कोगनोळी सीमातपासणी नाक्‍यावर कारवाई; फळ विक्रेत्‍याची ८ लाखांची रोकड निवडणूक विभागाकडून जप्त | पुढारी

कोगनोळी सीमातपासणी नाक्‍यावर कारवाई; फळ विक्रेत्‍याची ८ लाखांची रोकड निवडणूक विभागाकडून जप्त

निपाणी : पुढारी वृत्तसेवा पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर (मंगळवार) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास फळ विक्रेत्याची सुमारे 8 लाख रुपयांची रोकड निवडणूक विभागाने जप्त केली. विशेष म्हणजे आचारसंहिता लागू झाल्यानंतर चौथ्यांदा निपाणी ग्रामीण पोलीस व निवडणूक प्रशासनाने ही कारवाई केली आहे. महिन्यात केवळ याच तपासणी नाक्यावर आतापर्यंत 29 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी की, कोगनोळी टोलनाका येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी नाका स्थापित करण्यात आला आहे. त्यानुसार पुणे येथून शिमोगा (दावणगिरीकडे) खासगी लक्झरी बसमधून आंबा खरेदीसाठी बुरान दादापीर उस्मानिया (वय 40) रा.केरूबिलाची, चन्नागिरी (ता. जि. दावणगिरी) येथे जात होते. दरम्यान सदरील खासगी लक्झरी बस तपासणी नाक्यावर आली असता, नाक्यावरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बसची तपासणी केली. यावेळी बुरान यांच्याजवळ असलेल्या बॅगमध्ये विना कागदपत्राविना 7 लाख 94 हजार रुपयांची रोकड आढळून आली.

त्यानुसार घटनास्थळी सीपीआय बी.एस.तळवार ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मनीकंठ पुजारी यांनी भेट देऊन मिळालेल्या रकमेबाबतच्या कागदपत्रांची चाचपणी केली. मात्र बुरान यांच्याके या रकमेविषयी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे मिळाली नाहीत. त्यामुळे प्रशासनाने मिळालेली रक्कम जप्त करून निवडणूक विभागाकडे सुपूर्द केली.

या कारवाईत जत्राट ग्रा.प.चे विकासाधिकारी दयानंद काडापट्टी सौंदलगा ग्रा.प.चे कर्मचारी बाळासाहेब कळंत्रे, कुरली ग्रा.प.चे बापू माने, निपाणी न.पा.चे.विनोद केंगारे तसेच गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील राहुल कांबळे यांच्यासह तपासणी पथकाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

विशेष म्हणजे जिल्हाधिकारी नितेश पाटील व जि.पो.प्रमुख डॉ.भीमाशंकर गुळेद यांनी मंगळवारी बेळगाव येथे तातडीची बैठक घेतली होती. यामध्ये सीमा तपासणी नाक्यावर स्थापित करण्यात आलेल्या सीमा तपासणी नाक्यावर काम करताना अधिकारी व कर्मचारी वर्गाने दक्ष राहून काम करावे अशा सूचना त्‍यांनी दिल्या होत्या. त्यामुळे मंगळवारी रात्री कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर सर्वच अधिकाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून ही कारवाई करून जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे पालन केले. या यावेळी तब्बल 8 लाखांची रोखड पकडल्याने जिल्हा प्रशासनाने या कारवाईत सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा : 

Back to top button