सातारा : कोयना जल पर्यटनासाठी 50 कोटी | पुढारी

सातारा : कोयना जल पर्यटनासाठी 50 कोटी

सातारा : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील जल पर्यटनाला चालना देण्यासाठी कोयना बॅकवॉटरवर सुरु करण्यात येणार्‍या स्कूबा डायव्हिंग आणि जेट स्की सुरु करण्यात येणार आहे. कोयना जलपर्यटनासाठी 50 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. दरम्यान, जल पर्यटनासंदर्भात एमटीडीसीने सर्वेक्षण केले असून याबाबत विविध विभागांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पाठपुरावा केला आहे.

जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात मोठी धरणे आहेत. या धरणांचा वापर जल पर्यटनासाठी होवू शकतो. यातूनच राज्यासाठी वरदायिनी ठरलेल्या कोयना धरणात जल पर्यटन सुरु करण्यात येणार आहे. कोयनेच्या बॅक वॉटरवर स्कूबा डायव्हिंग सुरु करण्यात येणार आहे. स्कूबा डायव्हिंग ही पाण्यात जास्त वेळ नियंत्रित पध्दतीने पोहण्याची एक पध्दत असते. ज्यात एक स्कूबा डायव्हर स्वयं अंतनिर्हित पाण्याखाली श्‍वास घेण्यासाठी उपकरण (स्कुबा) वापरुन पाण्याखाली श्‍वास घेतो. कोयना बॅक वॉटरवर जल पर्यटनाच्यादृष्टीने सुरु करण्यात येणार्‍या स्कूबा डायव्हिंगच्या प्रशिक्षणासाठी 20 मुलांची बॅच सातारा जिल्ह्यातून नुकतीच तारकर्ली (जि. सिंधुदूर्ग) येथे दाखल झाली आहे.

एमटीडीसीच्या इस्डातर्फे हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या स्कूबा डायव्हिंगचा उपयोग जल पर्यटनासोबतच आपत्कालीन परिस्थितीतही होवू शकतोे. वॉटर र्स्पाट्सच्यादृष्टीने वॉटर बोट किंवा जेट स्की सुध्दा सुरु करण्यात येणार आहे.त्याबाबतचे प्रशिक्षण एमटीडीसीच्या इस्डाच्यावतीने सुमारे 20 मुलांना देण्यात येणार आहे. पालकमंत्र्यांच्या मान्यतेनंतर जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) माध्यमातून महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) मार्फत वॉटर स्पोर्टसच्यादृष्टीने सर्वे करण्यात आला आहे. हे उपक्रम सुरु करण्यापूर्वी संबंधित विभागांची मंजुरी व परवानगी घेण्यात येणार आहेत. या प्रकल्पाच्यादृष्टीने जल पर्यटनाचा प्रस्ताव राज्य शासनाला जिल्हा प्रशासनाकडून सादर करण्यात आला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्यासोबत गेल्या महिन्यात बैठक झाली. त्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोयना जलपर्यटनासाठी 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी घोषणा केली. साहसी वॉटर स्पोर्टसमध्ये पॅरासिलींग, जेट स्की वगैरे आहे. वाईल्ड लाईफ सफारीप्रमाणे बोट राईट असतील. दरम्यान, गिर्यारोहक या साहसी प्रकाराला उत्‍तेजन देण्यासाठी 20 मुलांना एप्रिल-मे महिन्यात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत शाखेच्या मदतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. काही ट्रेकर्स ग्रुप आपत्कालीन परिस्थितीवेळी प्रशासनाला मदत करत असतात. आता प्रशासनाच्या माध्यमातून गिर्यारोहणाच्या अनुषंगाने मुलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे या उपक्रमाचाही पर्यटनाबरोबरच आपत्कालीन परिस्थितीतही जिल्ह्याला उपयोग होणार आहे. गिर्यारोहणासाठी आवश्यक असलेले साहित्य प्रशासनाकडून उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

जिल्ह्याच्या जलपर्यटनाला गती देण्यासाठी राज्य शासनाला सादर केलेल्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली. कोयना बॅक वॉटरवर सुरु करण्यात येणार्‍या स्कुबा डायव्हिंग, जेट स्की या वॉटर स्पोर्टस्साठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्यात आली. जल पर्यटनामुळे इतर व्यवसायांना चालना मिळून जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. जलपर्यटनासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व संबंधित विभागांची मदत झाली.
– शेखर सिंह, जिल्हाधिकारी, सातारा

Back to top button