International Yoga Day 2023 : सूर्यनमस्कार करतो व्याधी मुळापासून नष्ट!(Video)

International Yoga Day 2023 : सूर्यनमस्कार करतो व्याधी मुळापासून नष्ट!(Video)
Published on
Updated on

हिंदू धर्म परंपरेनुसार जो मनुष्य सूर्याला दररोज नमस्कार करतो, त्याला 18 विश्वात दारिद्र्य येत नाही, असे म्हणतात. पण दारिद्रय हे काय फक्त पैशात असते असे नाही. दारिद्र्य हे विचांराचे, परिस्थितीचे, मनाचे व शरिराचे देखिल असते. आपण नेहमी ऐकत आलो आहोत, मनुष्य जीवनामध्ये आयुष्य उत्तम जगण्यासाठी शारीरीक स्थिती बलवान हवीच. पण, मानसिक स्थिती देखिल तितकीच बलवान व उत्तम हवी. यासाठीच मस्तकापासून ते पायांच्या तळव्यांपर्यंतचे सर्व व्याधी मुळापासुन नष्ट करण्याचे काम सूर्यनमस्कार ने करता येते. (International Yoga Day 2023)

हिंदू धर्मात सूर्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सूर्य हे शैव पंथीय समाजात शंकराचे तर वैष्णव पंथीय समाजात विष्णूचे एक अंग मानले जाते. वेदांमधे व पौराणिक ग्रंथांमध्ये सूर्याची उपासना करण्याबद्दल अनेक संदर्भ सापडतात. उगवत्या व मावळत्या सूर्याला दंडवत घालणे हे सूर्यनमस्कारांचे प्रथम उद्दिष्ट आहे. (International Yoga Day 2023)

आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने।
जन्मान्तरसहस्रेषु दारिद्र्‍यं नोपजायते ॥

जे साधक दररोज सूर्य नमस्कार करतील, त्यांना सहस्र जन्म दारिद्र्‍य येत नाही (काहीही कमी पडत नाही) सूर्य नमस्कार हा सर्वागीण व्यायाम आहे. सर्व यौगिक अभ्यासासाठी सूर्योदयाची वेळ सर्वोत्तम मानली गेली आहे. त्याचप्रमाणे सूर्य नमस्कारसुद्धा सूर्योदयाच्या समयी घालणे हितकारक आहे. उघड्यावर हवेशीर जागेवर रिकाम्या पोटी सूर्य नमस्कार घालावेत. मन शांत आणि प्रसन्न असल्यावर सर्व योगाभ्यासाचा आपणावर विशेष परिणाम होतो, असे म्हणतात. सकाळी सूर्योदयानंतर, श्वासाचे नियमन करून एका विशिष्ट क्रमाने 10 किंवा 12 पवित्रे करणे याला सूर्यनमस्कार म्हणतात.

सूर्यनमस्कारामुळे आपले आरोग्य चांगले राहते आणि आपल्या स्मरणशक्तीचाही विलक्षण विकास होतो. सूर्यनमस्कार किंवा साष्टांग नमस्कार ही तथाकथित सूर्य-उपासनाच आहे. हिच्यामुळे सर्वांगसुंदर व्यायाम होतोच पण आत्मिक, मानसिक, व शारीरिक सामर्थ्यही प्राप्त होते. हा व्यायम अल्पमोली आणि बहुगुणी आहे असे म्हणतात. सूर्यनमस्कारात बारा आसन पवित्र्यांचा समावेश आहे.

ते बारा आसने अशी…

१. प्रणामासन किंवा नमस्कारासन, २. हस्त उत्तासन, ३. पादहस्तासन, ४. अश्वसंचालनासन, ५. पर्वतासन, ६.अष्टांग नमस्कार, ७. भुजंगासन, ८. पर्वतासन, ९. अश्वसंचालनासन, १०. पादहस्तासन, ११. हस्त उत्तासन, १२. प्रणामासनहे.
नमस्कार घालताना, प्रथम सूर्याचे नाव घ्यायचे 'ओम मित्राय नमः' आणि मग वरील बारा पवित्रे घ्यायचे. एक नमस्कार पूर्ण झाल्यावर सूर्याचे दुसरे नाव घेऊन दुसरा सूर्यनमस्कार अशी बारा नावे घेऊन बारा नमस्कार घालायचे.

ही बारा नावे अशी…

१.ओम मित्राय नमः २. ओम सूर्याय नमः ३. ओम खगाय नमः ४. ओम हिरण्यगर्भाय नम: ५. ओम आदित्याय नम: ६.ओम अकार्य नमः ७. ओम रवये नमः ८. ओम भानवे नमः ९. ओम पूष्णय नमः १०. ओम मरिचये नमः ११. ओम सवित्रे नमः १२. ओम भास्कराय नमः
दृष्टी, मन आणि वाणी संयमीत करून (एक) छाती, (एक) मस्तक, (दोन) पाय, (दोन) हात, (दोन) गुडघे, या आठांनी जो नमस्कार करायचा त्याला साष्टांग नमस्कार म्हणतात. योग साधने मध्ये सूर्यनमस्कारा ते खुप महत्व आहे.

सूर्यनमस्कारात आरोग्य, दीर्घायुष्य, कार्यक्षमता हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवायचे असते. या आसनामुळे आयुष्य, बल आणि बुद्धिचा विकास होतो. मस्तक, मान, हात, पाय, छाती, पोट, कंबरेचे स्नायू, मेरुदंड, पायाची बोटे, गुढगे, सर्व सांधे यांना व्यायाम घडतो. तसेच पोटाचे जडत्व, अनावश्यक वाढलेला मेद, ओटीपोटातील चरबी, थायरॉईडसारखे विकार, लहान मुलांचे फिरलेले हातपाय व हाडांचे काही दोष, गंडमाळा, घशातील विकार नाहीसे होतात. क्षयापासून संरक्षण मिळते, मनोबलाचा विकास होतो. शरीरात शुद्ध रक्ताचा सारख्या प्रमाणात संचार होतो. अशा सर्व गुण संपन्न अशा सुर्यनमस्काराची सुरुवात 21 जून या जागतिक योग दिनी आपण सर्वांनी करावी व आरोग्य संपन्न व्हावे.

– डॉ. स्वप्निल हरहरे,

(लेखक हे एका तासात 481 सूर्यनमस्कार घालून एशियाटिक व जागतिक रेकॉर्ड केलेले व्यक्ती  आहेत)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news