एक ओजस्वी इतिहासकार : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे | पुढारी

एक ओजस्वी इतिहासकार : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

पांडुरंग बलकवडे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातच नव्हे, तर संपूर्ण देशात शिवचरित्रावरच्या व्याख्यानमालेतून छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. बाबासाहेब यांच्यापासून प्रेरणा घेऊन आज शेकडो तरुण शिवचरित्राने भारले आणि त्यांनी आपल्या परीने योगदान दिले.

बाबासाहेबांनी नागपंचमीच्या दिवशी शंभराव्या वर्षात पदार्पण केले. माझा आणि बाबासाहेबांचा साधारणपणे 40 ते 50 वर्षे परिचय होता. माझे वडील नामदेवराव बलकवडे यांचा साधारणपणे 70 ते 80 वर्षांपूर्वी बाबासाहेबांशी इतिहासाच्या प्रेमापोटी संबंध आला. त्यातून त्यांची चांगली मैत्री झाली. माझे वडील नामदेवराव बलकवडे हे 1940 पासून भारत इतिहास संशोधक मंडळात येत होते. त्याच सुमारास बाबासाहेबही मंडळाच्या सहवासात आले. बाबासाहेबांचे वडील मोरेश्वर पुरंदरे इतिहासाचे शिक्षक होते. त्यामुळे बाबासाहेबांना लहान वयातच इतिहासाचे बाळकडू मिळाले. पुरंदरे घराणे 500 वर्षांपूर्वीचे वारसा असलेले आणि इतिहासातले महत्त्वाचे घराणे आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या घराण्यात बाबासाहेब जन्माला आले होते.

बाबासाहेब अगदी लहान असताना वडिलांच्या प्रेरणेतून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, मराठ्यांचा इतिहास याच्या प्रेमात पडले आणि तो जाणून घेण्याच्या प्रयत्नाला त्यांनी सुरुवात केली. बाबासाहेबांनी शिक्षणाचे प्राथमिक धडे गिरविल्यानंतर अगदी लहान वयातच ते भारत इतिहास संशोधक मंडळाच्या सहवासात आले. इतिहासाचार्य राजवाडे यांनी 1910 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासावर संशोधन करण्यासाठी आणि तो इतिहास जगासमोर आणण्याच्या द़ृष्टीने भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली. आता त्याला बरीच वर्षे उलटली आहेत. राजवाडे यांच्यानंतर ग. ह. खरे, दत्तो वामन पोतदार, शं. ना. जोशी ही सगळी मंडळी मंडळात कार्यरत होती. त्यावेळी बाबासाहेबांच्या वडिलांचा आणि मंडळाचा संबंध आला. वडिलांबरोबर 10 वर्षांचे असताना बाबासाहेब पहिल्यांदा मंडळात आले. त्यांना मंडळातच शिवाजी महाराजांविषयीचे आणि मराठ्यांच्या इतिहासाविषयीचे प्रचंड आकर्षण निर्माण झाले. बाबासाहेबांनी त्यानंतर उर्वरित आयुष्य शिवचरित्रासाठी, मराठ्यांच्या इतिहासासाठी स्वत:ला वाहून घेतले. बाबासाहेब हे आपल्याला शिवशाहीर, शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे म्हणून माहीत होते. परंतु इतिहास संशोधक बाबासाहेब पुरंदरे आपल्याला तितकेसे माहिती नाहीत. आपल्या वडिलांसोबत बाबासाहेब मंडळात आले आणि पुढे ते वारंवार मंडळात येऊ लागले. त्यांना आपण शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करावा असे वाटले. त्यानंतर त्यांना मंडळाच्या इतिहास संशोधकांनी सांगितले की, इतिहास हे एक शास्त्र आहे, ते पुराव्याचे शास्त्र आहे. इतिहासाची साधने-कागदपत्रे म्हणजे मोडी कागदपत्रे, बखरी, ताम्रपट, नाणी, शिलालेख यांतून आपल्याला इतिहासाचे ज्ञान होते. त्यातून पुरावे मिळतात. त्यातून बाबासाहेबांच्या लक्षात आले की, आपण या कागदपत्रांचा अभ्यास केला पाहिजे. हा अभ्यास करण्यासाठी बाबासाहेब 1940 च्या सुमाराला मंडळात यायला लागले. त्यांनी मोडी कागदपत्रांचे संशोधन सुरू केले. राजवाडे आणि त्यांच्याबरोबरच्या सहकार्‍यांनी मंडळातील मराठ्यांच्या इतिहासावरील फार मोठा ठेवा जमा करून ठेवलेला आहे.

थोर इतिहास संशोधकांनी मंडळामध्ये मोडी, पर्शियन, इंग्रजी अशी सुमारे 15 लाख कागदपत्रे जमा करून ठेवली असून, या कागदपत्रांचा आपण अभ्यास केला पाहिजे, त्यातून मराठ्यांचा प्रसिद्ध इतिहास पुराव्यांच्या आधारे जगासमोर आणला पाहिजे, अशा ध्येयाने बाबासाहेब हे मंडळात संशोधन करायच्या प्रक्रियेत आले. त्यामध्ये त्यांना त्या काळातले दिग्गज इतिहास संशोधक शं. ना. जोशी आणि ग. ह. खरे यांचे मार्गदर्शन लाभले. यातून बाबासाहेब संशोधनाच्या कार्यात प्रावीण्य मिळवत गेले. ते मोडी शिकले.

बाबासाहेबांनी त्यासाठी मोडी लिपी, पर्शियन लिपी आणि इंग्रजी, डच, फ्रेंच, पोर्तुगीज अशा भाषांचाही आवश्यकतेप्रमाणे अभ्यास केला. त्यातून त्यांचे संशोधन वाढीस लागले. बाबासाहेबांनी मंडळामध्ये अनेक संशोधनपर निबंध वाचले. परंतु 1947 मध्ये पहिल्यांदा आपल्या मंडळाच्या त्रैमासिकात 28 पत्रे विविध विषयांशी संबंधित छापली. पहिली 27 पत्रे आणि त्यानंतरच्या काळात एक पत्र अशी अतिशय महत्त्वाची 28 कागदपत्रे मंडळाच्या त्रैमासिकात छापली. या कागदपत्रांत बाजीराव पेशवे, चिमाजी अप्पा पेशवे, तत्कालीन वेगवेगळ्या ऐतिहासिक घराण्यांची पत्रे आहेत. या कागदपत्रांचे मराठ्यांच्या इतिहासात खूप महत्त्व आहे. यातून आपल्याला देदीप्यमान इतिहास कळतो. या पत्रातून अनेक मोहिमांची माहिती मिळते. यातून आपल्याला इतिहास संशोधक म्हणून बाबासाहेबांनी काय काम केले ते कळेल.

1947 नंतर बाबासाहेबांनी प्रामुख्याने आयुष्यात एक ध्येय ठेवले की, आपण शिवचरित्र लेखन करायचे. शिवचरित्राचा अभ्यास करायचा आणि शिवचरित्र जगासमोर आणायचे आहे. शिवचरित्र हे बखरीच्या माध्यमातून इतके विस्तृतरीत्या जगासमोर आले नव्हते. म्हणून त्याच ध्येयाने त्यांनी कामाला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात शिवचरित्राशी निगडित ज्या घटना आहेत, त्या घटनांवर त्यांनी लेखन सुरू केले. त्यावेळी त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. मुरारबाजी आणि दिलेरखान यांच्यामध्ये जो पुरंदरावर संघर्ष झाला आणि मुरारबाजींनी पुरंदरावर स्वराज्यरक्षणासाठी दिलेले बलिदान यावर बाबासाहेबांनी कथा लिहिली. त्यानंतर बाबासाहेबांनी प्रतापगडच्या मोहिमेवर एक कथा लिहिली आणि त्यानंतर पन्हाळ्याचा वेढा यावर त्यांनी कथा लिहिली. अशा पद्धतीने शिवचरित्राशी निगडित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील घटनांवर त्यांनी अनेक कथा लिहिल्या. बाबासाहेबांनी जे शिवचरित्र साकार केले, त्याचा कथा एक पाया होत्या. या कथा लोकांना अतिशय भावल्या. बाबासाहेबांनी शिवरायांचा इतिहास शास्त्रोक्त पद्धतीने आणि पुराव्यासह लोकांसमोर मांडला. सामान्यत: इतिहास संशोधकाची भाषा ही थोडीशी रुक्ष वाटते. त्यामुळे सामान्य लोकांना ती भावत नाही. मग बाबासाहेबांनी हा विचार केला की, मला जर शिवचरित्र सामान्य व्यक्तीपर्यंत न्यायचे असेल, तर लोकांना भावणारी, आकर्षक वाटणारी अशी भाषा मी वापरली पाहिजे. म्हणूनच बाबासाहेबांचे लिखाण हे कांदबरी वाटत नाही. बाबासाहेबांनी पुराव्यावर आधारलेले लेखन करीत असताना आपली भाषा त्यांच्या प्रतिभेने नटलेली, लालित्यपूर्ण भाषा आणि सामान्य व्यक्तीला भावणारी भाषा वापरली. छोट्या कथांमधून बाबासाहेबांचे शिवचरित्र लोकांसमोर येत होते. साधारणपणे 1952 ते 1955 पासून 1960 पर्यंत शिवचरित्र लिहून ते दोन खंडांत प्रसिद्ध केले. हे शिवचरित्र त्यावेळी लोकांना खूप भावले.

आजतागायत गेली अनेक वर्षे शिवचरित्राची मराठी माणसाच्या मनावर एक मोहिनी राहिलेली आहे. आजपर्यंत राजा शिवछत्रपती या ग्रंथाच्या 25 लाख प्रती आल्या आहेत आणि अनेक आवृत्त्याही प्रसिद्ध झाल्या. हे शिवचरित्र जगाच्या पाठीवर गेले.

बाबासाहेब इतके भारावले की, आपल्याला हे शिवचरित्र सामान्यातल्या सामान्य, खेडोपाड्यात व्यक्तीपर्यंत पोहोचविणे हे माझे कर्तव्य, असे त्यांनी मानले. त्यामुळे तत्कालीन काळात वाचनाची गोडी नसलेल्या माणसांपर्यंत त्यांनी लोकांशी संवाद साधत व्याख्यानाच्या माध्यमातून शिवचरित्र लोकांपर्यंत पोहोचविले. त्यांनी संपूर्ण हिंदुस्थान पालथा घातला. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातच नव्हे, तर त्यांनी संपूर्ण देशात शिवचरित्रावरच्या व्याख्यानमालेतून शिवाजी महाराज लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. मराठी माणसांसमोरही त्यांनी शिवचरित्र मांडले. एक प्रकारे आपल्या आयुष्यात शिवचरित्राचा प्रसार केला, ते मराठी माणसावर आणि शिवभक्तांवर मोठे उपकार आहेत.

बाबासाहेब यांच्यापासून प्रेरणा घेऊन आज शेकडो तरुण शिवचरित्राने भारले आणि त्यांनी आपल्या परीने योगदान दिले. बाबासाहेबांनी अनेक वर्षे भारत इतिहास संशोधक मंडळात इतिहास संशोधक म्हणून नोकरीही केली.

Back to top button