कृषीसल्ला: सोयाबीनवरील चक्रीभुंगा किडीचे व्यवस्थापन | पुढारी

कृषीसल्ला: सोयाबीनवरील चक्रीभुंगा किडीचे व्यवस्थापन

राज्यात सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. मागील वर्षी सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा किडीचा प्रादुर्भाव आढळून आलेला होता. यावर्षीसुद्धा या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

चक्री भुंगा ही कीड पीकवाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत देठ, फांदी किंवा मुख्य खोडावर दोन समांतर खाचा करून त्यामध्ये अंडी घालते. यामुळे झाडाचा वरील अन्न पुरवठा बंद होऊन वरील भाग वाळून जातो, तर अळी देठ, फांदी आणि खोड पोखरून जमिनीपर्यंत पोहोचते. त्यामुळे पूर्ण झाड वाळून जाते व वेळेवर उपाय योजना न केल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते.

अधिक वाचा : शेवगा ठरतोय कल्पवृक्ष!

संबंधित बातम्या

अधिक वाचा : कृषिअर्थ : भाज्या आणि फळांची नासाडी कशी टाळता येईल?

या पार्श्वभूमीवर सोयाबीनवरील चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव आढळून आल्यास शेतकरी बंधूंनी खालील उपाय योजना कराव्यात.

* पेरणी जुलैच्या दुसर्‍या आठवड्याच्या आत पूर्ण करावी.

* पेरणीसाठी बियाण्याचे प्रमाण शिफारशीप्रमाणे वापरावे. दाट पेरणी केल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढतो.

* जेथे चक्रीभुंगा किडीचा प्रादुर्भाव नियमितपणे आढळतो, अशा ठिकाणी पेरणीच्या वेळेस फोरेट १० टक्के दाणेदार १० किलो प्रति हेक्टर जमिनीत ओल असताना टाकावे.

* चक्रीभुंग्याच्या प्रादुर्भावामुळे कीडग्रस्त पाने, फांद्या वाळतात. अशी कीडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा. या पद्धतीचा १५ दिवसांतून जर दोनदा अवलंब केला, तर चक्रीभुंगा या किडीमुळे होणार्‍या नुकसानीचे प्रमाण कमी होते.

* चक्री भुंग्याच्या किडीने अंडी घालू नये याकरिता सुरुवातीलाच पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

* पीक पेरणीच्या ३०-३५ दिवसांनंतर प्रादुर्भाव दिसताच ७-१० दिवसांत ट्रायझोफॉस ४० ई.सी. १६ मिली प्रति १० लिटर पाणी अथवा थायक्लोप्रीड २१.७ एस. सी. १५ मिली प्रति १० लिटर अथवा क्लोरांट्रॅनिलीप्रोल १८.५ एस. सी. ३ मिली प्रति १० लिटर अथवा थायमेथोक्झाम १२.६ टक्के + लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के, झेड. सी २.५ ग्रॅ. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
– विकास पाटील (कृषी संचालक)

अधिक वाचा : पीकपाणी : पिकांसाठी मातीतील सिलिकॉन घटक का महत्त्वाचा?

अधिक वाचा : जाणून घेऊया थॅलेसेमिया आणि हिमोफिलिया आजाराविषयी…

पाहा व्हिडिओ :८० म्हैशींचा सांभाळ करत ती करतेय M.sc चा अभ्यास

Back to top button