विश्वासदर्शक ठरावापूर्वी फडणवीसांचे निकटवर्तीय अजित पवारांना भेटले! | पुढारी

विश्वासदर्शक ठरावापूर्वी फडणवीसांचे निकटवर्तीय अजित पवारांना भेटले!

मुंबई : पुढारी ऑनलाईन

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज, शनिवारी विधानसभेत मांडला जाणार आहे. या पाश्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि नांदेडचे भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

या भेटीनंतर प्रसारमध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी, चिखलीकर सहज भेटायला आले होते, असा खुलासा केला आहे. चिखलीकर भाजपमध्ये तर मी राष्ट्रवादीतच आहे. त्यांच्या भेटीमुळे गैरसमज नको. वेगळा अर्थ काढू नका. वेगवेगळ्या पक्षात असलो तरी दुश्मन नाही, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. चिखलीकर यांना काल भेटायचं होतं. काल भेटता आला नाही. यामुळे ते आज भेटले. ही भेट राजकीय नसून ती सदिच्छा होती. संजय राऊत यांनी सांगितले आहे की १७० चा आकडा गाठला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

आज विधानसभेत आम्हाला पाठिंबा देणारे आमच्या बाजूने उभे राहतील. राष्ट्रवादी पक्ष आणि नेते जी काही जबाबदारी देतील ते मी करणार आहे, असेही अजित पवारांनी स्पष्ट केले आहे. 

Back to top button