निपाणीत सुट्टीला गेलेल्या कोल्हापूरच्या शाळकरी मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू | पुढारी

निपाणीत सुट्टीला गेलेल्या कोल्हापूरच्या शाळकरी मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू

निपाणी : पुढारी वृत्तसेवा 

मामाच्या गावी आलेल्या कोल्हापूर येथील शाळकरी मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. रणवीर दिपक सूर्यवंशी (वय १५, रा. महाराणा प्रताप चौक, कोल्हापूर) असे मृत मुलाचे नाव आहे. घटनेची नोंद शहर पोलिस ठाण्यात झाली आहे. 

गेल्या महिन्यापूर्वी रणवीर हा आपले मामा सुभाष चव्हाण (साळुंखे गल्ली, निपाणी) यांच्या घरी आला होता. मंगळवारी सकाळी तो सुभाष यांचा मुलगा प्रथमेश यांच्यासमवेत घरापासून काही अंतरावर असलेल्या निपाणकर-सरकार वाड्यातील विहिर (कुंडामध्ये) पोहण्यासाठी गेला. या वेळी प्रथमेश व रणवीर हे दोघेजण इनरच्या साह्याने पोहू लागले. 

यावेळी रणवीर याचा इनरवरील ताबा सुटल्याने तो विहिरीत खोलवर बुडाला. ही घटना सोबत असलेल्या प्रथमेश याच्या लक्षात आली. 

यावेळी घाबरून प्रथमेशने घराकडे धाव घेत याची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानुसार घटनास्थळी तातडीने चव्हाण परिवारांसह नगराध्यक्ष जयवंत भाटले, दादाराजे देसाई- निपाणकर सामाजिक कार्यकर्ते सुनील शेलार यांच्यासह काही नगरसेवकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी रणवीर हा पाण्यात खोल बुडाल्याचे लक्षात आले. 

त्यानुसार याची माहिती निपाणी शहर पोलिसांना देण्यात आली. यावेळी घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार यांच्यासह हवलदार बसवराज नावी, एस. एस. चिकोडी, संदीप गाडीवडर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी रणवीर हा खोलवर बुडाल्याचे लक्षात आले. 

त्यानुसार कोल्हापूर येथील जीवरक्षक दिनकर कांबळे यांना पाचारण करण्यात आले. दुपारी कांबळे यांनी सुमारे शंभर फूट खोल विहिरीत बुडालेला रणवीर याचा मृतदेह बाहेर काढला. यावेळी मयत रणवीर यांच्या कुटुंबियांनी व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.दुपारी येथील सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात झाल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 

मृत रणवीर हा नववीमध्ये शिकत होता. तो एकुलता एक होता. त्याच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे. याबाबत रणवीरचे चुलते सुनील सूर्यवंशी यांनी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली असून तपास कुंभार यांनी चालवला आहे. 

Back to top button