, जेवणानंतर नियमितपणे थोडीफार स्ट्रॉबेरी खावी. स्ट्राबेरीमधील आम्ल दातांना नैसर्गिकरित्या उजळपणा आणते.

स्ट्रॉबेरीच्या तुलनेत कलिंगडमध्ये जास्त प्रमाणात मॅलिक अ‍ॅसिड असते. हा घटक लाळेचे उत्पादन वाढविण्याचे आणि दातांवर अडकलेली घाण काढून टाकण्याचे काम करतो. कलिंगडातील तंतुमय धागे किंवा चोथा दातांना स्क्रब करण्याचे काम करतात, ज्यामुळे दातांवरील पिवळे, काळे व घाणेरडे डाग दूर होतात. पपई हे दातांसाठी एक उत्तम फळ आहे, ज्यात अननसासारखेच प्रोटियोलिटिक एन्झाइम असते.

पपईमध्ये असलेल्या एन्झाइमला पपॅन म्हणतात आणि ते दातांच्या स्वच्छतेसाठी लाभदायक ठरते. याखेरीज सफरचंद हे लाळेचे उत्पादन वाढवून नैसर्गिकरीत्या दात साफ करण्याचे काम करते. यामुळे श्वासांतील किंवा तोंडाची दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट होतात. सफरचंदातील काही घटक दात स्वच्छ करण्याचे काम करतात.

Back to top button