Khandenavami 2023 : आयुध नवमी | पुढारी

Khandenavami 2023 : आयुध नवमी

अजय चौगुले, इतिहास अभ्यासक

आयुध नवमी यास आपर खंडेनवमी म्हणतो. प्रामुख्याने या दिवशी ‘शस्त्र पूजन’ होते. वास्तवात आपल्याकडे शस्त्रपूजन अनेकवेळा होत असे. युद्धाच्या वेळी, विजय प्राप्त झाल्यानंतर शस्त्रपूजन प्रथा प्राचीन काळापासून आहे असे म्हणू शकतो. (Khandenavami 2023)

संपूर्ण भारतामध्ये खंडेनवमीच्या या दिवशी शस्त्रपूजा होत नाही. उत्तर भारतामध्ये या दिवशी सरस्वतीचे पूजन होते तर दख्खन आणि दक्षिण भारतात शस्त्रास्त्रे पूजा होते. या संदर्भात अनेक पुराण कथा जोडलेल्या आहेत. ‘खंडेनवमी’ हा मराठी शब्द असून, याचा संबंध तलवार सदृश हत्याराशी आहे. त्यात विशेषतः खांडा नावच्या तलवारीचे पूजन केले जाते. (Khandenavami 2023)

महिषासूर व दुर्गा यांच्यातील युद्ध हे नऊ दिवस नऊ रात्री चालू होते. ज्यावेळी महिषासूराचा वध  झाला. त्यानंतर देवीने आपली शस्त्रास्त्रे स्वच्छ करून विधिवत पूजन केले, युद्धात ज्या शस्त्रांच्या जोरावर आपण युद्ध करतो किंवा विजयश्री प्राप्त करतो त्या शस्त्रांचे आदर युक्त पूजन करून सतत विजय मिळावा म्हणून आयुध नवमी या दिवशी हा विधी केला.

पांडवांना आपल्या राजवैभवांचा त्याग करून आज्ञातवास भोगावा लागला होता, त्यावेळी अर्जुनाने सर्व शस्त्र, अस्त्रे ही शमीच्या झाडावर ठेवली होती. कालांतराने अर्जुनाने याच दिवशी अज्ञातवास संपवून आपली शस्त्रे परत मिळवली होती, असा महाभारतात उल्लेख आहे. पूर्वी आपल्याकडे अनेक राजवटी होऊन गेल्या व अनेक ठिकाणी संस्थानिक, राजेशाही होती. याच आयुध नवमी दुसऱ्या दिवशी सीमोल्लंघन हा विधी साजरा केला जात असे, विशेषतः करून राजघराण्याशी हा विधी म्हणजे कुळाचार किंवा कुळधर्म मानला जाई. या दिवशी सीमा, कार्यक्षेत्र, राजवट, सत्ता वाढविण्यासाठी युद्ध, आक्रमण, लढाई केली जात असे त्यामुळे यास सामाजिक, धार्मिक, राजकीय महत्त्व आहे याचबरोबर विजयादशमी हा साडेतीन सुमुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी महत्त्वाची कार्ये सुरू करायची प्रथा आहे.

शास्त्रीयदृष्ट्या विचार केला तर पावसाळा संपून हिवाळा चालू होण्याची प्रक्रिया असते. थोडक्यात, ऋतुमान बदलते.. पावसाळ्यामध्ये शस्त्रास्त्रे कमी हाताळणी होते किंवा या चार महिन्यांत युद्ध, आक्रमणे, लढाई कमी प्रमाणात होते. या हवामान मध्ये शस्त्रास्त्रांना गंज चढण्याची प्रक्रिया जास्त प्रमाणात होते. त्यामुळे प्रामुख्याने खंडेनवमीआधी सर्व शस्त्रास्त्रे ही शिकल करण्यासाठी दिली जात किंवा स्वत: शिकल केली जातात. (शिकल म्हणजे स्वच्छ, गंज काढणे, तेल-पाणी करणे, धार करणे) त्यानंतर शस्त्रास्त्रे पूजन केले जात पुन्हा युद्ध, आक्रमणे, लढाई यास सुरुवात सहसा या सुमुहूर्तावरच लढाईसाठी बाहेर पडत.

शस्त्र पूजन कालांतराने सर्वच वर्गातल्या लोकांना महत्त्वाचे ठरले असे दिसते, शेतकरी शेतीची अवजारे पूजन करू लागले तर स्वयंपाकघरामधील विळ्या, चाकू, माप, मुसळ अशा वस्तूंही पूजनात आल्या, सध्या या विधीचे स्वरूप खूपच पालटल्याचे दिसते आहे. थोडक्यात, जी वस्तू आपल्यासाठी ज्या वस्तूने आपली प्रगती होते किंवा जी वस्तू आपल्या प्रगतीचे द्योतक आहे. अशा वस्तूंचे ही पूजन करण्यासाठी प्रथा सध्या आपल्याकडे सुरू आहे.

Back to top button